वैद्य राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)
कोरोना झाला तर काय आहार घ्यायचा? हा गट अतिशय महत्वाचा आहे कारण या बाबतीत खूप गोंधळाचंवातावरण आहे. ताप येणं, तोंडाला चव नसणं, भूक कमी लागणं मळमळ, ऍसिडिटी अशी लक्षणं बहुतांशी कोरोना रुग्णांमध्ये बघायला मिळतात. आपण इतरवेळी सुद्धा ताप आला तर अतिशय हलका आहार देतो किंवाखाण्यापिण्याचा फार आग्रह करत नाही कारण ताप लवकर कमी व्हावा म्हणून, दोष पचावेत म्हणून शरीरालालंघनाची गरज असते हे आपण जाणतो. परंतु सध्या कोरोनाच्या रुग्णांना आहार सुचवताना मात्र त्यांच्यावर गरजनसलेल्या,उलट त्रासदायक ठरू शकेल ,पचायला जड असेल अशा आहाराचा मारा केलेला दिसतो. मोठ्या प्रमाणात अंडी, ब्रेड,पनीर,फळं यांचं सेवन लोकं करत आहेत हे मात्र चुकीचं आहे.या बाबतीत आयुर्वेदाचा दृष्टीकोन अतिशय महत्वाचा व योग्य आहे. ज्यावेळी ताप येतो,सर्दी,खोकला झालेला असतो तेव्हा शरीरात कफ दोष वाढतो, अग्नी मंद होतो त्यामुळे त्या व्यक्तीला भूक लागत नाही, पित्त वाढल्याने मळमळ होते,डोकं दुखतं, क्वचित आंबट कडू चवीची उलटी होते, जिभेची चव जाते, काहीच खाऊ नये असं वाटतं. हे सगळं नैसर्गिकरित्या शरीर लवकर नॉर्मल व्हावं ,ताप पट्कन कमी व्हावा यासाठी असतं त्यामुळे त्या भावनेचा आदरच करायला हवा. कारण भूक नसताना खाण्यामुळे, तेही पचायला अतिशय जड असे पदार्थ खाल्ले तर पचनशक्तीवर विनाकारण ताण येतो व दोषाचं पचन लवकर न झाल्यामुळे आजार पट्कन नियंत्रणात येत नाही. याउलट शरीराच्या या संकेतांकडे योग्य वेळी लक्ष पुरवून त्याप्रमाणे आहार विहार ठेवला तर लवकर बरं वाटतं ,या दृष्टीने आयुर्वेद काय सांगतो ते जाणून घेऊ.अग्नी लवकर प्रज्वलित व्हावा, दोषांचे पचन व्हावे म्हणून पाणी पिताना गरमच पाणी प्यावे. हे पाणी फक्तस्पर्शाला गरम नको तर एक द्वितीयांश म्हणजे अर्धे आटवलेले हवे. म्हणजे एक लिटर पाणी उकळून ते अर्धा लिटशिल्लक राहीपर्यंत आटवावे. त्यामुळे ते पचायला हलके होते आणि दोष पट्कन कमी करते.
१. भूक लागत नसेल तर भरपूर आहार घेण्याचा आग्रह न करता थोडावेळ लंघन केलं म्हणजे काहीही न खाता पिता राहिलं तरी हरकत नाही त्यामुळे नुकसान न होता फायदाच होतो.२. जेव्हा थोडी भूक लागेल तेव्हा तांदळाची अगदी पातळ पेज गरम असताना तूप जिऱ्याची फोडणी व मीठ घालून द्यावी.३. हिरवे मूग किंवा मुगाच्या डाळीचं कढण म्हणजेच पातळ सूप प्यावे. यातही तूप,जिरे,मीठ ,साखर घालायला हरकत नाही .४. आमसूल ,चिंच किंवा टोमॅटो यांचं फोडणी दिलेलं सार गरम गरम प्यावं.५. ताप कमी झाला ,भूक थोडी वाढली,जिभेला चव आली की थोडा घट्ट भात, मुगाचं वरण,तूप आणि लिंबू असंखायला हरकत नाही.
