Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नवरात्रात नऊ दिवस उपवास आणि पित्ताचा त्रास छळतो, डोकं दुखतं, ते का?

नवरात्रात नऊ दिवस उपवास आणि पित्ताचा त्रास छळतो, डोकं दुखतं, ते का?

ज्यावेळी सलग नऊ दिवस उपास करायचे असतात तेव्हा शरीराची वेगळ्या प्रकारे काळजी घ्यायला हवी. नऊ दिवस उपवास करणार असाल तर काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 05:16 PM2021-10-07T17:16:47+5:302021-10-07T17:19:24+5:30

ज्यावेळी सलग नऊ दिवस उपास करायचे असतात तेव्हा शरीराची वेगळ्या प्रकारे काळजी घ्यायला हवी. नऊ दिवस उपवास करणार असाल तर काय कराल?

Navratra : Fasting for nine days and suffering from acidity, headache, how to deal? | नवरात्रात नऊ दिवस उपवास आणि पित्ताचा त्रास छळतो, डोकं दुखतं, ते का?

नवरात्रात नऊ दिवस उपवास आणि पित्ताचा त्रास छळतो, डोकं दुखतं, ते का?

Highlightsउपास करणारच असा हट्ट असेल तर मग रोज काय खावं हा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो

वैद्य राजश्री कुलकर्णी (M.D. आयुर्वेद)


सणवार आणि त्याबरोबर उपवास याची सांगड आपल्या संस्कृती मध्ये पहिल्यापासून घातली गेली आहे.म्हणजे अगदी रामनवमी, हनुमान जयंती, गणेश जयंती, जन्माष्टमी यांचेही उपवास घराघरांत केले जातात. या उपासांचं एरवी विशेष काही वाटत नाही कारण ते तात्कालिक एकेक दिवसांचे असतात पण अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून जे देवीचं नवरात्र सुरु होतं ,त्याचे उपवास मात्र बहुसंख्य घरांमधून नऊ दिवस करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी नवरात्र उठता बसता म्हणजे पहिल्या व शेवटच्या दिवशी उपास करतात .कितीतरी घरातून बहुतेक वेळा स्त्रियाच हे उपास करत असतात. अनेकदा हे उपास त्यांना झेपत नाहीत,अनेक तब्येतीचे त्रास जाणवतात पण तरीही नाईलाजाने किंवा भीतीपोटी हे उपास बायका करत राहतात. काहीजणी स्वेच्छेनेही करतात. श्रध्देनेही उपवास नऊ दिवस करणाऱ्या तरुण मुलीही अनेक आहेत.
शास्त्रीय दृष्ट्या बघायचं झाल्यास पचन सुधारण्यासाठी एखादया दिवसाचा उपास हा एक प्रकारची चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आहे ज्याला आपण “ लंघन” म्हणून ओळखतो. शरीरात साठलेले दोष काढून टाकणे, पचनसंस्था स्वच्छ करणे आणि पचनशक्ती सुधारणे हे याचे फायदे आहेत पण हे एक दोन दिवस करणेच इष्ट आहे.
ज्यावेळी सलग नऊ दिवस उपास करायचे असतात तेव्हा शरीराची वेगळ्या प्रकारे काळजी घ्यायला हवी.


(Image : Google)

नऊ दिवस उपवास करणार असाल तर काय कराल ?

१. उपासापेक्षा उपासनेवर भर द्या.
२. कडक उपास, केवळ फलाहार किंवा शेंगदाणे, साबुदाणा खाऊन उपास करण्यापेक्षा धान्य फराळ करावा म्हणजे यात धान्य भाजून त्याची दशमी,थालीपीठ वगैरे खाल्लेले चालते.
३. भेंडी, लाल भोपळा, सुरण,बटाटे,काकडी यांपैकी सगळ्या किंवा काही भाज्या उपासाला चालतात असा रिवाज आहे ( फार शास्त्रीय आधार नाही)परंतु एरवी आपण भाजीपोळी खातो त्याप्रमाणे दशमी व यापैकी एखादी भाजी खायला हरकत नाही.
४. कोणताही आजार असेल तर उपाशी राहण्याने किंवा कमी खाणे,पित्त वर्धक खाणे,वेळी अवेळी खाणे यामुळे वाढू शकतो म्हणून ब्लडप्रेशर, डायबेटीस, थायरॉईड, संधिवात ,पोटाचे विकार, अम्लपित्त,डोकेदुखी वगैरे काही त्रास असतील तर उपास टाळणेच बरे!

(Image : Google)

५. नेहमीप्रमाणे आहार नसल्यामुळे खूप जणींना झोप शांत लागत नाही कारण पोटात काहीच नाही अशी वारंवार संवेदना होते ,झोप नीट न झाल्याने विविध तक्रारी उद्भवतात अशा व्यक्तींनीही उपास टाळावाच.पित्ताचा त्रास होतो.
काहीही होवो ,उपास करणारच असा हट्ट असेल तर मग रोज काय खावं हा प्रश्न समोर आ वासून उभा राहतो, त्याविषयी उद्या जाणून घेऊया!


(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आणि नाशिकस्थित आयुश्री हॉस्पिटलच्या संचालक आहेत.)
rajashree.abhay@gmail.com

Web Title: Navratra : Fasting for nine days and suffering from acidity, headache, how to deal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न