हिरवीगार फुगीर लांबुळकी विड्याची पानं पाहिली की हमखास ते खाण्याची इच्छा होते. कात, चुना, लवंग, विलायची, सुपारी, बडीसोप, मुखवास, गुलकंद असं सगळं टाकून तयार केलेला विडा तर खास असतो. विड्याचं पान खायला आवडत नाही, अशा व्यक्ती तर क्वचितच सापडतात. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल ना, तर नियमितपणे किंवा अगदी रोज विड्याचं पान खा. कारण विड्याचं पान केवळ आपली रसनातृप्तीच करत नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय पोषक ठरतं.
तिखट, तुरट अशी या पानाची चव असते. काही ठिकाणी विड्याच्या पानाला नागवेलीचं पान देखील म्हंटलं जातं. घरात कोणतीही पुजा असली तरी त्या पुजेची सुरुवात विड्याच्या पानांनीच केली जाते. आरोग्यासाठी हे पान अतिशय फायदेशीर असल्यानेच कदाचित प्रत्येक कार्यात या पानाचा सहभाग दर्शविला गेला असावा, असा अंदाजही काही ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स विड्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आराेग्य विषयक अनेक समस्यांसाठी विड्याचं पान नियमित खाणे, हा एक उत्तम उपाय आहे.
विड्याचं पान खाण्याचे फायदे
१. काही जणांच्या तोंडात बॅक्टेरिया संसर्ग झाल्यामुळे त्यांच्या तोंडाला कायम दुर्गंधी येते. संसर्ग कमी करून तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी नियमितपणे विड्याचे पान खावे. या पानामध्ये कात, चुना, बडीसोप आणि विलायची हे चार घटक अवश्य टाकावेत.
२. काही जणांना अजिबातच भूक लागत नाही. अशा लोकांची भूक वाढविण्यासाठी त्यांना विड्याच्या पानात मिरेपुड टाकून खाण्यास द्यावं. मिरेपुड अगदी चुटकीभर टाकावी. असा उपाय नियमित केल्यास भूक वाढते.
३. मायग्रेन किंवा डोकेदुखी असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खावं. किंवा विड्याच्या पानांचा रस करून तो डोक्यावर चोळावा. लगेचच आराम मिळतो.
४. मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील विड्याचं पान नियमितपणे खाणं फायद्याचं ठरतं. कारण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी विड्याचं पान उपयुक्त ठरतं. याच कारणामुळे गोडाधोडाचं जेवण झाल्यावर सणावाराला आपल्याकडे विड्याचं पान आवर्जून खाण्याची प्रथा आहे.
५. सर्दी, खोकला, कफ. घसा बसणे असा त्रास उद्भवल्यास विड्याच्या पानाला मध लावून ते खायला द्यावे.
६. ॲसिडीटी, अपचन असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खायला द्यावं. पचनशक्ती सुधारण्यासाठी विड्याचं पान खूपच उपयुक्त ठरतं.
७. आवाजाचा पोत सुधारण्यासाठी, आवाज मंजूळ होण्यासाठीही विड्याची पाने मदत करतात. त्यामुळे गायक मंडळी मैफिलीच्या आधी हमखास विड्याचं पान खातात.
८. दातांचे आरोग्य राखण्यासाठी तसेच हिरड्यांच्या मजबुतीसाठी विड्याचं पान बारीक चावून खावं.
९. निद्रानाशाचा त्रास होत असल्यास दररोज रात्री विड्याचं पान मीठ आणि ओवा टाकून चावून- चावून खावं. यामुळे चांगली झोप लागते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.
१०. तोंड आले असेल, तोंडात फोडं झाली असतील तर विड्याची पानं पाण्यात उकळून घ्यावीत आणि ते पाणी कोमट झाले की त्या पाण्याने गुळणा करावा. लवकरच त्रास कमी होतो.
११. अंगाला खाज सुटत असेल किंवा पुरळ, फोडे आली असतील किंवा कोणते इन्फेक्शन झाले असेल तर विड्याची पाने पाण्यात उकळून घ्यावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी.
१२. कुठे चटका बसला असेल किंवा एखादी जखम झाली असेल तर त्या जखमेवर विड्याच्या पानांची पेस्ट आणि त्यामध्ये थोडा मध असे मिश्रण करून लावा. जखमेचा दाह कमी होईल आणि थंडावा मिळेल.
१३. अतिश्रम झाल्याने थकवा जाणवत असल्यास विड्याचं पान आणि मध असे एकत्र करून खावे. थोड्याच वेळात थकवा जातो आणि पुन्हा नव्याने काम करण्यास तुम्ही सज्ज होता.
सौंदर्यासाठीही विड्याच्या पानांचा उपयोग
विड्याचे पान हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर सौंदर्य वाढविण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम घालवायचे असतील तर ७ ते ८ विड्याची पाने वाटून त्याचा रस काढून घ्या आणि हा रस चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.