Join us  

उकड काढून केलेले ज्वारीचे फुलके खा, शिल्पा शेट्टीचा वेटलॉस फॉर्म्युला- जुनं ते सोनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 7:16 PM

शिल्पा शेट्टी म्हणते, रोजच्या आहारात ज्वारीचे फुलके खावेत. ज्वारीचे फुलके खाऊन वजन कमी करणं, विविध आरोग्य समस्या सोडवणं सहज शक्य आहे.

ठळक मुद्देज्वारीत फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पचन सुधारण्यास मदत होते. ज्वारीची भाकरी किंवा फुलके खाल्ल्याने शरीरास ऊर्जा मिळते. शरीर आणि मन ताजंतवानं राहातं.भाकरी करणं अवघड वाटत असल्यास ज्वारीच्या पिठाची उकड घेऊन त्याचे फुलकेही करता येतात. 

आधुनिक जगात आपलं जगणं सुलभ करणारी अनेक साधनं आली आहेत. या साधनांमुळे रोजच्या आयुष्यातील कामं सोपी झाली एवढंच नाही तर या आधुनिक साधनांमुळे जगण्यालाही आधुनिकतेचे परिमाण लाभले. यामुळे काही प्रश्न सुटले, काही निर्माण झाले.  तर काही प्रश्न हे आधुनिक जीवनशैलीने सुटेनासे झाले. वाढणारं वजन, वजन नियंत्रित ठेवण्यात येणाऱ्या अडचणी ही समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक उपाय सांगितला आहे. हा उपाय ती स्वत: रोजच्या आयुष्यात रोज करते आहे. शिल्पा शेट्टी म्हणते आजच्या धावपळीच्या आयुष्यात वाढणारं वजन अनेक गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देत आहे. ते टाळायचं असल्यास वजन कमी करणं, नियंत्रणात ठेवणं हाच उपाय आहे. शिल्पा म्हणते वजन कमी करायचं तर आहाराकडे लक्ष द्यायला हवं. आहाराचा विचार करताना केवळ आपली आवड निवड  बघून चालत नाही तर आपल्या वजनावर खरंच कोणत्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो? कोणत्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम होतो याचा विचार करणं आवश्यक आहे.

Image: Google

 शिल्पा शेट्टी म्हणते, रोजच्या आहारात ज्वारीचे फुलके खावेत. ज्वारीचे फुलके खाऊन वजन कमी करणं, विविध आरोग्य समस्या सोडवणं सहज शक्य आहे. केवळ वजन कमी केल्याने फिटनेस राहात नाही. त्यासाठी पचन, चयापचय या क्रियाही सुरळीत असाव्या लागतात. या क्रियांना ज्वारीचे फुलके खाऊन चालना मिळते. चयापचय क्रियेचा वेग वाढतो, पचन नीट होतं त्याचा परिणाम म्हणजे वजन कमी होतं. 

शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमधून ज्वारीच्या फुलक्यांचे महत्त्व सांगितले आहे. भाकरी करणं अनेकांना अवघड काम वाटतं. भाकरी नीट जमण्यासाठी भाकरीचं पीठ नीट मळणं, भाकरी नीट थापता येणं, भाकरी व्यवस्थित भाजणं यांचा समावेश असतो.  एक जरी गोष्ट चुकली तरी भाकरी  बिघडते.  पण यावरचा उपायही शिल्पानं सांगितला आहे. ज्वारीची भाकरी करण्यापेक्षा ज्वारीचे फुलके करावेत. शिल्पानं इन्स्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडीओत उकड घेऊन ज्वारीचे फुलके केले आहेत.  उकड घेऊन ज्वारीचे फुलके करणं भाकरीच्या तुलनेत सोपे आहेत. सहज जमतात आणि ज्वारीचे फुलके हे भाकरी इतकेच पोषक ठरतात.

Image: Google

ज्वारीच्या पिठाची उकड घेऊन भाकरी

ज्वारीच्या पिठाची उकड घेऊन भाकरी करण्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी उकळलेलं पाणी, थोडं मीठ, थोडे काळे आणि पांढरे तीळ आणि थोडं साजूक तूप घ्यावं. 

सर्वात आधी  एका भांड्यात एक वाटी पाणी घालून त्याला उकळी काढावी. पाण्याला उकळी आली की त्यात थोडं मीठ आणि थोडं साजूक तूप घालावं. नंतर त्यात काळे पांढरे तीळ घालावेत. मग  ज्वारीचं पीठ घालून ते चांगलं घोटून घ्यावं. दोन मिनिटं भांड्यावर झाकण ठेवून वाफ काढावी. ताटाला आणि हाताला तुपाचा हात लावून ज्वारीच्या पिठाची उकड नीट मळून घ्यावी. पोळपाटावर आपल्याला हव्या त्या आकाराची लाटी घेऊन ती लाटावी. ज्वारीचा फुलका गव्हाच्या पिठाच्या फुलक्याप्रमाणे भाजून घ्यावा. त्याला थोडं तूप लावावं. ज्वारीचे हे फुलके खाल्ल्याने गव्हाची पोळी खाऊन होणारे तोटे टाळता येतात आणि वजन कमी करता येतं. 

Image: Google

ज्वारीचे फुलके खाण्याचे फायदे

1. ज्वारीचे फुलके खाल्ल्याने शरीराची 48 टक्के फायबरची गरज पूर्ण होते. अन्न नलिकेचं काम सुरळीत होतं. ज्वारीत फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पोटात गॅस धरणे, बध्दकोष्ठता होणे या समस्या ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने उद्भवत नाही.

2. ज्वारीच्या दाण्यावर जो थर असतो त्याचा फायदा कर्करोगाचा धोका कमी करण्यास होतो. ज्वारीची भाकरी किंवा फुलके खाऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

3. ज्वारीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात. शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं. रक्तातील लाल पेशी वाढून हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. 

Image: Google

4. ज्वारीमधील फायबरमुळे बॅड कोलेस्टेराॅल कमी होऊन स्ट्रोक येण्याचा, हदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. 

5. ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे ज्वारीची भाकरी किंवा फुलके खाऊन पोटदुखी होत नाही. 

6. एक कप ज्वारीत 22 ग्रॅम प्रथिनं असतात. त्यामुळेच ज्वारीची भाकरी खाऊन शरीराला ऊर्जा मिळते. ज्वारीची भाकरी / फुलके खाल्ल्याने ताजंतवानं वाटतं.  शरीरात नवीन पेशींच्या निर्मितीसाठी ज्वारी ही उपकारक असते. म्हणूनच एजिंगचे आरोग्यावर आणि त्वचेवर होणारे परिणाम टाळण्यासाठी ज्वारीची भाकरी खाणं उपयुक्त ठरते. 

7. ज्वारीत तांबं आणि लोह ही दोन खनिजं असल्याने रक्ताभिसरणास मदत होते. 

8 ज्वारीचा ग्लायसेमिक्स इंडेक्स कमी असतो. ज्वारीची भाकरी/ फुलके खाऊन रक्तातील साखर अचानक वाढत नाही. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सशिल्पा शेट्टीअन्न व औषध प्रशासन विभाग