आपले वाढलेले वजन कमी व्हावे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही उपाय करत असतोच. वजन मेंटेन्ड करणे हे थोडे कठीण काम असतेच परंतु आपले डाएट आणि खाण्याकडे थोडे लक्ष दिले तर आपण हे सहज करु शकतो. लठ्ठपणाचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम दिसून येतो. यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि जीवनशैलीचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. अनेक वेळा लाख प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. त्याचवेळी, लोक वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करतात, परंतु काही चुकांमुळे वजन कमी होत नाही.
आपल्या सभोवती आपण अनेकजण असे बघतो, की त्यांचे वजन कमी करण्यासाठी अक्षरश: धडपड सुरू असते. सांगितल्याप्रमाणे डाएट, वर्कआऊट ते नियमितपणे करतात. पण तरीही त्यांना अपेक्षित असतो, तसा फरक त्यांच्या वजनात दिसत नाही. त्यामुळे साहजिकच अनेक जण वैतागून जातात आणि आपली अंगकाठीच अशी आहे, असं मानून मग सगळे प्रयत्न थांबवतात. परंतु असे करणे अतिशय चुकीचे आहे. वजन कमी न होण्यामागे, महत्वाचे कारण म्हणजे वजन कमी करण्यासाठी काही योग्य पद्धतींचा अवलंब न करणे, यामुळे वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागते. न्यूट्रिशनिस्ट सिमरन कौर यांनी अशी ५ कारणे सांगितली आहेत, ज्यामुळे वजन कमी होत नाही. वजन कमी न होण्यामागील नेमकी प्रमुख ५ कारणे कोणती ? ते पाहूयात(Not Losing Weight ? 5 Reasons Why That Happens Even When You're Doing Everything Right).
वजन कमी न होण्यामागील प्रमुख ५ कारणे :-
१. वारंवार जेवण स्किप करणे :- बहुतेक लोक त्यांच्या वजन कमी करण्याच्या रुटीनमध्ये जेवण स्किप करण्याची सर्वात मोठी चूक करतात. जर आपल्याला वाटत असेल की जेवण सोडून आपण खूप वजन कमी करू शकता, तर हे संपूर्णपणे चुकीचे आहे. वारंवार जेवण स्किप केल्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. चयापचय क्रियेचा वेग मंद झाल्याने आपल्या शरीरातील कमी कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं असत. वजन कमी करण्यासाठी आपण काय खातो हे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जेवण सतत स्किप करण्यापेक्षा निरोगी व संतुलित आहार घेणे गरजेचे असते.
२. फक्त डाएटवर अवलंबून राहणे :- वजन कमी करण्यासाठी निरोगी व संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. परंतु केवळ आहाराने वजन कमी होणार नाही. यासाठी आपल्याला शारीरिक हालचालींकडेही लक्ष द्यावे लागेल. जर आपल्याला जास्त व्यायाम करता येत नसेल तर जेवणानंतर थोडा वेळ तरी चालावे. यामुळे आपल्याला थोडा फरक जाणवेल. वजन कमी करण्यासाठी केवळ डाएटवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. योग्य व संतुलित डाएट बरोबरच दररोज व्यायाम करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. फक्त डाएटवर अवलंबून राहून वजन कमी होत नाही.
३. हार्मोनल असंतुलनचे परिणाम :- वजन कमी न होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन. इन्सुलिन रेझिस्टन्स, PCOD, थायरॉईड आणि इतर काही हार्मोन्स आपल्या वजनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे वजन कमी करताना हार्मोनल संतुलनाकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे आहे.
४. ताण - तणावयुक्त जीवनशैली :- कधीकधी आपल्या सर्वांनाच ताण - तणावाचा सामना करावा लागतो. पण जर आपण दीर्घकाळ तणावाखाली असाल तर त्याचा तुमच्या वजनावर परिणाम होऊ शकतो. स्ट्रेस हार्मोन्स वाढल्याने इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीरात चरबीचा साठा वाढू शकतो. यासाठी तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करावा. रोजच्या जीवनातील ताण - तणाव कमी करण्यासाठी आपण योग आणि ध्यानाची मदत घेऊ शकता.
५. पुरेशा झोपेचा अभाव :- वजन कमी करण्यासाठी, आपण या घटकाकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. वजन कमी करण्याच्या रुटीनमध्ये, ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. जर आपल्याला रात्रीची चांगली झोप येत नसेल तर वजन कमी करणे कठीण होईल. पुरेशी झोप घेतल्याने हार्मोन्स, तणावाची पातळी आणि भूक लागण्याची सवय नियंत्रणात राहते. वजन कमी करण्याच्या रुटीनचे योग्य प्रकारे पालन करण्यासाठी झोप खूप महत्वाची असते.