Join us  

रोजच्या जेवणात वाटीभर तुरीचं वरण खाण्याचे 5 फायदे, पारंपरिक तुरीचं वरण डाएट करतानाही विसरू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2022 1:36 PM

आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने कोणती डाळ पोषक ठरते? असा प्रश्न पडल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला प्रमाण मानावा. आरोग्य तज्ज्ञ वजन आणि पोषण याचा विचार करुन जेवणात तुरीच्या डाळीचा (health benefits of pigeon pea in diet) समावेश करण्यास सांगतात. 

ठळक मुद्देतुरीच्या डाळीमुळे वजन कमी होतं आणि शरीरास आवश्यक पोषणही मिळतं.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते. मधुमेहाच्या समस्येतही तुरीची डाळ फायदेशीर ठरते. 

रोजच्या आहारात डाळींचं महत्व अनन्यसाधारण आहे. डाळींचे अनेक प्रकार आहेत, त्यातून आरोग्यासाठी कोणती डाळ महत्त्वाची असा प्रश्न पडल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला प्रमाण मानावा. आहारतज्ज्ञ डाॅ. अर्चना बत्रा  फिटनेस राखण्यासाठी तुरीची डाळ (pigeon pea)  खाण्याचा सल्ला देतात. तुरीची डाळ (tur dal)  आहारात असली तर अनेक आरोग्य समस्या आणि पोषणाची कमतरता (nutritional benefits of pigeon pea)  दूर होते. तुरीच्या डाळीमध्ये फोलिक ॲसिड, लोह, प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि पोटॅशियम हे महत्वाचे घटक असतात. तसेच तुरीच्या डाळीत पचनासाठी महत्वाचे असे झिंक, काॅपर, सिलेनियम, मॅग्नीज हे घटक देखील असतात. तुरीच्या डाळीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं वजन कमी करण्यासाठी तुरीच्या डाळीची (tur dal for weight loss)  मदत होते.  आरोग्यदायी पध्दतीनं वजन कमी करण्यासाठी आणि शरीरास योग्य पोषण मिळण्यासाठी नियमित आहारात तुरीची डाळ असणं महत्वाचं असतं. 

Image: Google

जेवणात तुरीची डाळ हवी कारण

1. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तुरीची डाळ खूप महत्वाची आहे. तुरीच्या डाळीचा नियमित आहारात समावेश असल्यास वजन वेगानं कमी होण्यास मदत होते.  तुरीच्या डाळीमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. तसेच तुरीच्या डाळीतून शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतात. तुरीच्या डाळीत असलेल्या प्रथिनांमुळे शरीरात पेशींची निर्मिती होण्यास मदत होते. 

2. तुरीच्या डाळीत पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हदयविकाराचा धोका असतो. हा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रित करणं आवश्यक असतं. यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग होतो. 

3. अन्नाचं पचन नीट होण्यासाठी फायबरला महत्व आहे. तुरीच्या डाळीत फायबरचं प्रमाण जास्त असतं. तुरीची डाळ सेवन केल्यानं पचनाच्या समस्या दूर होतात. अन्नाचं नीट पचन होवून शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, दिवसभर उत्साह टिकून राहाण्यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग होतो. 

Image: Google

4. तुरीची डाळ मधुमेहाच्या समस्येतही फायदेशीर ठरते. कारण तुरीच्या डाळीत पोटॅशियम असतं. रक्तातील साखर कमी करण्यासाठी हा घटक महत्वाचा असतो. तुरीच्या डाळीतील पोटॅशियम रक्तातील साखर नियंत्रित करणारं  वॅसोडिलेटरसारखं काम करतं. 

5. गरोदर महिलांसाठी तर तुरीच्या डाळीचं सेवन अतिशय फायदेशीर असतं. कारण तुरीच्या डाळीत फोलिक ॲसिड असतं. गर्भाचा विकास होण्यासाठी हा घटक अतिशय महत्वाचा असतो. 

Image: Google

तुरीची डाळ कोणास आणि कशी अपायकारक?

तुरीच्या डाळीत आरोग्यास फायदेशीर पोषक तत्वं असली तरी विशिष्ट प्रकारच्या आरोग्य समस्यांमध्ये तुरीची डाळ खाणं अपायकारक ठरतं असं डाॅ. अर्चना बत्रा सांगतात. ज्यांचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं त्यांनी तुरीची डाळ खाऊ नये. किडनी संबंधित काही समस्या असल्यास तुरीची डाळ आहारात वर्ज्य ठरते.  तुरीची डाळ रात्री न खाता सकाळच्या जेवणात खावी. रात्री तुरीची डाळ नीट पचत नाही. तसेच तुरीच्या डाळीत काही अमीनो ॲसिडसची कमतरता असल्यानं तुरीच्या डाळीसोबत पोळी किंवा भात अवश्य खावा.

टॅग्स :आहार योजनाअन्नवेट लॉस टिप्स