वजनाचा काटा एकदा ठराविक आकडा ओलांडून पुढे सरकला की मग तो पुन्हा काही कमी होण्याचं नाव घेत नाही.
कारण मर्यादेच्या बाहेर गेलेलं वजन कमी करणं खूप कठीण असतं. त्यासाठी खूप हेवी डाएट आणि वर्कआऊट (diet and workout) रुटीन पाळावं लागतं. अनेक जणांंकडे तेवढा संयम, चिकाटी नसते, त्यामुळे मग वजन पुन्हा कमी करणं खूपच अवघड होऊन जातं. याउलट काही लोक असेही असतात, जे वजन कमी करण्यासाठी (weight loss tips) आटोकाट प्रयत्न करतात. पण तरीही त्यांचं वजन कमी होत नाही. वजन कमी होत नसेल तर त्यामागे अनेक कारणं आहेत. पण शरीरात काही व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी (deficiency of vitamins responsible for weight gain ) असणं हे त्यामागचं एक मुख्य कारणही आहे, असं नुकतंच काही अभ्यासावरून सिद्ध झालं आहे.
द मिरर यांच्या रिपोर्टनुसार काही अभ्यासकांकडून याबाबत नुकतेच सर्व्हेक्षण करण्यात आले. जर शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स नसतील तर शरीराची चयापचय क्रिया बिघडते आणि त्याचा परिणाम वजन वाढीवर होतो. या रिपोर्टमध्ये पुढे असं नमूद करण्यात आलं आहे की शरीरात जर व्हिटॅमिन डी ३ आणि व्हिटॅमिन बी १२ यांची कमतरता असेल तर वजन कमी करण्यासाठी निश्चितच अधिक त्रास होतो. कारण या दोन घटकांची कमतरता शरीरावर विशिष्ट प्रकारची सुज आणते आणि त्यामुळे व्यक्ती आहे त्यापेक्षा अधिक जाड दिसते.
व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे शरीरात नेमका काय बदल होतो?
व्हिटॅमिन डी ३ आणि व्हिटॅमिन बी १२ या दोघांचीही कमतरता असेल तर त्यामुळे अनेक वेगवेगळे त्रास मागे लागतातच. पण सगळ्यात मुख्य म्हणजे या दोन्ही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे शरीरात एडिपोकिन्स हे एक प्रकारचं प्रोटीन स्त्रवणं खूपच कमी होऊन जातं. या प्रोटीन्सचं कमी झालेलं प्रमाण चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझमवर परिणाम करतं आणि त्यामुळे ही क्रियाही अतिशय मंद होत जाते. त्यामुळे अन्नातील फॅट्स व्यवस्थित पचत नाहीत आणि मग शरीरावर चरबी साचण्याचे प्रमाण वाढत जाते. या प्रोटीन्सची कमतरता भूक वाढवते आणि डायबिटीज टाईप २ होण्याचा धोकाही अनेक पटींनी वाढतो.
हे पण लक्षात घ्या
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन यांच्यावतीनेही याविषयी एक अभ्यास करण्यात आला होता. यात जवळपास ९७६ लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्याचं वजन आणि त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन बी १२ चं प्रमाण याविषयी अभ्यास केला असता असं लक्षात आलं की जे लोक शरीराने अधिक स्थूल होते, त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होती. याच संस्थेतर्फे ५० ते ७५ या वयोगटातील काही महिलांचाही अभ्यास करण्यात आला. त्या महिलांकडून नियमित व्यायाम करून घेण्यात आला आणि त्यांना व्हिटॅमिन डी ३ सप्लिमेंटही देण्यात आली. ज्या महिला व्हिटॅमिन डी ३ सप्लिमेंट नियमितपणे घेत होत्या, त्यांचं वजन लवकरच कमी झालेलं या अभ्यासात दिसून आलं.