हल्ली अनेकजण डायटिशियनचा सल्ला किंवा गुगल-व्हॉट्सॲप-इन्स्टा ग्यान वाचून सर्रास ठरवतात की आपल्या जेवणात भरपूर पालेभाज्या आणि उसळी हव्याच. बरं हे ठरवताना आपला व्यायाम, आपली लाइफस्टाइल, बैठं काम, पचनशक्ती याचा काहीही विचार केलेला नसतो. अनेकजण बाऊलभर पालकाची पानं, उकडलेले मूग दही घालून खाणं सुरु करतात. काहींना पचतं तर काहीना पित्तल पोटदुखी, जुलाब पोट फुगणं, गॅसेस होणं, काहींना कॉन्स्टिपेशन असे त्रास होऊ लागतात. त्यातही पावसाळ्यात तर पालेभाज्या आणि उसळी खाणं अनेकांना त्रास देतं. त्यामुळे आपण पालेभाज्या आणि उसळी खाव्यात की नाही, कधी किती खाव्या हे आपल्या तब्येतीवर अवलंबून असतं हे सूत्र कधीही विसरु नका.
पालेभाज्या आणि उसळी कुणी खाऊ नये?
मुळात कुणी खाऊ नये म्हणताना किती प्रमाणात खाऊ नये याचा विचार करायला हवा.
काहींची पचनशक्ती अगदीच आजारी असते त्यांनी अजिबात खाऊ नयेत. पण ज्यांना पोटाचे त्रास नाही त्यांनी अगदी थोडं, आठवड्यातून एकदा खाल्ले जेवणात तर काही बिघडत नाही. पालेभाज्या डाळीचं पीठ लावून, वरणात किंवा कोरड्या आपण पारंपरिक रीतीने खातोच. तेच उसळींचं. आठवड्यातून एकदा काही बिघडत नाही.
पण रोज सकाळी उपाशीपोटी वाडगाभर चणे, मूग, किंवा पालेभाजी खाणं हे सगळ्यांनाच पचत नाही. त्यासाठी आपल्या आहाराचा आणि जीवनशैलीचा योग्य विचार व्हायला हवा.
(Image : google)
वृद्ध व्यक्तींनीही उसळ फार खावू नये. त्यांनाही पचनाचा त्रास होवू शकतो.
पालेभाज्यात पालक मेथी अधिक खाल्ले तर पित्त त्रास अनेकांना होतो. त्यामुळे पालेभाजी तांदुळका, माठ, करडई, राजगिरा, शेवग्याची पानं या पालेभाज्या खाव्यात. पण प्रमाणात खाव्यात.
पालेभाजी आणि उसळ शक्यतो एकाच दिवशी एकाच जेवणात खाऊ नये.
(तज्ज्ञ मार्गदर्शन : विनया पाटील कुलकर्णी-आहार तज्ज्ञ)