आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही एकाच वेळेस सांभाळायचं तर रोज रात्री एक कप भर हळदीचं दूध पिणं गरजेचं आहे. विशेषत: हिवाळ्यात तर हळद दूध प्यायलाच हवं असं तज्ज्ञ म्हणतात. हळद दुधातील गुणधर्म बघता या दुधाला ‘गोल्डन मिल्क’ असं म्हटलं जातं. हाडांचं आरोग्य, निरोगी त्वचा, रोगप्रतिकारशक्ती, संसर्ग आजारांपासून बचाव आणि मानसिक आरोग्य या सर्वांसाठी रोज रात्री एक कपभर हळदीचं दूध परिणामकारक ठरतं. हळ्द दूध हा तर आजीच्या बटव्यातला उपाय म्हणून ओळखला जायचा. आधुनिक काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा पारंपरिक उपाय पुन्हा महत्त्वाचा ठरला तो यातील गुणधर्मामुळेच.
Image: Google
1 कप हळद दुधाची ताकद
1. हळद दुधात दूध आणि हळद या दोन घटकांमधील गुणधर्मांचं एकत्रीकरण होतं. शिवाय ते करताना त्यात दालचिनी, काळे मिरे, सूंठ पावडर, मध/ गूळ यांचा वापर केला जात असल्यानं थंडीत या एक कप हळदीच्या दुधामुळे सर्दी खोकला, फ्ल्यू यासारखे संसर्गजन्य आजार होत नाही. शरीरात नैसर्गिक ऊब निर्माण करण्यासाठी हळद दूध हा चांगला उपाय आहे.
2. दुधात आपल्या शरीराला रोज आवश्यक असणारे पोषक घटक असतात. कॅल्शियम, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि सेलेनियम ही खनिजं तर ड, अ, ब2, ब 12 ही जीवनसत्त्व दुधात असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यास फायदेशीर मानलं जातं.
3. हळदीमधील क्यरक्युमिन ह घटक असतो. तो प्रामुख्याने दाहविरोधी म्हणून ओळखला जातो. या गुणधर्मामुळेच हळद ही सर्दी, खोकला, फ्ल्यू सारख्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यास फायदेशीर ठरते. जर रोगप्रतिकारशक्ती कमी असेल , सर्दी खोकला यासारखे आजार वरचेवर होतच असतील तर त्यांना रोज रात्री हळदीचं दूध पिण्याचा सल्ला पूर्वी घरातील जेष्ठ व्यक्ती द्यायच्या आता तर स्वत: आरोग्य तज्ज्ञच हळद दूध आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगतात. तसेच आजारपणानंतर शरीराची झीज भरुन काढण्यासाठी हळद दुधाचा उपयोग होतो. तसेच हळद दुधामुळे शरीरावरील आणि आतील जखमा लवकर भरुन बर्या होतात.
Image: Google
4. जेवल्यानंतर पोट फुगणे, अपचन होणे यासारख्या पचनाच्या समस्येत जेवणानंतर गरम हळद दूध घेणं हे फायदेशीर ठरतं. हळद दुधामुळे पोटाला थंडपणा मिळतो तसेच पचन क्रिया सुधारण्यास वेग मिळतो.
5. मधुमेही रुग्णांसाठी देखील हळद दूध औषधी सांगितलेलं आहे. हळद दुधातील गुणधर्मामुळे मधुमेहात सायटोक्निइसमुळे जो दाह होतो तो शमतो. शिवाय हळदीतील घटकामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते आणि होते.
6. हळद दूध हे कधीही पिऊन चालत नाही. तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याआधी हे दूध घ्यायला हवं. हळद दुधातील गुणधर्मांमुळे रात्री शांत झोप लागते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे किंवा रात्री ज्यांना अनेकवेळा जाग येते त्यांनी रात्री झोपण्यआधी हळद दूध घेतल्यास फायदा होतो हे अभ्यासातून दिसून आलं आहे.
शांत आणि चांगली झोप हे उत्तम मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. रात्री शांत झोप ही शरीरासाठी आवश्यक असते. कारण या काळात शरीर झालेली झीज भरुन काढतं. शरीराला हा अवसर मिळाला तर आरोग्य चांगलं राहातं. म्हणूनच हळद दूध रात्री झोपण्याआधी प्यावं. तसेच हळद दुधातील दूध, हळद, दालचिनी, काळे मिरे, गूळ, मध या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.
7 हळद दूध नियमित घेतल्यानं त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचा तरुण तर राहातेच शिवाय त्वचेवरील तेजही वाढतं .
Image: Google
कसं करायचं हळद दूध?
हळद दूध पिण्याचा जसा नियम आहे तसाच हळद दूध तयार करण्याचाही आहे. अनेकजण हळद दूध पिताना चवीचा विचार करतात. ते उग्र लागू नये म्हणून त्यात साखर घालून पितात. अशा पध्दतीचं हळद दूध फायदेशीर न ठरता अपायकारकच ठरतं.
आरोग्यदायी हळद दूध तयार करण्याचे दोन ते तीन प्रकार आहेत.
1. हळद दूध करताना एक कप दूध, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा काळे मिरेपूड, 1 मोठा चमचा गूळ आणि 1 इंच दालचिनी घ्यावी.
आधी भांड्यात दूध गरम करण्यास ठेवावं.दूध गरम करतानाच त्यात दालचिनी आणि गूळ पावडर टाकावी. दुधाला उकळी आली की मग त्यात हळद अणि मिरेपूड घालून मंद आचेवर ते उकळू द्यावं. हे दूध उकळलं की मग गाळून ते गरम प्यावं.
2. आरोग्यदायी हळद दूध करण्याची दुसरी पध्दत आहे. यात हळकुंड घ्यावं. ते खलबत्त्यात कुटावं. एका भांड्यात 2 कप दूध आणि 1 कप पाणी घालावं. दूध उकळताना त्यातील पाणी निघून जातं आणि दूध उकळून केवढ दुधाचा काढा शिल्ल्क राहातो. दूध पाण्याच्या मिश्रणात कुटलेली थोडी हळद घालावी. हे दूध मग कमीत कमी 15-20 मिनिटं मंद आचेवर उकळावं. दूध मंद आचेवर इतका वेळ उकळल्यामुळे हळदीतील सत्त्वं दुधात उतरतं. दूध चांगलं उकळून आटलं की मग त्यात थोडी मिरेपूड घालून दूध हलवून घ्यावं. दूध गाळून घ्यावं. या दुधात चिमूटभर काळं मीठ टाकलं तर ते आरोग्यास फायदेशीर ठरतं.
3. हळद दूध करण्याच्या तिसर्या पध्दतीत दिड कप दूध घ्यावं. ते गरम होण्यास ठेवावं. गरम झालं की त्यात पाव चमचा हळद घालून दूध ढवळून घ्यावं. मंद आचेवर हे दूध 15-20 मिनिटं उकळण्यास ठेवावं. दूध उकळून आटलं की ते गाळून घ्यावं. ते थोडं कोमट झालं की त्यात थोडं मध घालून मग ते प्यावं.