हिवाळा हा आरोग्य कमावण्याचा ऋतू मानला जातो. याचं कारण हिवाळ्यात बाजारात विविध प्रकारच्या भाज्या, फळं असतात. थंडीसाठी म्हणून सुकामेवा, मेथ्या, खोबरं, गूळ वापरुन विविध पौष्टिक पदार्थ केले जातात. या काळात बाजारात आणखी एक गोष्ट मुबलक मिळते ती म्हणजे आवळा. ताजे, रसरशीत मोठ मोठे आवळे बाजारात उपलब्ध असतात. आवळा म्हणजे स्वस्तात मिळणारं, आरोग्यास मोलाचे फायदे देणारं फळ आहे. आवळ्याचे विविध पदार्थ बनवून चविष्ट खाण्याची जशी सोय केली जाते तसेच आवळ्याचे आरोग्यास फायदेशीर असे प्रकारही केले जातात. आवळ्याचा मोरावळा अर्थात मुरांबा हा असाच एक आरोग्यास फायदेशीर पदार्थ आहे. हा जितका पौष्टिक तितकाच चविष्ट देखील असतो. आरोग्याच्या दृष्टीनं गुणांनी संपन्न असलेल्या मोरावळ्याला हेल्थ टॉनिक असं म्हटलं जातं. आयुर्वेदिक औषधं आणि सामग्रीच्या दुकानात मोरावळा सहज उपलब्ध असतो. पण तो करण्यास इतका सोपा आहे की बाहेरुन महागाचा मोरावळा घेण्यापेक्षा घरच्याघरी तो सहज तयार करता येतो. मोरावळा कसा करतात हे जाणून घेण्याआधी हा मोरावळा का खायचा ते समजून घ्यायला हवं.
Image: Google
मोरावळ्याचे आरोग्यदायी गुणधर्म
1. पचन सुधारण्यास मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो. जर बध्दकोष्ठतेची समस्या असेल तर मोरावळ्याच्या सेवनानं ही समस्या सहज दूर होते. पचन सुधारण्यासाठी आणि बध्दकोष्ठता दूर करण्यासाठी मोरावळा हा दुधासोबत सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जर अपचन होत असेल, पोटात सतत गुब्बारा धरत असेल तर मोरावळा औषध म्हणून चांगलं काम करतो. मोरावळ्यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे पचनाशी संबंधित विकार मोरआवळ्याच्या सेवनानं दूर होतात. अँसिड रिफ्लक्स हे अँसिडिटीचं गंभीर रुप असून यावर उपाय म्हणून मोरावळ्याचा उपयोग होतो. आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मोरावळा गुणकारी ठरतो. पोटातील अँसिडच्या समस्येबरोबरच अल्सरसारख्या आतड्यांच्या गंभीर आजारात मोरावळ्याचं सेवन प्रभावी औषधासारखं काम करतं.
2. मोरावळ्यात तांबं आणि झिंक यासोबतच क्रोमियम हा घटकही असतो. या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे मोरावळ्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहाते आणि हदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो. तसेच रक्तवाहिन्यांना आलेली सूज घालवण्यासाठी मोरावळा परिणामकारक ठरतो.
3.अँनेमिया अर्थात शरीरातील रक्ताची कमतरता ही समस्या गंभीर असूनही ती दुर्लक्षित होते. भारतात स्त्रिया आणि लहान मुलं यांच्यात अँनेमिया मोठ्या प्रमाणावर आढळतो. अँनेमियाच्या समस्येत मोरावळा खाल्ल्यानं हिमोग्लोबिन वाढतं.मोरावळ्यात लोह भरपूर प्रमाणात असतं. तसेच मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास मोरावळा खाऊन ही समस्या नियंत्रित करता येते. मासिक पाळीत पोटात कळा येणं, पाय आणि कंबर दुखी मोरावळा नियमित आणि औषधासारखा खाल्ल्यास दूर होते.
Image: Google
4. निरोगी त्वचेसाठी क जीवनसत्त्व आहारातून मिळणं गरजेचं असतं. मोरावळ्यात क आणि ई ही दोन्ही जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतात. ही दोन्ही जीवनसत्त्वांचा फायदा म्हणजे त्वचेचा रंग उजळतो, चेहर्यावर चमक येते. तसेच मोरावळा नियमित सेवन केल्यास एजिंग ( चेहर्यावर वय दिसण्याची ) समस्या दूर होते. त्वचेवर सुरकुत्या ओअडत नाही. तसेच त्वचेस आवश्यक असलेला थंडावा मोरावळ्यातून मिळतो. त्वचा निरोगी, नितळ आणि सुंदर दिसण्यासाठी मोरावळा नियमित खाण्याला महत्त्व आहे.
5. यकृतातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मोरावळ्याचा उपयोग होतो.
6. मोरावळ्यात अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. याचा फायदा प्रतिकारशक्ती वाढण्यापासून ते त्वचा आणि केस सुंदर होण्यापर्यंत अनेक प्रकारे होतो.
7. झोप न येणं, झोप नीट न लागणं यासारख्या समस्येत मोरावळा नियमित खाल्ल्यास झोपेचं तंत्र सुधारुन शरीर आणि मानसिक आरोग्यविषयक तक्रारी कमी होतात.
8. मोरावळ्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. यामुळे पचन सुधारतं, चयापचय क्रिया सुधारते. याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी तसेच वजन नियंत्रित करण्यासाठी होतो.
9. मुळव्याधीच्या त्रासात मोरावळा गुणकारी असून त्याच्या नियमित सेवनानं मुळव्याधीतील वेदना आणि त्रासाची तीव्रता कमी होते.
