Join us  

Mindfull Weightloss : सकाळी उठल्या उठल्या करा 5 गोष्टी; वजन कमी होईल झरझर-सुधारेल क्वालिटी ऑफ लाइफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 4:33 PM

वजन कमी करायचं तर सकाळचं वेळापत्रक सुधारा...सकाळच्या वेळेत 6 गोष्टी केल्यास वजनाचा आकडा होतो कमी 

ठळक मुद्देदिवसभरातील इतर वेळेपेक्षा सकाळची वेळ अत्यंत महत्वाची आहे. या वेळेत तुम्ही काय करता, काय खाता पिता, तुम्ही कधी उठता या सर्वांचा परिणाम वजन कमी होण्यावर किंवा वाढण्यावर होतो.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या वेळात आपण वेगवेगळी कामं करतो. आपण वेगवेगळ्या वेळेत करत असलेल्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. आपल्या शरीर आणि मनावर आपण करत असलेल्या गोष्टींचा चांगला परिणाम व्हावा अशी इच्छा असेल तर आपण कधी काय करतो याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. वजन कमी करण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी काही गोष्टी ठराविक वेळी घडणं आवश्यक असतं.  वजन कमी करण्यासाठी दिवसभरातील इतर वेळेपेक्षा सकाळची वेळ अत्यंत महत्वाची आहे. या वेळेत तुम्ही काय करता, काय खाता पिता, तुम्ही कधी उठता या सर्वांचा परिणाम वजन कमी होण्यावर किंवा वाढण्यावर होतो. सकाळच्या वेळेचं महत्व लक्षात घेता तज्ज्ञ आपलं सकाळचं रुटीन हेल्दी ठेवण्याचा सल्ला देतात.  सकाळच्या हेल्दी रुटीनमध्ये 6 गोष्टींचा आवर्जून समावेश करण्यास सांगतात.

 

Image: Google

1. लवकर उठा

सकाळी लवकर उठणं म्हणजे आपल्या पुरेशा झोपेच्या गरजेशी तडजोड करणं नव्हे. रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावल्यास त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. सकाळी सूर्य उगवल्यानंतर उशिरापर्यंत झोपून राहाणं हे आरोग्यासाठी चुकीचं समजलं जातं. सकाळी उशिरा उठण्याच्या सवयीमुळे वजन वाढतं असं तज्ज्ञ म्हणतात. 

2. कोवळ्या उन्हात बसा-फिरा

सकाळचं कोवळं ऊन हे ड जीवनसत्व आणि हाडांचं आरोग्य एवढ्यापुरतंच मर्यादित नसतं. एकूणच आरोग्यासाठी ही सवय स्वत:ला आवश्यक आहे. काही मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यास, कोवळ्या उन्हात फिरल्यास शरीराला जास्त ऊर्जा मिळते. शरीरातील हार्मोनल बदल योग्य दिशेनं होतात. याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होतो.

3. सकाळी व्यायाम करा 

जर्नल मेडिसिन ॲण्ड सायन्स इन स्पोर्टस ॲण्ड एक्सरसाइजमध्ये प्रसिध्द झालेला अभ्यास सांगतो की,  ज्या महिला सकाळच्या वेळेत व्यायाम करतात त्यांचं वजन सकाळी व्यायाम न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात कमी होतं . तसेच सकाळच्या वेळेत व्यायाम करणाऱ्या महिला आरोग्यास अपायकारक अशा पदार्थांकडे कमी आकर्षित होतात. न्यूकॅसल येथील नार्थमर्बिया युनिर्व्हसिटीनं केलेल्या संसोधनानुसार सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास शरीरातील 20 टक्के जास्त चरबी कमी होते. सकाळच्या वेळेत व्यायाम केल्यानं शरीराला जास्त ऊर्जा मिळून शरीरातील चरबी जळायला सुरुवात होते, त्याचा परिणाम म्हणजे वजन कमी होतं. 

4. भरपूर पाणी प्या

तज्ज्ञ म्हणतात सकाळी पाणी न पिण्याची चूक कधीही करु नये. जैविक क्रिया योग्य घडण्यासाठी , चयापचय क्रिया सुरळीत चालण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी सकाळी पाणी पिणं आवश्यक आहे. सकाळी पुरेसं पाणी प्यायलं तर शरीरातील उष्मांक जळतात. पाण्यामुळे शरीरात दिवसभर ओलावा राहातो. यामुळे दिवसभरात अपायकारक भूक लागत नाही. तज्ज्ञ म्हणतात सकाळी साधं पाणी प्यायलं तरी फायदेशीर ठरतं किंवा वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणं फायदेशीर ठरतं. 

Image: Google

5. प्रथिनंयुक्त नाश्ता करा

सकाळी कितीही कामं असली तरी नाश्ता कधीही चुकवू नये. सकाळचा नाश्ता प्रथिनंयुक्त असायला हवा. भूक भागवण्यासाठी आणि चयापचय क्रियेला चालना देण्यासाठी नाश्त्यातील पदार्थात प्रथिनांचा समावेश असायला हवा. प्रथिनांमुळे स्नायूबांधणी होण्यास, शरीराला ताकद मिळण्यास फायदा होतो. तज्ज्ञ सकाळच्या नाश्त्यासाठी दूध, चीज, डाळी, बदाम, शेंगदाणे , दही हे पदार्थ खाण्यास सूचवतात.

Image: Google

6. सजगतेचा सराव करा

वजन कमी होण्यासाठी शरीर आणि मनावरचा ताण कमी होणंही आवश्यक असतं. तणावाखाली वावरल्यास शरीरात काॅर्टिसाॅल नावाचं हार्मोन स्त्रवतं. काॅर्टिसाॅलमुळे वजन वाढतं. मनावरचा हा ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञ सकाळी व्यायामानंतर थोडा वेळे माइंडफुलनेस अर्थात सजगतेचा सराव करण्याचा सल्ला देतात. श्वासावर लक्ष केंद्रित करुन मन वर्तमानात ठेवणं म्हणजे सजगता. अमेरिकम सायकाॅलाॅजिकल असोसिएशनच्य संदर्भानुसार माइंडफुलनेसच्या सरावामुळे ताण कमी होतो, शरीरातील ऊर्जा वढते, लक्ष केंद्रित होतं, स्मरणशक्ती वाढते. यामुळे मनावर ताण येत नाही आणि वजनही वाढत नाही. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स