आपण रोज सकाळी उठल्यापासून घरातली कामं करतो, घाईने सगळं आवरुन ऑफीसला पोहोचतो. दिवसभर ऑफीसचा ताण असतोच. घरी आल्यावर पुन्हा घरातले. हे सगळे करताना आपली बरीच धावपळ होते. घाईघाईने सगळ्या गोष्टी करत असताना ना शरीराला आराम असतो ना मेंदूला. मग वजन वाढायचं नेमकं कारण तरी काय असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो (Weight loss Tips for Working Women). पण अशी सगळी धावपळ आपण करत असलो तरी ऑफीस रुटीनमधल्या काही गोष्टींकडे आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही आणि याच गोष्टी आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. तेव्हा कितीही घाईगडबड असली तरी ४ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या म्हणजे वजनावर नियंत्रण येण्यास नक्कीच मदत होईल (Office Habits that Make You Fat).
१. नाश्ता न करणे
अनेकदा आपण घाईघाईत घरातली कामे, आपले आवरणे आणि वेळेत ऑफीसला पोहोचणे या नादात नाश्ता करत नाही. घरात बाकी सगळ्यांचे करता करता आपल्याला शांत बसून खायला वेळ होत नाही. ऑफीसला पोहचून नाश्ता करु असे म्हणून आपण जातो खरे पण समोर कामाचा डोंगर असतो आणि त्यामुळे परत नाश्ता मागेच राहतो. असे करता करता जेवणाची वेळ येते. मात्र सकाळी नाश्ता न करणे आरोग्याच्या आणि वजन वाढण्याच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे.
२. नाश्ता न केल्याने एकाचवेळी जास्त जेवणे
नाश्ता न केल्याने आपल्या पोटात जेवणाच्या वेळेपर्यंत कावळे कोकलत असतात. मग जेवायला बसले की आपल्याला किती खाऊ आणि किती नको असे होते आणि भुकेच्या नादात आपण प्रमाणापेक्षा ४ घास जास्तच खातो. असे अकदम खूप जास्त जेवणे आरोग्यासाठी चांगले नसते. विशेष म्हणजे हे खाऊन आपण परत कामाला बसतो त्यामुळे शरीराची कोणतीच हालचाल होत नाही. त्यामुळे चरबी साठत जाते आणि आपली जाडी वाढते.
३. पॅकेट फूड किंवा गोड खाणे
सकाळी नाश्ता न केल्याने किंवा जेवणानंतरही काम करता करता आपल्याला काहीतरी चाळा हवा असतो. दर काही वेळाने आपल्याला काहीतरी गोड किंवा कुरकुरीत खावेसे वाटते. अशावेळी आपण बिस्कीटे, चिप्स किंवा पॅकेटमधील काही ना काही खात राहतो. हे चटकदार पदार्थ एकदा खाल्ले की आणखी खावेसे वाटतात. मात्र यामध्ये सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण जास्त असते. तसेच मीठ, साखर, तेल यांसारख्या गोष्टींचे प्रमाणही जास्त असल्याने वजन वाढण्यास हे घटक कारणीभूत ठरतात.
४. बाहेरचे खाणे आणि चहा-कॉफी
साधारणपणे आपण घरात असलो की घरातलेच खाल्ले जाते. पण ऑफीसला असलो की संध्याकाळच्या वेळेला किंवा इतरांच्या नादाने बाहेरचे जास्त खाल्ले जाते. बाहेरच्या पदार्थांमध्ये शरीराला पोषण मिळेल असे काही नसते. मात्र सातत्याने असे जंक फूड खाल्ल्याने वजन वाढीची समस्या उद्भवते. ऑफीसमध्ये असलो की आपण कधी मिटींगच्या निमित्ताने तर कधी कामाचा ताण आल्यावर ब्रेक म्हणून बरेचदा चहा-कॉफी घेतो. चहा-कॉफी प्रमाणात घेतली तर ठिक आहे. पण यामध्ये असणारी साखर वजन वाढ होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे या चुका शक्यतो लक्षपूर्वक टाळल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.