कधी एखाद्या लहानशा गोष्टीवरुन तर कधी कोणाशई भांडण झाले की आपला मूड पार खराब होऊन जातो. मग आपले कशातच लक्ष लागत नाही आणि ठरवलेली कामेही होत नाहीत. तसेच एखाद्या गो्ष्टीचा ताण आला की आपल्याला काही सुधरेनासे होते आणि आपला चांगला असलेला मूड एकाएकी पार बिघडून जातो. हा खराब झालेला किंवा बिघडलेला मूड तुम्हाला पूर्वपदावर आणता येतो बरं का? आता ते कसे, तर आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास हे मूड खराब होण्याचे प्रकरण जरा मागे पडते.
काही दिवसांपूर्वीच फूड आणि मूड यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे यावर एक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार तुम्हाला मूड चांगला ठेवायचा असेल तर ठराविक फूड खाल्ल्याने ती गोष्ट साध्य होते असे त्यात म्हटले आहे. आता मूड खराब होण्याची किंवा अपसेट होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अपूरी झोप, जेनेटीक प्रॉब्लेम, सततचा ताण, शरीराला आवश्यक पोषक घटक न मिळणे अशा कारणांचा त्यामध्ये समावेश होतो. तर पुरेशी झोप, योग्य आहार, तणावरहित जीवन या गोष्टी आपल्या हातात असून त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास आपण आपला हा गेलेला मूड ‘बॅक टू नॉर्मल’ आणू शकतो. आज आपण त्यातल्या आहाराबाबत जाणून घेणार आहोत. आता नेमक्या कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आपल्याला रिलॅक्स वाटू शकते ते पाहूयात...
१. केळी - केळी हे भारतात सहज उपलब्ध होणारे आणि आर्थिकरित्या परवडणारे फळ आहे. तसेच केळ्यामध्ये आरोग्याला उपयुक्त असे अनेक घटक असतात. केळ्यातील B6 हा घटक तुमचा गेलेला मूड परत आणण्यास उपयुक्त ठरतो. तसेच खाल्लेल्या अन्नाचे योग्यरितीने पचन होण्यासाठी आवश्यक असणारे फायबर केळ्यातून मिळते. एका केळ्यातून जवळपास १२ % फायबर मिळते. केळं चवीला गोड असल्याने तुम्हाला गोड खाल्ल्याचा आनंदही घेता येतो.
२. बदाम - सुकामेव्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. तसेच यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड असतं. हे घटक ताण तणाव दूर करण्याचे काम करतात. त्यामुळे बदाम खाल्ल्यास तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहण्यास मदत होते.
३. आक्रोड - अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस आणि मॅग्नेशियम असतं. ज्यामुळे मेंदूत सेरोटोनिनची पातळी वेगाने वाढते. अक्रोड खाल्यास ताणतणाव दूर होतो, यामुळे मूडही चांगला राहतो. चांगल्या झोपेसाठीही आक्रोड खाण्याचा फायदा होतो. मेंदू वेगाने चालण्यासाठी अनेकदा लहान मुलांनाही आक्रोड देण्यासाठी सांगितले जाते.
४. कॉटेज चीज - ताज्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये आरोग्याला उपयुक्त असे बरेच घटक असतात. चीजमध्ये प्रथिनांबरोबरच ट्रिप्टोफॅन हा घटक असतो. यामध्ये असलेल्या अमिनो अॅसिडमुळेे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात कॉटेज चीजचा आवर्जून वापर करावा.
६. पालक - पालकात कॅल्शियम, फोलिक अॅसिड आणि निट्रेटसारखे इतरही अनेक उपयुक्त घटक असतात. पालकामुळे तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमचा हृदयरोगापासून बचाव होऊ शकतो. म्हणून आहारात पालकाचा योग्य प्रमाणात समावेश ठेवा.
७. कॉफी - गरम वाफाळत्या कॉफीचा वास आला तरी आपल्याला आनंदी वाटते. कॉफीतील कॅफेन आपल्याला मेंदूला थकव्यापासून दूर करते आणि तरतरीही देते. कॉफीमध्ये मूडवर चांगला परिणाम करणारं कॅफिन असते. मूड बिघडलेला असताना दिवसभरात दोन कप कॉफी घेतल्यास मूड चांगला राहतो. मूड सुधारण्यासाठी आवश्यक असणारे न्यूरोट्रान्समीटर्स कॉफीमध्ये असतात. कॉफीतील डोपामाईन आणि नोरेपाईनफ्राईन हे घटक मूड बदलण्यास कारणीभूत ठरतात.
८. अंजीर - फळे ही आरोग्याला कायमच उपयुक्त असतात. यामुळे नैसर्गिक घटक मिळतात आणि तुमची तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तसेच अंजीरात मॅग्नेशिअक, कॅल्शिअम आणि लोह हे तिन्ही घटक असतात. ही खनिजे रक्तप्रवाह चांगला होण्यास मदत करतात आणि त्यामुळे स्नायू आकुंचन पावण्यासही मदत होते. त्यामुळे तुम्हाला अंजीर फळ मिळाले नाही तर सुकामेव्यातील अंजीराचा तुम्हा आहारात समावेश करु शकता.
९. डार्क चॉकलेट - चॉकलेट हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना आवडणारा पदार्थ आहे. आनंदाच्या क्षणी दिले जाणारे हे चॉकलेट मूड ठिक करण्यासाठीही तितकेच उपयुक्त असते. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंटस असतात. सेरोटोनिन लेव्हल वाढण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. चॉकलेट खाल्ल्याने आपल्याला एकदम एनर्जी आल्यासारखे वाटते आणि त्यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते.
१०. भेंडी - भेंडी ही काहींची अतिशय आवडीची भाजी असते तर काहींची नावडती भाजी असते. पण भरले भेंडी, भेंडीचे काप, तळलेली भेंडी असे भेंडीचे अनेक प्रकार करता येतात. या भाजीत कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. भेंडीतील पोलिफिनोल्स या घटकामुळे तुमचे हृदय चांगले राहण्यास मदत होते तसेच शरीरावरील सूज, दाह कमी करण्यासही हा घटक अतिशय उपयुक्त असतो.