खाणं आणि वजन यांचा जवळचा संबंध असतो. अतिखाणं हे वजन वाढीमागचं मुख्य कारण आहे.पण मग अति का खाल्लं जातं? या प्रश्नाचा तज्ज्ञांनी अभ्यास करुन उत्तरही शोधलं आहे. वाढणारं वजन, अति खाणं यावर माइंडफुल इटिंग हा योग्य पर्याय असल्याचं अभ्यासक म्हणतात. वर्तमानकाळात आपलं लक्ष केंद्रित करुन जगणं, सजगपणे अनुभव घेणं म्हणजे मांइडफुल असणं होय. सजग आणि जाणीवपूर्वक जगण्यातून, अनुभव घेण्यातून अनेकांना आपल्या ताणावरचं, हरवलेल्या झोपेवरचं उत्तर सापडलं आहे. अभ्यासक म्हणतात की खाण्याच्या बाबतीतही हा माइंडफुलचा नियम पाळला तर वाढलेल्या वजनावर नियंत्रण येऊ शकतं. अर्थात माइंडफुल इटिंग हा वजन कमी करण्याचा मार्ग नाही तर ते एक साधन आहे. एक टूल आहे. पण या साधनाचा रोजच्या जीवनात नीट अवलंब केल्यास खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जातात. माइंडफुल इटींग, सजगतेनं, जाणीवपूर्वक, लक्ष देऊन खाण्यानं आपण जे खात आहोत त्याच्याशी आपलं एक नातं तयार होतं. खाणं हे केवळ मग पोटभरीचं साधन न राहाता ते अनुभवण्याचं, आनंदी आणि समाधानाचं माध्यम होतं. खाणं हा अनुभूतीचा एक प्रकार आहे. पण ज्याप्रमाणे आपण एखाद्या फुलाचा गंध घेतो. आणि मिनिटभरात त्याच्यापासून वेगळंही होतो. पण खाणं हा अनूभव काही काळ टिकून राहाणारा आहे. सलग काही मिनिटं आपण तो अनुभव घेत असतो . आणि म्हणूनच अभ्यासक खाणं या अनुभवाकडे जरा सजगतेनं बघण्याचा आणि ही क्रिया जाणीवपूर्वक अनुभवण्याचा सल्ला देतात.
माइंडफुल इटिंगमुळे आपल्याला पौष्टीक खाण्याची, जितकं आवश्यक आहे तेवढंच खाण्याची सवय लागते. आपण काय खातो, किती खातो याकडे आपण बारकाईनं बघू लागतो. त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर आणि वजनावर होतो. पण एखाद्या गोष्टीत जाणीवपूर्वक लक्ष देणं, ते लक्ष टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अभ्यासक हे माइंडफुल इटींग कसं जमू शकेल, आपल्या रोजच्य्या आयुष्याचा कसा भाग होऊ शकेल याबाबत सहज जमतील अशा बाबीही सूचवतात.
सजगतेनं खाण्याची सवय लागण्यासाठी...१ खाण्यापूर्वी थांबा आणि आपण हे का खातो आहे हे स्वत:ला विचारा. माइंडफुल इंटिंग साठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण जेवणाव्यतिरिक्त चिवडा, चिप्स, पिझ्झा, बर्गर खायला जातो तेव्हा स्वत:ला विचारलेला हा प्रश्न आपल्याला अलर्ट करतो. हा प्रश्न विचारल्यावर थोडं थांबा.शरीरात काय होतंय याकडे लक्ष द्या. पोटात भूकेनं खरंच कावळे ओरडता आहेत का? की आपल्याला तहान लागलीये? की आपण बोअर झालो म्हणून आपल्याला चटपटीत खावंसं वाटतंय? की थोडा कामातून ब्रेक हवा आहे म्हणून आपण खाण्याकडे वळलो आहोत? या प्रश्नाचं नेमकं उत्तर आपल्याला वर्तमानात आणतं. आणि जरी खायचं असलं तरी त्यासाठी योग्य पर्याय निवडण्यास मदत होते.
२. प्रत्येक घास चावून आणि चव घेत खावा. घाई घाईत खालेल्लं अन्न हे फक्त खाल्लं जातं ते अनुभवलं जात नाही. खाताना अन्नाचा गंध, त्याचा पोत, रंग या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक पाहून मग ते खाल्लं तर हे अन्न आपल्याला समाधान देतं. ते असमाधानी ठेवत नाही. पोट भरल्याची जाणीव या कृतीतून होते. हळूहळू खाण्याची सवय लागते. त्यातून प्रत्येक घास नीट चावून चव घेत खाल्ला जातो. यातून शरीरात अन्नाच्या पचनासठी आवश्यक ते पाचक रस तयार होतात. त्यातून अन्नाचं नीट पचन होतं. अन्न नीट पचणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणून अभ्यासक म्हणतात छोटे छोटे घास घ्या आणि चावून चावून खा!
