मुंबई पोलिसांनी नुकतीच एक कारवाई केली आणि तब्बल २ हजार किलो बनावट पनीर जप्त केलं. हे सगळे भेसळीचे प्रकरण समोर आल्याने सर्वसामान्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे. पनीर आरोग्यासाठी चांगलं. म्हणून मग अनेक महिला आठवड्यातून एकदा घरी आवर्जून पनीर असणाऱ्या पदार्थांचा बेत करतात. यानिमित्ताने मुलांच्या आणि घरातल्या सगळ्यांच्याच पोटात काहीतरी पौष्टिक जावं, असा त्यामागचा विचार. पण पनीरच्या नावाखाली बाजारात काही वेगळंच मिळत असेल तर मात्र ते नक्कीच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच तुम्ही घरी आणत आहात ते पनीर शुद्ध की भेसळीचं (paneer is pure or fake?) हे तपासून पाहण्यासाठी काही खास टिप्स.. (how to identify fake paneer)
कशी ओळखायची पनीरमधली भेसळ (purity of paneer)
१. जे पनीर चावल्यानंतर रबरासारखं चिकट किंवा ताणल्या जात आहे, असं वाटतं ते भेसळीचं समजावं.
२. पनीरचा एक तुकडा हातावर घ्या आणि दोन्ही हातांनी त्यावर हलकाचा दाब देऊन चोळा. पनीर तुटलं नाही तर ते शुद्ध आहे असं समजावं. जर पनीर लगेचच मोकळं होऊन तुटत असेल तर त्यात भेसळ आहे.
घरी येणारं दूध किती शुद्ध हे कसं ओळखणार? दूधातली भेसळ ओळखण्यासाठी ५ टिप्स
३. शुद्ध पनीरचा रंग अगदी पांढरा शुभ्र आणि सुवास दुधासारखा असतो. भेसळीच्या पनीरचा रंग पिवळसर दिसून येतो. शिवाय त्याला सुवासही नसतो.
४. पनीर घरी आणल्यानंतर ते पाण्यात टाकून उकळवा. नंतर पाण्यातून बाहेर काढा. त्यावर आयोडिनचे काही थेंब टाका. पनीरचा रंग निळसर झाला तर त्यात भेसळ आहे असे समजावे. शुद्ध पनीरचा रंग आयोडिन टाकल्याने बदलत नाही.
५. सोयाबीन पावडर वापरूनही पनीरची शुद्धता ओळखता येते. यासाठी पनीर पाण्यात उकळून घ्या. पाण्यातून बाहेर काढा. हलकासा दाब देऊन त्यातले पाणी काढून घ्या. त्यावर सोयाबीन पावडर शिंपडा. १० मिनिटांनी तपासून पहा. पनीरचा रंग बदलून हलकासा लाल झाला असेल, तर ते भेसळीचं आहे. शुद्ध पनीरचा रंग बदलत नाही.