६. अजून दोन दिवसांनी मूग , तांदूळ यांची पातळसर खिचडी ,गायीचं तूप घालून ,सोबत लिंबाचं किंचित गोड लोणचं आणि मुगाचा थोडा भाजलेला पापड असं खावं. अशा पद्धतीने क्रमाने हळूहळू आहार वाढवत नेल्यामुळे अग्नी छान प्रज्वलित होतो,पचन सुधारतं व आजार चट्कन बरा होतो.७. चांगली भूक लागली की थोडी पोळी किंवा फुलका, वरणभात खायला द्यावे.८. भाज्या खायला सुरुवात केल्यावर लगेच खूप तेल,मसाला,नारळ,दाण्याचं कूट वगैरे घातलेल्या भाज्या न देतासाध्या भाज्यांपासून सुरुवात करावी. दुधी भोपळा, गिलकी, दोडकी,भेंडी, कोबी इ.९. पचन व अग्नी पूर्ववत होईपर्यंत कच्च्या भाज्या, सॅलड, पापड,कोशिंबीर ,चटण्या वगैरेचा समावेश आहारात करु नये.१०. नारळपाणी ,ज्यूस ,लस्सी ,मिल्कशेक्स वगैरे पेये चवीला कितीही चांगली लागत असली तरी पचायला जडअसतात त्यामुळे या अवस्थेत खाऊ नयेत. भूक वाढल्यावर देखील फळांचे रस न घेता फळं फोडी करून खाण्यावर भर द्यावा ,त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते .११. दही हे उत्तम प्रोटीन सोर्स आहे असं म्हणून खायला सांगितलं जातं परंतु त्याचे शरीरावर होणारे परिणाम बघणं आवश्यक आहे. दही चिकटपणा वाढवणारे , कफवर्धक आहे जे कोविड या आजारात घातक आहे, त्यामुळे दही मुळीच खाऊ नये. अगदी दूध देखील ताप आलेल्या अवस्थेत वर्ज्य आहे ,चौदा दिवस होऊन गेल्यानंतर कोमट पाण्यात केलेलं कोकम सरबत, लिंबू सरबत ,पन्हं चालेल पण ते देखील पेशंटचा विचार करून म्हणजे खोकला वगैरे पूर्ण बंद झालेला हवा !
१२.अंडी,सोयाबीन, टोफू,पनीर ,चीज हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत पण त्यांचे हेल्थ बेनिफिट्स मिळवण्यासाठीपचनशक्ती तितकीच स्ट्रॉंग हवी आणि म्हणूनच काहीही विचार न करता प्रोटिन्सचा नुसता मारा करत राहिलं तरफायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.१३. पेज,सूप,वरणभात वगैरे जो काही आहार रुग्ण घेत असेल त्यात गायीच्या तुपाचा वापर मात्र नक्की करावा. अग्नी वाढवणं, प्रतिकारशक्ती वाढवणं ,शरीराची झालेली झीज भरून काढणं अशी अनेक कार्ये तूप पार पाडते.१४. भूक वाढली की तांदूळ,रवा, शेवया यांची अर्धं दूध अर्धं पाणी घालून ,थोडी सुंठ पावडर घालून खीर करुन द्यायला चालेल.१५. राजगिरा लाडू, खजूर , साळीच्या लाह्या मधल्या वेळेला भूक लागली तर चालेल .१६. फळांमध्ये गोड मोसंबी ,डाळिंब व चिक्कू उत्तम ! १७. मुख्य काळजीचे डायग्नोसिस झाल्यापासून पुढचे पंधरा दिवस एकदा पार पडले की परिस्थिती गंभीर होण्याची, कॉम्प्लिकेशन्स उद्भवण्याची शक्यता पुष्कळ अंशी कमी होते .विश्रांती होते, अग्नी चांगला प्रज्वलित होऊन भूक व आहार वाढतो , अशक्तपणा दूर होतो तेव्हा पोस्ट कोविड काळात शक्तिवर्धक वेगळ्या आहाराची शरीराला रिकव्हरी साठी गरज असते .तेव्हा काय खायचं ते पुढील भागात पाहू !
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेद केंद्राच्या संचालक आहेत.)rajashree.abhay@gmail.comwww.ayushree.com