मार्गशीर्ष महिना आजपासून सुरू झाला आहे. विशेष म्हणजे महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरूवार आल्याने अनेकांचे आज उपवास असण्याची शक्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीची पूजा करुन तिच्या नावानी उपवास करण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. आता ऐन थंडीत हे उपवास येत असल्याने उपवास करताना आरोग्याची हेळसांड होणार नाही यादृष्टीने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उपवास करण्यामागे आपली श्रद्धा असली तरी ते उपवास त्रासदायक होऊ नयेत यासाठी आहारातील काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाहूया गुरुवारचे उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी (Margashirsh Guruwar Fasting Upwas Diet Tips).
१. भूक लागेल तेव्हा खायला हवे
थंडीच्या दिवसांत आपल्याला एरवीपेक्षा जास्त भूक लागते. त्यामुळे उपवास आहे तर कमी खायला हवे असे न करता जितकी भूक आहे तितके खायला हवे. हे उपवास शक्यतो खाऊन-पिऊन करावेत, अनेकजण निर्जल किंवा फलाहार घेऊन उपवास करतात मात्र त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित खाऊनच उपवास करायला हवेत.
२. चहा-कॉफी योग्य प्रमाणातच घ्यावी
थंडीच्या दिवसांत आपण बाहेर गारठा असल्याने एरवीही चहा -कॉफी नेहमीपेक्षा थोडी जास्त घेतो. मात्र उपवासाच्या दिवशी पोटात जास्त काही नसते. अशावेळी चहा-कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चहा-कॉफी घेण्यावर नियंत्रण ठेवायला हवे.
३. ऊर्जा देणारे पदार्थ खावेत
थंडीच्या दिवसांत शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अशावेळी गूळ, दाणे, सुकामेवा, फळं, खजूर, राजगिरा यांसारख्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश ठेवायला हवा. रताळे, शिंगाडे हे थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी चांगले असणारे आणि उपवासालाही चालणारे पदार्थ आहारात घ्यायला हवेत.
४. एकाचवेळी खूप न खाता दर थोडा वेळानी खावे
उपवास म्हटल्यावर अनेक जण सकाळी उठल्यापासून काहीच खात नाहीत. मग दुपारपर्यंत साहजिकच खूप भूक लागते. अशावेळी एकदम उपवासाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दर ४ ते ५ तासांनी थोडे थोडे काही ना काही खायला हवे.