गव्हाच्या पोळीतील ग्लुटेनमुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळेच गव्हाच्या पोळी ऐवजी भाकरी खा असं तज्ज्ञ सांगतात. भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, नागली, मका असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आरोग्याचा आणि वजनचा (Bhakari for weight loss) विचार करता कशाची भाकरी खावी असा प्रश्न पडतो. आहारात नागलीची भाकरी आणि नागलीचे इतर पदार्थ (finger millet in diet) असण्याच्या महत्वाबद्दल आहार तज्ज्ञ सनाह गिल यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.
Image: Google
नागली खावी कारण
1. नागलीमध्ये अमीनो ॲसिड, प्रथिनं, आरोग्यदायी कर्बोदकं या पोषक घटकांचं प्रमाण जास्त असतं. नागलीच्या पदार्थांचं सेवन नियमित केल्यास शरीरातील ड जीवनसत्वाची कमतरता दूर होते. नागली हा ड जीवनसत्वाचा चांगला स्त्रोत मानला जातो. याशिवाय नागलीमध्ये क, ई ही जीवनसत्वं , कॅल्शियम, लोह ही खनिजं भरपूर प्रमणात असतात. नागलीमध्ये 15 ते 20 टक्के फायबर असतं. हे फायबर पचनासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचं असतं.
Image: Google
2. वजन कमी करण्यासाठी नागली आहारात अवश्य असावी. जेवताना नागलीच्या भाकरीसोबत इतर पदार्थही वजन कमी होण्यास सहाय्यभूत असायला हवेत. नागलीमध्ये ट्रिपटोफन नावाचं अमीनो ॲसिड असतं. ते भूक शांत करण्यासाठी महत्वाचं असतं. त्यामुळे नागलीची भाकरी आणि नागलीचे पदार्थ सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. नागलीमध्ये फायबर आणि पाॅलीफेनाॅल हे महत्वाचे घटक असतात. या घटकांच्या सहाय्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. नियमित आहारात नागलीचे पदार्थ असल्यास रक्तदाब नियंत्रणत राहातो. मधुमेह आणि हायपरटेंशन सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
3. रोजच्या आहारात नागली असण्याला महत्व आहे. पण नागली विशिष्ट वेळी खाणंच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. सकाळी नाश्त्याला आणि दुपारी जेवणात नागलीचे पदार्थ खावेत. सकाळी नाश्त्याला नागलीचे पदार्थ खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेलं राहातं. रात्रीच्या वेळेस नागलीचे पदार्थ खाल्ल्यास पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते. नागलीमध्ये प्रथिनं, कर्बोदकं हे घटक असल्यानं नागली ही सकाळच्या वेळेत सेवन करण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ सनाह गिल देतात.
Image: Google
4. नागलीची केवळ भाकरीच नाही तर अनेक प्रकारे नागलीचा समावेश आहारात करता येतो. नागलीच्या भाकरीसोबतच नागलीचा डोसा, नागलीच्या इडल्या, नागलीचे धिरडे, नागलीची उकड, नागलीची पेज , नागलीची खिचडी या पौष्टिक प्रकारात नागलीचा समावेश आहारात करता येतो. नागलीचा पापड हा आरोग्य आणि वजनाचा विचार करता तळून खाण्यापेक्षा भाजून खाणं फायदेशीर असतो.
Image: Google
5. वजन कमी होण्यासाठी नागलीचा लाडू खावा. एरवी लाडू सारखे गोड पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढतं म्हणून ते टाळायला सांगितले जातात. पण नागलीचे लाडू मात्र वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. नागलीचे लाडू करण्यासाठी 1 कप नागलीचं पीठ, अर्धा कप साजूक तूप, चवीनुसार गूळ आणि सुकामेवा पावडर घ्यावी. तूप गरम करुन त्यात नागलीचं पीठ मंद आचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजावं. पीठ भाजून झाल्यावर ते एका पसरट ताटात काढून ठेवावं. पीठ कोमट असताना त्यात चवीनुसार किसलेला गूळ किंवा गूळ पावडर मिसळावी. मिश्रण एकजीव करुन त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. मधल्या भुकेच्या वेळेस किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यास नागलीचा लाडू खाणं फायदेशीर ठरतो.
6. पोषण मिळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नागलीचा उपयुक्त पदार्थ म्हणजे नागलीची खिचडी. नागलीची खिचडी करण्यासाठी 1 कप तांदूळ, अर्धा कप मुगाची डाळ, अर्धा कप नागली, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या, जिरे, हळद, तूप किंवा तेल आणि छोटा चमचा गरम मसाला घ्यावा. नागलीची खिचडी करण्यासाठी तांदूळ, डाळ, नागली स्वच्छ धुवून तासभर एकत्र पाण्यात भिजत घालावे. एक तासानंतर कुकरमध्ये तूप घालून ते गरम करावं. गरम तुपात फोडणीला जिरे घालावेत. हळद आणि हिंग घातल्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालावी. मिरची परतल्यावर त्यात डाळ-तांदूल आणि नागली घालून ते परतून घ्यावं. गरम मसाला घालावा. पाणी गरम करुन घालावं. मिश्रणाला उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावून शिट्या कराव्यात. गॅस बंद करुन कुकरची वाफ जिरली की वरुन कोथिंबीर घालावी. ही गरम खिचडी तूप घालून खावी.