Join us  

नाश्त्याला रोज काय करायचं? वजन कमी करायचं तर ब्रेकफास्टला हवे ४ प्रोटीनयुक्त पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2022 11:22 AM

Protein Rich Breakfast Options For weight loss : दिवसाची सुरूवात प्रोटीनयुक्त डाएटने करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी

ठळक मुद्देरोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडत असेल तर तर घ्या ४ हेल्दी पर्यायप्रोटीन शरीरासाठी अत्यावश्यक असल्याने त्याचा आपली तब्येत चांगली राहायलाही फायदा होतो. 

वाढलेलं वजन कमी करायचं हा अनेकांपुढे मोठा टास्क असतो. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव यांमुळे वजन दिवसेंदिवस वाढतच जाते. मग नाश्त्याला काय खायचे, दुपारच्या जेवणात काय खायचे, रात्री किती वाजता आणि किती खायला हवे असे प्रश्न आपल्याला पडतात. कधी वजन कमी करण्यासाठी आपण डायटीशियनकडून डाएट प्लॅन घेतो. तर कधी जीम जॉईन करतो. पण वजन कमी करण्यासाठी डाएट करत असताना आपल्या शरीराला पुरेसे प्रोटीन आणि इतर घटक मिळणे आवश्यक असते. तसेच रोज ब्रेकफास्टला काय करायचे असा प्रश्न आपल्यापुढे असतोच. अशावेळी दिवसाची सुरूवात प्रोटीनयुक्त डाएटने करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी (Protein Rich Breakfast Options For weight loss)..

(Image : Google)

१. डाळी

डाळी आपण साधारणपणे आमटी करण्यासाठी वापरतो. डाळींमधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. मूग डाळ, हरभरा डाळ, तूर, मसूर, उडीद अशा सगळ्या डाळी प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असतात. ढोकळा, भजी, वडे, धिरडे अशा वेगवेगळ्या स्वरुपात आपण या डाळी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो. प्रोटीनबरोबरच डाळींमधून व्हिटॅमिन्स, खनिजे अशा इतरही आवश्यक गोष्टी मिळत असल्याने ब्रेकफास्टमध्ये विविध माध्यमातून डाळींचा अवश्य समावेश करावा. 

२. अंडी 

अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत असतो हे आपल्याला माहित आहे. अंड्यामुळे बराच काळ पोट भरलेले राहते त्यामुळे आपण नकळत कमी खातो. अंडी उकडून खाणे, ऑम्लेट, बुरजी, अंड्याचा भात अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण अंड्याचा आहारात समावेश करु शकतो. तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर शरीराची प्रोटीनची गरज भागवण्यासाठी अंडी जरुर खायला हवीत. एका अंड्यातून ६ ग्रॅम प्रोटीन मिळत असल्याने अंडी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

३. नटस 

नटस हा खायला अतिशय सोपा पदार्थ आहे. तसेच यामध्ये प्रोटीन आणि आरोग्यासाठी आवश्यक असणारे इतर उपयुक्त घटक असल्याने विविध प्रकारच्या नटसचा ब्रेकफास्टच्या वेळी आहारात अवश्य समावेश करावा. यामध्ये सुकामेवा, शेंगदाणे, फुटाणे, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या मगज बिया अशा नटस प्रकारातील गोष्टींचा अवश्य समावेश करावा. त्यामुळे वजन कमी होण्याबरोबरच प्रोटीन्सही चांगल्या प्रमाणात मिळते. 

(Image : Google)

४. पनीर 

लो कॅलरी डाएट करत असाल तर कॉटेज चीज म्हणजेच पनीरचा आहारात जरुर समावेश करायला हवा. पनीर पराठा, पनीर राईस किंवा नुसते पनीर ब्रेकफास्टमध्ये अवश्य घ्यायला हवे. दूधापासून बनलेले असल्याने यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. १०० ग्रॅम पनीरमध्ये ११ ग्रॅम प्रोटीन असतात. तसेच पनीरमध्ये कमी कॅलरीज असून कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्यहेल्थ टिप्स