सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण नेहमीच आपल्या हेल्दी लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतो. मिलिंद सोमण यांच्या जीवनशैलीत धावणं, व्यायाम, योगा आणि चांगल्या आहाराचा समावेश असतो. इंस्टाग्रामवर ते आपले फिटनेस व्हिडीओज, तसंच आपल्या कुटुंबियांसोबतचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर मिलिंद सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटोत त्यांच्या हातात एक डीश असून त्यांनी मिल प्लॅन असं कॅप्शन दिलं आहे.
त्यांनी असे लिहिले आहे की, '' बर्याच चाहत्यांनी मला रोज काय खाता म्हणून विचारले आहे म्हणून मी रोजचं जेवण सोशल मीडिया युजर्स सह शेअर करत आहे. ५५ वर्षांच्या अभिनेत्यानं नमुद केलं की, ते आपला दिवस 500 मि.ली. पाणी पिऊन सुरू करतात. त्यानंतर १० वाजता नाष्ता करतात. त्यात नट, पपई, खरबूज आणि सिजनल फळांचा समावेश असतो.
याशिवाय त्यांना आपल्या आहारात भात, डाळ खिचडी आणि सिजनल भाज्या, फळं, चपात्यांचा समावेश करायला आवडतो. संध्याकाळी ते एक कप गुळाचा काळा चहा येतात. आपल्या फिटनेसचं सिक्रेट लोकांना सांगताना मिलिंद सोमण नमूद करतात की, ते नेहमीच तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पाकीट बंद पदार्थांपासून लांब राहतात. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन करतात. मिलिंद यांच्या रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी किंवा भाज्यांची प्लेट असे हलके जेवण असते. अंथरुणावर झोपण्यापूर्वी गरम पाण्यात हळद घालून याचे सेवन करतात.
काही दिवसांपूर्वी होते कोरोनाग्रस्त
मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. नंतर त्यांनी सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर करत कोरोनावर मात केली असल्याचे सांगितले आहे. मिलिंद यांनी सोशल मीडियावर त्याची पत्नी अंकितासोबतचा फोटो नुकताच पोस्ट केला होता आणि त्यासोबत लिहिले की, माझा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असल्याने माझा क्वांरंटाईनचा कालावधी संपला आहे. मी लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केल्या होत्या, यासाठी मी तुमचे आभार मानतो. अंकिता तू माझी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच गुवाहाटीवरून आलीस आणि माझी काळजी घेतली, त्यासाठी तुझे आभार....
या पोस्टमध्ये मिलिंद यांनी एका काढ्याची रेसिपी देखील दिली होती. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते . या पोस्टमध्ये लिहिले आहे की, क्वारंटाइनच्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी येथे सांगत आहे. मी कोथिंबीर, मेथीचे दाणे, काळी मिरी, तुळस, आलं आणि गूळ याचा काढा घेतला होता. पहिल्या आठवड्यामध्ये मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. या व्यतिरिक्त मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका.
इच्छा असूनही करू शकले नाही प्लाझ्मा डोनेट
मिलिंद सोमण प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते. मात्र त्याला हॉस्पिटलने नकार दिल्यामुळे माघारी फिरावे लागले. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, 'मी आज मुंबईत प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी गेलो होतो पण अॅण्टीबॉडीज खूप कमी होत्या. आपण निरुपयोगी असल्याची भावना मनात आली.'