सध्या थोडं काही झालं की दवाखाना गाठावा लागतो. औषधं घेतली की बरं वाटतं. पण एकामागोमाग काहीना काही आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतातच. सगळं काही ठिक असलं की केस तरी गळणार, डोक्यात कोंडा तरी होणार नाहीतर चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या तरी येणार.. असं काही ना काही चालू असलं की वैतागायला होतं... किती गोष्टींसाठी दवाखान्यात जायचं, किती औषधं घ्यायची? अशी चिडचिड आपली आपणच करायला लागतो. ते पाहिलं की घरातल्या जेष्ठ मंडळी 'तुम्हाला तब्येत व्यवस्थित ठेवणारे घरचे उपाय नको असतात, मग भरा दवाखान्याची बिलं!' असं म्हणून तेही नाराज होतात. पण हे अगदी खरंच आहे, की तब्येत बिघडल्यावर केवळ औषधं घेतो पण आरोग्य नीट राहावं, यासाठी म्हणून घ्यायची काळजी, करावयाच्या गोष्टी याकडे दुर्लक्षच होतं.
Image: Google
आपल्या रोजच्या आहारात आवळ्याला खूप महत्त्व आहे. पण आवळा बाजारात असतो तो मर्यादित कालावधीतच. म्हणून आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आवळ्यावर प्रक्रिया करुन आवळा वर्षभर घरात, खाण्यात राहील याची बेगमी करायचे पूर्वी. ही गोष्ट आताही सहज शक्य आहे. अगदी सोप्या तीन पध्दती वापरुन घरच्या घरी शुध्द आवळा पावडर करता येते.
घरच्या घरी आवळा पावडर
1. घरच्या घरी आवळा पावडर करण्याच्या तीन पध्दती आहेत. पहिल्या पध्दतीने आवळा पावडर करताना अर्धा किलो ताजे आवळे आणावेत. आवळे किमान दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवावेत. आधी आवळे स्वच्छ कोरड्या कापडानं कोरडी करावीत. मग एका मोठ्या भांड्यात आवळे ठेवावेत. पातेल्यात 2 लिटर पाणी घालावं. भांडं गॅसवर ठेवावं. पाणी चांगलं उकळू द्यावं. पाण्यासोबतच आवळेही उकडले जातात. आवळा चांगला उकळला गेला की गॅस बंद करावा. पाणी थंडं होवू द्यावं. मग आवळे पाण्यातून बाहेर काढून काही वेळ ठेवावेत. मग आवळ्यातील बिया काढून टाकून आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. आवळ्याचे हे तुकडे 1 ते 2 दिवस कडक उन्हात चांगले वाळवून घ्यावेत. आवळ्याचे तुकडे चांगले हडकले की ते मिक्सरमधून बारीक करुन घ्यावेत. यातून चांगली आवळा पावडर तयार होते. मग ही पावडर हवाबंद डब्यात ठेवून द्यावी.
Image: Google
2. दुसऱ्या पध्दतीनं आवळा पावडर तयार करताना एका भांड्यात पाणी घेऊन त्यात आवळा टाकावा. हे भांडं मायक्रोव्हेवमधे ठेवून द्यावं. आवळा उकळला गेला की मायक्रोवेव्ह बंद करावा. आवळ्यतील पाणी काढून टाकावं. आवळा थंडं होवू द्यावा. थंड झाल्यानंतर आवळ्यातील बिया काढून टाकाव्यात. बिया काढलेला आवळा 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून घयवा. आवळा सुकला की मिक्सरच्या भांड्यात घालून चांगला बारीक करावा. आवळा मायक्रोवेव्हमधे सुकवला तरी चालतो. आवळा पावडर हवाबंद डब्यात ठेवावी. घरी तयार केलेली आवळा पावडर दीर्घकाळ चांगली राहाण्यासाठी शक्यतो ती काचेच्या बरणीत ठेवावी. किंवा ज्यात ही पावडर ठेवणार आहोत तो डबा हवाबंद आहे ना याची खात्री करुन घ्यावी. आवळा वापरताना चमचा ओला नसावा. कोरड्या केलेल्या चमच्यानं हवी तेवढी आवळा पावडर काढून डब्याचं झाकणं नीट लावावं. आवळ्याच्या पावडरमध्ये पाण्याचा थेंब पडल्यास किंवा आवळा पावडर काढताना ओला चमचा घातल्यास, बरणीचं किंवा डब्याचं झाकण उघडंच राहिल्यास पावडरमधे गोळे होवून पावडर खराब होवू शकते. मधून मधून आवळा पावडर स्वच्छ कोरड्या पसरट ताटात काढून तिला ऊन दाखवायला हवं.
3. तिसऱ्या पध्दतीने आवळा पावडर करताना आवळे पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावेत. ते कोरडे करावेत. किसणीवर किसून त्याचा किस करावा. हा किस उन्हात कापडावर पसरवून कडकडीत वाळवावा. वाळलेला आवळ्याचा किस मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करावा. ही पध्दत आवळा पावडर करण्याची सोपी पध्दत मानली जाते.
Image: Google
आवळा पावडर का असते महत्त्वाची?
निरोगी आरोग्यासाठी आणि आरोग्यविषयक अनेक समस्या स्पोडवण्यासाठी शुध्द स्वरुपाची आवळा पावडर खूप उपयोगी पडते.
1. आवळ्यात क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. डोळे चांगले ठेवण्यासाठी आणि नजर चांगली ठेवण्यासाठी आवळा खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. आवळ्यातले हेच गुणधर्म आवळा पावडरमधे असतात. कोणाला नुसता आवळा खायला आवडत नाही कारण तो तुरट लागतो. तर त्यांनी आवळा न खाता आवळ्याची पावडर सेवन केली तरी फायदेशीर ठरतं.
2. आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्या आणि आपण डाॅक्टरांकडे गेलो की आधी डाॅक्टर पोट कसं आहे , हे आधी विचारतात. तसेच पचनाशी निगडित काही समस्या तर नाहीना याची खात्री करुन घेतात. कारण पचन बिघडण्याच्या आणि आरोग्य समस्यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे निरोगी राहायचं असेल तर पचनक्रिया सुधारणं आवश्यक आहे. आवळ्याप्रमाणेच आवळ्याच्या पावडरमध्येही फायबर असतात. त्यामुळे नियमित स्वरुपात प्रमाणात आवळा पावडर सेवन केल्यास बिघडलेलं पचन सुधारतं. पचनाशी आणि पोटाशी निगडित समस्या आवळा पावडरच्या सेवनानं बऱ्या होतात.
Image: Google
3. आवळा पावडरमध्ये एथेनाॅलिक हा घटक असतो. हा घटक वजन कमी करण्यासाठी मदत करतो. तसेच या घटकाचा उपयोग वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही होतो. आपलं वाढलेलं वजन काही केल्या कमी होत नसेल तर आवळा पावडर यासाठी कामी येते. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक ते दोन चमचे आवळा पावडर घालावी. ती नीट हलवून ते पाणी प्यावं. हा उपाय नियमित केल्यास चयापचय क्रिया सुधारते आणि त्याचा फायदा वजन कमी होण्यास होतो.
Image: Google
4. आवळ्याच्या पावडरमधे आवळ्याप्रमाणेच कॅल्शियम असतं. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. नुसता आवळा खाणं, आवळ्याचा मुरंबा खाणं किंवा आवळा पावडर पाण्यात मिसळून, मधात मिसळून खाणं फायदेशीर ठरतं असं आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. आवळा पावडरमधून शरीरास ड जीवनसत्त्व देखील मिळतं.