Join us  

वजन कमी करायचं तर पोहे खा, ही घ्या खास रेसिपी - चविष्ट पोहे आणि भरपूर पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 12:23 PM

Perfect Weight loss Poha Recipe for breakfast : खाण्याची आवड जपतानाच आहारातील पोषण वाढवण्यासाठी नेहमीच्या रेसिपीत करुया थोडे वेगळे बदल...

नाश्ता म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यात आधी जे पदार्थ येतात ते म्हणजे पोहे, उपमा, इडली हेच. पोहे आरोग्यासाठी चांगले असतात की नाही याबाबत बऱ्याच चर्चा कायमच रंगताना दिसतात. पोह्यामुळे वजन वाढते असे काही जण म्हणतात तर पोहे खाल्ल्याने वजन कमी होते असा म्हणणाराही एक गट आहे. करायला सोपे आणि सगळ्यांना आवडणारे असे पोटभरीचे असल्याने पोहे खाण्याला सगळ्यांचीच पसंती असते. यामध्ये कांदेपोहे, दडपे पोहे, दही पोहे, दूध पोहे असे वेगवेगळे प्रकार आपण करत असतो (Perfect Weight loss Poha Recipe for breakfast). 

पोह्यामध्ये कर्बोदकांचे, फायबरचे प्रमाण जास्त असते तसेच ते ग्लुटेन फ्री असतात. याच पोह्यांचे पोषण वाढवायचे असेल तर रेसिपीमध्ये थोडे बदल केल्यास नेहमीचेच पोहे जास्त पोषक ठरु शकतात. असे पोहे खाल्ल्यास वजन कमी होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. वजनवाढ ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पण हे वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपली खाण्याची आवड जपतानाच आहारातील पोषण वाढवण्यासाठी पोह्याची थोडी वेगळी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. यामुळे फॅटस तर वाढणार नाहीतच पण सकाळच्या वेळी नाश्त्यातून जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळण्यास मदत होईल. 

(Image : Google)

१. सुरुवातीला आपल्याला नेहमीप्रमाणे पोह्यांसाठी फोडणी करतो तशीच करायची आहे. फक्त यामध्ये तेलाचे प्रमाण कमीत कमी ठेवायचे. 

२. तसेच आपण तेलात शेंगदाणे घालून ते तळून घेतो तसे न करता भाजलेले दाणे सगळ्यात शेवटी  पोह्यात घालायचे आहेत.

३. घाईच्या वेळी आपण केवळ कांदा, टोमॅटो किंवा बटाटा घालून पोहे करतो. पण या पोह्यांमध्ये आपण कांदा घातल्यानंर यामध्ये मटार, गाजर यांसारख्या आपल्या आवडीच्या भाज्या आणि शिजवलेला हरभरा किंवा राजमा यांसारख्या बिन्स घालायच्या.

४. मग यामध्ये मीठ, हळद, तिखट, हिंग चवीपुरती साखर घालून सगळे चांगले परतून आणि मग काही मिनीटे वाफवून घ्यायचे.

५. सगळ्यात शेवटी यामध्ये पोहे आणि शेंगदाणे घालून हे पोहे खोबरं, कोथिंबीर घालून गरमागरम खायला घ्यायचे. 

६. भाज्या आणि बिन्स असल्याने पोह्यांचे पोषण नेहमीच्या पोह्यांपेक्षा नक्कीच वाढण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नपाककृती