Image: Google
मोरावळा कसा खावा?
1. पाकात बुडून रसरशीत होणारा मोरावळा तसाही खाता येतो.
2. सकाळी ब्रेड किंवा पोळीसोबत मोरावळा जॅमसारखा लावून खाता येतो.
3. पचनाच्या समस्येत मोरावळा हा दुधासोबत खाणं गुणकारी मानलं जातं.
4. आवळ्याचा गुळातला मुरांबा भरपूर दिवस टिकतो. जास्तीत जास्त वर्षभर तर कमीत कमी पाच ते सहा महिने मोरावळा फ्रिजाच्या बाहेर, तर फ्रिजमधे ठेवल्यास वर्षभरही टिकतो.
5. मोरावळा हा चविष्ट लागत असला तरी तो औषध आहे. म्हणून मोरावळा औषधासारखा खाण्याला महत्त्व आहे. तज्ज्ञ सांगतात जास्तीत जास्त एक चमचा तर कमीत कमी अर्धा चमचा खावा.
6. मोरावळ्यात साखर / गुळाचा वापर जास्त असतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मोरावळा टाळण्याचा सल्ला दिला जातो.
7. आवळा आणि आवळ्याच्या पदार्थांची अँलर्जी असल्यास मोरावळा न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
8. मोरावळा खाताना हे औषध आहे खाऊ नाही हे कायम लक्षात ठेवावं.
Image: Google
मोरावळा कसा कराल?
मोरावळा करण्याची एकच एक पध्दत नाही. पण सर्व प्रकारात गूळ घातलेला मोरावळा जास्त आरोग्यदायी मानला जातो. मोरावळा करण्यासाठी साधनसामग्री आणि वेळ दोन्हीही कमी लागतं. कडक हिवाळ्यात मोरावळा करुन ठेवल्यास तो रोज थोडा थोडा खाल्ल्यास एकूणच आरोग्यस फायदेशीर ठरतो.
मोरावळा करण्यासाठी पाव किलो मोठे आणि चांगल्या प्रतीचे आवळे, 300 ग्रॅ किसलेला सेंद्रिय गूळ, 1 लिंबू, काळं मीठ, सूंठ पावडर, काळ्या मिर्याची पूड आणि आणि थोडी वेलची पावडर घ्यावी.
मोरावळा करण्यासाठी बाजारातून चांगल्या प्रतीचे, आकारानं मोठे असलेली आवळे निवडून आणावेत्. हे आवळे पाण्याखाली धरुन स्वच्छ धुवावेत. धुतलेला आवळा पाणी निथळायला ठेवावा. नंतर आवळे स्वच्छ कपडयाने करुन बाजुला ठेवावेत.
एका भांड्यात 2 कप पाणी उकळण्यास ठेवाव. पाणी उकळताना त्यावर झाकण ठेवावं. म्हणजे पाणी चांगलं उकळतं. पाणी उकळल्यावर त्या भांड्यावर स्टीलच्या रोळीत धुतलेले आवळे घालावेत. रोळीवर झाकण ठेवून मध्यम आचेवर आवळे वाफेवर शिजवून घ्यावेत. ( कुकरमधे एका भांड्यात थोडं पाणी खालून दोन शिटया गॅस बंद करावा.) आवळे नरम झाले की गॅस बंद करावा. उकडलेले आवळे एका ताटात कारुन ठेवावेत. म्हणजे ते लवकर थंड होतात. थंड झालेल्या आवळ्यावर फोकनं छिद्र पाडून घ्यावीत. यामुळे पाक आवळ्यात चांगला मुरतो. छिद्र पाडलेले आवळे एअर टाइट बाटलीत घालावेत. वरुन त्यावर किसलेला गूळ घालावा. बाटलीचं झाकण नीट बंद करुन दोन दिवस कडक उन्हात बरणी ठेवावी. यामुळे गूळ वितळून पाक होतो.
Image: Google
दोन दिवसानंतर गूळ घातलेल्या आवळ्याला पाणी सुटेल. हे पाणी म्हणजेच पाक. पण तो अतिशय पातळ असतो. त्याला पाकाचा घट्टपणा येण्यासाठी तो गॅसवर ठेवून पाकवणं गरजेचं आहे. यासाठी बाटलीतला आवळा आणि रस एका कढईत काढून घ्यावा. कढई मध्यम आचेवर ठेवावी. पाक मधासारखा दाटसर करावा. यासाठी 5 ते 7 मिनिटं लागतात. पाक हवा तसा दाटसर झाला की गॅस बंद करुन मोरावळा थंडं होवू द्यावा. तो थंड झाला की त्यात एक लिंबाचा रस काढून तो घालावा. यात थोडं काळं मीठ, थोडी सूंठ पावडर, काळ्या मिर्याची पूड आणि थोडी वेलची पूड घालून ते चांगलं हलवून घ्यावं. मग हा मोरावळा पुन्हा बाटलीत भरुन ठेवावा. मोरावळा हा पाकात बुडालेला हवा.
पाक जर कमी वाटत असेल तर थोडा गूळ घेऊन तो वितळवून त्याचा पाक करुन वरुन घालावा. हा मोरावळा उन्हात ठेवून नंतर पाकवल्यानं तो जास्त पौष्टिक होतो. लिंबाचा रस, मिरेपूड, काळं मीठ, सूंठ पावडर आणि वेलची पावडर यामुळे हा मोरावळा आणखी पौष्टिक आणि स्वादिष्ट होतो.