वैद्य राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)
कोरोना होऊन गेल्यानंतर म्हणजे साधारण पंधरा दिवस झाले की त्या रुग्णाला पोस्ट कोविड म्हटले जाते. ताप,
अंगदुखी, सर्दी किंवा वास,चव न जाणवणे वगैरे लक्षणे या कालावधीत कमी झालेली असतात ,आधुनिक चिकित्सा म्हणजे अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्स वगैरे देऊन झालेली असतात परंतु बहुसंख्य रुग्णांमध्ये दोन लक्षणं प्रामुख्याने आढळतात ती म्हणजे प्रचंड अशक्तपणा आणि खोकला ! काही पेशंट्स ज्यांना ऍडमिट करावं लागलं होतं किंवा ऑक्सिजन कमी झाल्यामुळे ऑक्सिजन द्यावा लागला होता अशा काही जणांना तो सपोर्ट घरी देखील काही दिवसांपासून ते महिन्यांपर्यंत घ्यावा लागल्याची उदाहरणे आहेत ,काही रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊन लढा देऊन सुरक्षितपणे पुन्हा त्यातून बाहेर आलेले अशा रुग्णांची संख्या ही काही कमी नाही. असे थोडे गंभीर होऊन बरे झालेल्या लोकांची सगळ्याच बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते परंतु आज आपण मोठ्या संख्येने बाधित झालेले पण होम क्वारंटाईन राहून व केवळ औषधोपचार घेऊन बऱ्या झालेल्या रुग्णांच्या बाबतीत विचार करणार आहोत. या लोकांना थकवा इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की आवाज अगदी खोल गेल्यासारखा वाटतो, थोडं बोललं तरी दमल्यासारखं वाटतं, कलकल होते ,थोडं काम केलं तरी लगेच झोपावं,विश्रांती घ्यावी असं वाटतं. हा जीवघेणा आजार आपल्याला होऊन गेला या मानसिक धक्क्यातून बाहेर यायला पण अनेकांना खूप वेळ लागतो, काहींना मानसोपचार, कौंसिलिंग यांची गरज पडते. लोकांकडून आलेले चांगले वाईट अनुभव, एकटेपणा, प्रचंड खर्च होणं, जवळच्या कोणा व्यक्तीला या आजारामुळे गमावणे अशी खूप वेगवेगळी कारणं दिसून येतात .
त्यामुळे नंतरची सर्वच प्रकारची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. शरीर आणि मन दोन्ही पुन्हा नॉर्मल व्हावेत, पूर्वपदावर यावेत म्हणून जे जे करणं शक्य आहे ते करायला हवं.अशक्तपणा जरी खूप असला तरी भूक मात्र
तितक्या प्रमाणात लागतेच असं नाही त्यामुळे पौष्टिक पदार्थांचा एकदम मारा करुन उपयोग होत नाही. एनर्जी
लवकर भरून यावी तसेच शरीराची झीज पटकन भरावी म्हणून मोठ्या प्रमाणात प्रथिनं खाण्याचा सल्ला दिला जातो व लोकं तो अगदी इमानेइतबारे पाळतातही परंतु जर पचनशक्ती तितकी बलवान नसेल ,कडकडीत भूक लागत नसेल तर या प्रोटिन्सचा काही म्हणावा तसा उपयोग होत नाही. दिवसातल्या तीन वेळेच्या डाएट मध्ये प्रोटिन्सचा भडिमार करणारे रुग्ण देखील आहेत म्हणजे, अंडी,मासे,मटण, चिकन, सोयाबीन ,पनीर ,चीज वगैरे सगळे पदार्थ आलटून पालटून खातात परंतु त्यांचं प्रमाण, रुग्णाचं वय,पचनशक्ती या सगळ्याचा विचार आहार ठरवताना व्हायला हवा.
अग्नी छान वाढावा ,घेतलेला आहार पचून अंगी लागावा,शक्ती लवकर वाढावी ,अशक्तपणा दूर व्हावा यासाठी
हळूहळू आहार वाढवत नेणे गरजेचे आहे.यासाठी पौष्टिक परंतु पचायला हलक्या पदार्थांचा वापर सुरुवातीला
करायला हवा .
खालील टिप्स यासाठी उपयोगी पडतील.
