शरीराचं योग्य पोषण होण्यासाठी दोन वेळेसच्या जेवणाला खूप महत्त्व आहे. दोन्ही वेळेसचं जेवण कसं असावं तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणते तसं आकर्षक असावं. जेवण आकर्षक असणं म्हणजे जेवणात चटक मटक पदार्थ असणं नव्हे. जेवण आकर्षक असणं म्हणजे जेवणाच्या ताटात विविध रंगाचे पदार्थ असणं. शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पितळाच्या ताटात छोलेची पातळ भाजी, पनीरची भाजी , मिक्स व्हेज, तूप लावलेली भाकरी, कांदा आणि बीट हे पदार्थ दिसतात. पाहाता क्षणी हे ताट मनात भरतं. या फोटोला कॅप्शन देताना शिल्पा शेट्टी म्हणते, की आपल्या जेवणाच्या ताटाला इंद्रधनुष्याचे रंग असावेत. जे डोळ्यांना छान वाटतं ते शरीरासाठीही पोषक असतं. शरीर, मन आणि आत्माचं पोषण करणाऱ्या जेवणासाठी आभार !
का हवं ताटात रंगवैविध्य?
शिल्पा शेट्टीने जेवणाच्या ताटातील रंगाविषयी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमधून जे भाष्य केलं आहे त्याला शास्त्रीय आधार आहे. याबाबत नाशिक येथील सुप्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य राजश्री कुलकर्णी ( एम डी. आयुर्वेद) म्हणतात , की ताटात विविध रंगाचे पदार्थ असल्यास त्यातून शरीराची सूक्ष्म घटकांच्या पोषणाची गरज भरुन निघते.आपल्या जेवणात जितके रंग जास्त तितकं आपला आहार परिपूर्ण होतो. आधुनिक शास्त्राने वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यातील, फळातील पोषक घटकांचा शोध लावला आहे. शरीरात कोणत्याही घटकाची कमतरता निर्माण होवू नये यासाठी आहारात सर्व रंगाच्या भाज्या-फळांचा समावेश असावा असं अभ्यास सांगतो. शिजवलेल्या अन्नासोबतच म्हणजे डाळ, भात, भाजी पोळी यासोबतच कच्च्या स्वरुपातील भाज्यांचा समावेश आहारात असायला हवा.
Image: Google
आहारात कच्च्या स्वरुपातल्या भाज्यांचा समावेश जास्त असल्यास त्यातील पोषक घटक शरीराकडून चांगल्या प्रमाणात शोषले जातात. आयुर्वेदानुसार आपल्या आहारात चटण्या, कोशिंबीरी,रायतं यास्वरुपात कच्च्या भाज्यांचा समावेश करण्याची पध्दत पूर्वापार चालत आली आहे. कच्च्या स्वरुपातील भाज्या खाण्याला महत्व आहे कारण त्यावर शिजवण्याचा अग्नीसंस्कार होत नाही. त्यामुळे या भाज्यातील पोषक घटक मूळ रुपात शरीराला मिळतात. शरीरात घातक घटक तयार होतात. ते होव् नये यासाठी कच्च्या भाज्यातील ॲण्टिऑक्सिडण्टस महत्त्वाचे असतात. रंगीबिरंगी कच्च्या भाज्या खाल्ल्याने त्यातील रेषीय घटकांचा अर्थात फायबरचा फायदा चयापचयास, पचन व्यवस्थेला होवून मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत होते. विविध रंगाच्या भाज्या कच्च्या स्वरुपात खाल्ल्याने शरीराला त्यातील कॅन्सरविरोधी घटक, हदयरोगाचा धोका कमी करणाऱ्या घटकांचाही लाभ होतो. या भाज्यांमधील पोषण मुल्यांमुळे शरीरातील कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित राहातं .
Image: Google
रोजच्या जेवणात विविध रंगाच्या भाज्या खाण्यातही वैविध्य हवं. जेवणात कधी पांढरा रंगाचा मुळा, कधी लाल रंगाचं बीट, हिरव्या रंगाची ब्रोकोली, पिवळ्या रंगाची सिमला मिरची, हिरव्या रंगाचे लेट्यूस, काकडी. पालक, मेथीची पचडी, कोबीची पचडी अशा प्रकारची विविधता असल्यास शरीराची पोषक घटकांची गरज रोजच्या आहारातून पूर्ण होते. रोजच्या जेवणात विविध रंगांच्या भाज्या फळं यांचा समावेश असल्यास पोषणाची कमतरता निर्माण होत नाही आणि ती भरुन काढण्यासाठी औषध स्वरुपातल्या सप्लिमेण्टसची गरज भासत नाही. शरीराकडून सप्लिमेण्टस्मधील पोषण मूल्य जेवढी शोषली जातात त्यापेक्षा अधिक पोषण मुल्यं विविध रंगांच्या भाज्या कच्च्या स्वरुपात खाल्यास शरीराकडून शोषली जातात. म्हणून जेवणात विविध रंगाच्या भाज्या कच्च्या स्वरुपात खायला हव्यात. केवळ विविध रंगांच्या भाज्याच नाही तर विविध उसळींच्या कोशिंबीरीही जेवणात आवश्यक असतात.आपल्याकडील मसाल्यांचे प्रकार पाहाता कच्च्या स्वरुपातील भाज्या विविध मसाल्यांच्या आधारे चविष्ट करुन खाता येतात.
Image: Google
वजन कमी करण्यासाठी विविध रंगांच्या भाज्या कच्च्या स्वरुपात खाल्ल्याने फायदा होतो. जेवताना सर्वात आधी कच्च्या स्वरुपातील भाज्या सॅलेड किंवा कोशिंबीर / रायते स्वरुपात खाल्यास शरीराला पोषक घटक मिळतात. हे खाण्यास वेळ लागतो. त्यामुळे पोट भरण्याची जाणीव निर्माण होते. अनावश्यक पदार्थ जास्तीचे खाणं टाळलं जातं. त्यामुळे आयुर्वेद सांगतं जसं गोड पदार्थ जेवणाच्या आधी खायला हवेत ( जेवताना गोड पदार्थ आधी खाल्ला तर नंतर किती भूक राहाते यावर किती जेवण करायचं ते ठरतं. जास्तीचं खाणं यामुळे टाळलं जातं.) तसेच विविध रंगाच्या भाज्या कच्च्या स्वरुपात जेवताना सर्वात आधी खाल्ल्यास त्याचा फायदा पोषण मिळण्यासाठी आणि भूक भागण्यासाठी चांगला होतो.