फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे, हे आपल्याला माहितीच आहे. पण फळं जर योग्य पद्धतीने खाल्ली गेली, तरच ती आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतात, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे. बऱ्याचदा फळं खायची असतात, म्हणून आपण फक्त ती खात असतो. वेळ मिळेल तेव्हा एखादं फळ खायचं, असंही अनेक जणांचं ठरलेलं असतं. पण फळांपासून खरोखरच योग्य लाभ मिळवायचा असेल, तर दिवेकर यांनी सांगितलेलं फळं खाण्याचं शास्त्र आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे.
ऋजुता दिवेकर यांनी नुकताच एक व्हिडियो त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी फळं खाण्याचे ३ नियम सांगितले आहेत. हे नियम फॉलो करायला अतिशय सोपे आहेत. फक्त आपल्याला त्याबाबत माहिती नसल्याने आपण बऱ्याचदा कोणतंही फळ कधीही खाण्यास तयार असतो.
फळं खाण्याचे नियम१. फळांची मिक्सिंग नकोसगळी फळं खावीत एवढं आपल्याला पक्क माहिती असतं. म्हणून मग बऱ्याच घरांमध्ये घरात असलेली सगळ्या प्रकारची फळं एकेक करून कापली जातात आणि एका प्लेटमध्ये ठेवली जातात. यामागे सगळी फळं घरातल्या प्रत्येकाच्या खाण्यात यावीत, असा आपला चांगला उद्देश असतो. अनेकदा तर वेगवेगळ्या फळांनी भरलेल्या प्लेटवर चाट मसाला टाकून मस्तपैकी फ्रुट चाटही बनवलं जातं. पण अशी फळांची मिक्सिंग करू नका. एकावेळी एकच फळ खा, असं ऋजुता यांनी सांगितलं आहे. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे प्रत्येक फळाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. त्या प्रत्येक फळाचा लाभ होण्यासाठी एकावेळी एकच फळ खावे.
२. फळं कधी खायची ?हा प्रश्न अनेक लाेकांना पडलेला असतो. रात्री फळं खाऊ नये, हे बऱ्याच जणांना ठाऊक असतं. पण मग फळं खायची कधी हे मात्र कळत नाही. याचेही उत्तर ऋजुता यांनी या व्हिडियोद्वारे दिले आहे. त्या म्हणतात की, आपले फर्स्ट मील म्हणून आपण फळं खाऊ शकतो. वर्कआऊट केल्यानंतर आणि दोन जेवणांच्या मधल्या काळातही फळं खाण्यास हरकत नाही.
३. व्यवस्थित चावा, ज्यूस करू नकाअनेकदा फ्रुट ज्यूस किंवा फ्रुट मिल्क शेक करण्याकडे आपला कल असतो. पण फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा फळ खाण्यालाच प्राधान्य दिले पाहिजे असे ऋजुता यांचे म्हणणे आहे. फळं खाताना पण ओबडधोबड चावून लगेच गिळणे, असे करू नका. प्रत्येक फळ व्यवस्थित चावूनच खा.
हे देखील लक्षात ठेवासिझनल फळेच खाल्ली पाहिजेत, असेही ऋजुता यांनी या व्हिडियोमध्ये आवर्जून सांगितले आहे. तसेच फळे काटा चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खा, असेही त्या म्हणाल्या.