१. बरं वाटतंय म्हणून एकदम माठ किंवा फ्रिजमधील गार पाणी पिऊ नये त्यामुळे पचन मंदावते .थोडी सुंठ
आणि बडीशोप घालून पाण्याला एक उकळी आणावी व ते पाणी प्यावे त्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो शिवाय
शरीरात आजाराचे जे काही अंश शिल्लक असतात ते निघून जायला मदत होते
२. नाश्त्यासाठी भरपेट न खाता राजगिरा लाह्या,त्यांची वडी किंवा लाडू ,ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्यांचा
हळद हिंग, मीठ घालून केलेला चिवडा खावा ,
३. दहा बारा काळ्या मनुका,दोन खजूर ,अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे खायला हरकत नाही
४. तांदूळ, मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स, नागली यांची पेज तूप जिऱ्याची फोडणी देऊन चवीला मीठ,साखर
घालून प्यावी
५. हिरवे मूग,मसूर यांचं कढण म्हणजे थोडं कडधान्य भरपूर पाणी घालून शिजवून त्यातील फक्त पाणी
फोडणी घालून प्यावे
६. थोडी भूक वाढली की तांदुळाच्या पिठाची किंवा कणकेची धिरडी चालतील ,गूळ, तूप व गव्हाच्या पिठापासून
बनवलेले लाडू चालतील.
७. सर्व प्रकारचा सुका मेवा एकत्र करून त्याची पावडर करून ती अर्धा चमचा दुधात मिक्स करून घ्यावे. खोकला येत असेल तर दुधात थोडी हळद व सुंठ पावडर ऍड करावी
८. आहारात तुपाचा वापर अवश्य ठेवावा कारण ते एकाच वेळी अग्निवर्धक व शक्ती भरून काढणारे आहे. जिथे
शक्य आहे तिथे तेला ऐवजी तुपाचा वापर करावा.
९. जेवणात गरम चिंचेचं,आमसुलाचं सार, टोमॅटो सूप घ्यावे .मांसाहारी लोकांनी चिकन सूप,मटण सूप
घ्यायला हरकत नाही.
१०. गोड व ताजी ,सिझनल फळे खावीत पण ती थंड नसावीत. चिकू, सफरचंद, संत्री, मोसंबी ,पपई चालतील.
केळी, पेरु, सीताफळ मात्र टाळावेत.
११. कढी कधीतरी चालेल पण गार ताक किंवा दही मुळीच नको ( दही उत्तम प्रथिनांचे सोर्स आहे वगैरे काहीही
थिअरी इथे नको ,ताक ,दही नाही म्हणजे नाही.....)
१२. आहार परिपूर्ण ,ताजा व गरमच घ्यावा ,त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते
१३. जेवणात सॅलड्स,मोड आलेली कच्ची कडधान्ये, लोणची ,पापड यांचा वापर करु नये, क्वचित
नागलीचा,मुगाचा भाजलेला पापड चालेल
१४. चहा मसाला घालून किंवा सुंठ,मिरे,वेलची घालून केलेला चहा दिवसातून दोन वेळा चालेल
१५. आहारात आलं,लसूण,पुदिना, जिरे,दालचिनी इ मसाल्यांचा नियंत्रित वापर करावा.
१६. एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार पाच वेळा विभागून थोडं थोडं खावं.
१७. तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने च्यवनप्राश किंवा त्यासारख्या ज्या रसायनाची गरज असेल ते पुढे तीन ते सहा
महिने घ्यावे ,प्रतिकारशक्ती वाढवणं व टिकवून ठेवणं हे विशेषतः कोरोनाच्या बाबतीत अतिशय महत्वाचं
आहे कारण एकदा होऊन गेल्यावर पुन्हा होण्याची शक्यता या आजारात नाकारता येत नाही.
१८. शक्ती भरुन आली ,भूक नॉर्मल झाली की नेहमीचा आहार घेतला तरी चालतो .
इतर आजारांपेक्षा वेगळा व विचित्र असा कोरोना हा आजार आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत सर्वच प्रकारची दक्षता
घेणं गरजेचं आहे हे मात्र नक्की !
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेद केंद्राच्या संचालक आहेत.)
rajashree.abhay@gmail.com
www.ayushree.com