३. जेवणापूर्वी पाणी प्या. यामुळे जेवताना जास्त खाल्लं जात नाही. पाणी पिल्यानं आपण पटकन वास्तवात येतो. जेवताना लक्ष लागतं. पाणी पिल्यानं मन शांत होतं. आणि जेवणाच्या वेळेस मन शांत असलं की हळूहळू , चव घेत आणि जितकं हवं तितकंच खाल्लं जातं.
४. रंगीत आणि स्वादिष्ट पदार्थ खावेत. नाश्ता करताना, जेवताना आहारात नैसर्गिक रित्या रंगीत आणि स्वादिष्ट पदार्थाचां समावेश असावा. हे पदार्थच मग आपल्याला सावकाश आणि रंग गंध आणि चव घेत खाणं अनुभवण्याची सवय लावतात. रंगीत भाज्या, फळं यांचा आहारात समावेश केला आणि त्यात सातत्य ठेवलं तर काही दिवसांनी आपणच अतिप्रक्रिया केलेले पदार्थ टाळू लागतो.
५. लक्ष विचलित न करता खा. खाताना लॅपटॉप, टीव्ही बंद ठेवा. मोबाइल बाजूला ठेवा. यामूळे खाण्यावर लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. अनेकांना गाणी ऐकत, पॉडकास्ट ऐकत जेवणाची सवय असते. पण अभ्यासक म्हणतात ही सवयही चुकीची आहे, कारण यातून आपण खाण्याच ‘क्रंच इफेक्ट ’ घालवून बसतो. आपण जे खातो ते खाताना त्याचा विशिष्ट आवाज होत असतो. हा अवाज आपल्याला जास्त खाण्यापासून प्रवृत्त करतो असं अभ्यासक म्हणतात. त्यामुळे आपण काही ऐकत जर जेवण करत असू तर मग हा क्रंच इफेक्ट होत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. पण लक्ष विचलित होऊ न देता खाल्ल्यास समाधानाची भावना लवकर येते. आणि जास्त खाणं टाळलं जातं.
६. सावकाश जेवावं. भराभर जेवल्यानं जेवण पटकन संपत असलं तरी यामूळे कमी वेळात जास्त खाल्लं जातं. त्यामुळे जेवताना सावकाश जेवावं. आपलं पोट भरलं आहे ही जाणीव मेंदूपर्यंत पोहोचायला २० मिनिटं तरी लागतात. पोट भरल्याचं मेंदूला जाणवलं की आपोआपच त्यानंतर खाणं थांबतं. पण मेंदुला पोट भरल्याचं जाणवेइतका वेळ दिला नाही तर जास्त खाल्लं जातं.
७. आपल्या खाण्याची नोंद ठेवा. वजन कमी करण्यासाठी माइंडफूल इटिंग करतो तेव्हा आपल्या खाण्याची नोंद ठेवा. आपल्याला काय खाण्याचा मोह झाला, आपण तेव्हा काय खाल्लं, नंतर आपल्याला कसं वाटलं याची बारीक नोंद ठेवल्यास आपलं वजन वाढवणारे खाण्याचे मोह आपल्याच लक्षात येतात. ते कसे टाळायचे याकडे आपण जाणीवपूर्वक बघतो. अशा मोहाच्या काळात वजन वाढवणारं चटपटीत न खाता मग आपण पौष्टिक आणि पोटभरीचे पर्याय निवडतो.
८. आनंद घेत खावं. मांडफूल इटिंग हे आपल्याला सजगतेनं खाण्याची सवय लावतं हे खरं. पण म्हणून खाण्याच्या वेळेस गंभीर होऊन आणि कॅलरी आणि पोषणमूल्यं मोजतच खायला हवं असं नाही. आपण काय खातो, किती खातो हे पाहाणं, मोजणं हे गरजेचं आहे पण म्हणून खाण्यातला आनंदही गमावता कामा नये असं अभ्यासक म्हणतात. म्हणून ते खाताना आनंदी असण्याचा सल्ला देतात. अन्नावर प्रेम करत ते खाल्ल्यास खाण्यातला आनंद मिळतो. आणि आनंद मिळाला की समाधान मिळतं. आणि हे समाधान आपल्याला अतिखाण्यापासून रोखतं.