ग्रीन टी हे पेय वजन कमी करण्यासाठी एक औषधासारखं प्रभावी काम करतं. पण औषध हे कितीही उपयुक्त असलं, फायदेशीर असलं तरी आपण ते सारखं घेत नाही. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या डोसेसप्रमाणे तेवढ्याच वेळात आणि नियंत्रित प्रमाणात घेतो. जर तसं केलं नाही तर मग औषधांचा फायदा होण्याऐवजी त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तसंच आहे ग्रीन टीचंही. ग्रीन टी वजन कमी करण्यास परिणामकारक आहे म्हणून अनेकजण दिवसभरात कितीही कप आणि दिवसाच्या कोणत्याही वेळेला ग्रीन टी पितात. पण आरोग्य तज्ज्ञ म्हणतात ग्रीन टी पिण्याची ही सवय अतिशय घातक असून या सवयीचे एक दोन नाही तर 10 दुष्परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे. म्हणूनच डॉक्टर्स , आहार तज्ज्ञ ग्रीन टी पिण्याचा सल्ला देताना तो किती वेळा आणि किती प्रमाणात घ्यावा याचाही सल्ला देतात.डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यास तज्ज्ञांना ग्रीन टीचे आढळून आलेले दुष्परिणाम आपल्यालाही अनुभवायला आल्याशिवाय राहणार नाही.
Image: Google
ग्रीन टी जास्त पिल्यास..
1. पोट बिघडतं
ग्रीन टी नियंत्रित प्रमाणात घेतल्यास ते उत्तम औषध आहे, पण ग्रीन टीचं प्रमाण जास्त असेल तर मात्र ती एक जोखीम असल्याचं तज्ज्ञ सांगतात. रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात ग्रीन टी घेतल्यास पोटात जळजळ होते. कारण ग्रीन टीमधे टॅनिन हा घटक असतो. हा घटक पोटात अँसिडचं प्रमाण वाढवतो. यामुळे बध्दकोष्ठता, अँसिड रिफ्लक्स या त्रासांसोबतच पचनाच्या समस्या निर्माण होतात. खूप गरम पाण्यात ग्रीन टी घेतल्यास या परिणामांची तीव्रता आणखीनच वाढते. ग्रीन टीचं प्रमाण खूप असल्यास डायरिया देखील होतो. ग्रीन टीमधील कॅफिन हा घटक आपल्याला आजारी पाडू शकतो. ग्रीन टी जास्त पिल्यास सारखं बाथरुमला जाण्याचाही त्रासही होतो. ग्रीन टीचा हा दुष्परिणाम टाळायचा असल्यास रिकाम्या पोटी ग्रीन टी न घेता दोन वेळेसच्या जेवणानंतर ग्रीन टी घ्यावा. किंवा कोणाला अँसिड रिफ्लक्सचा त्रास असेल्, पोटाचा अल्सर असेल तर त्यांनी ग्रीन टी पिणं टाळावं.
2. डोकेदुखी
ग्रीन टी जास्त प्रमाणात घेतल्यास , रिकाम्या पोटी घेतल्यास डोकंदुखीचा त्रास होतो. कारण ग्रीन टीमधे कॅफिन हा घटक असतो. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी अधून मधून ग्रीन टी घेतला तर चालतो. पण जर कोणाला रोजच डोकेदुखीचा त्रास असेल तर रोज ग्रीन टी पिल्यास या त्रासात आणखी वाढ होवू शकते. ज्यांना कॅफिनची अँलर्जी आहे त्यांनी ग्रीन टी पिणं टाळावं. यामुळेही डोकेदुखीचा त्रास वाढतो.
Image: Google
3. विस्कळित झोप
ग्रीन टीमधे कॅफीन असल्यानं त्याचा परिणाम झोपेवर होतो. ग्रीन टीमधे जरी थोड्या प्रमाणात कॅफीन असलं तरी ज्या व्यक्ती कॅफिनच्या प्रती संवेदनशील असतात त्यांनी जर ग्रीन टी घेतला तर मात्र त्याचा परिणाम त्यांची झोप विस्कळित होण्यावर होतो. झोपेसाठी मेलाटोनिन नावाचं संप्रेरकं पुरेशा प्रमाणात स्त्रवणं आवश्यक असतं. पण खूप वेळा, चुकीच्या पध्दतीनं ग्रीन टी घेतल्यास मेलाटोनिन या संप्रेरकात असमतोल निर्माण होतो. त्याचा परिणाम झोपेवर होतो. त्यामुळे ग्रीन टीमधे थोड्या प्रमाणात का होईना कॅफिन असतं आणि हे कॅफिन आपल्या झोपेवर विपरित परिणाम करु शकतं हे लक्षात ठेवून ग्रीन टी प्रमाणात आणि योग्य वेळी घ्यावा.
4. रक्ताची आणि लोहाची कमतरता
ग्रीन टीमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असतं. हा घटक जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास शरीरमधे लोहाचं शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो. आणि जर एखाद्याला आधीच अँनेमिया किंवा शरीरात रक्तकमतरता असेल तर त्यांच्यासाठी ग्रीन टी अतिप्रमाणात घेणं फारच धोकादायक आहे. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी ग्रीन टी घेताना त्यात लिंबू घालावं. लिंबात क जीवनसत्त्व असतं. या क जीवनसत्त्वामुळे शरीराक्डून अन्नपदार्थातील लोह शोषलं जातं. जेवणाआधी एकतास किंवा जेवल्यानंतर ग्रीन टी घेतलेला चालतो.
Image: Google
5. उलटी मळमळ
अधिक प्रमाणात ग्रीन टी घेतल्यास उलट्या होण्याचा त्रास होतो. ग्रीन टी मधे टॅनिन हा घटक असतो. या टॅनिन घटकाचं प्रमाण शरीरात जास्त झाल्यास ते आतड्यातील प्रथिनांचं प्रमाण कमी करतं. शरीरातील प्रथिनांचं प्रमाण कमी झाल्यास उलटीसारखं होणं, बध्दकोष्ठता यासारखे त्रास होतात. तज्ज्ञ सांगतात ग्रीन टी पिण्याची सवय असल्यास दिवसातून चार कपापेक्षा जास्त ग्रीन टी घ्यायला नको याची काळजी घ्यायला हवी.
6. यकृताच्या आजाराचा धोका
तज्ज्ञ म्हणतात की, ग्रीन टी जास्त प्रमाणात घेतल्यास त्यातील कॅफीन हा घटक यकृतावर घातक परिणाम करतो, यकृतावर या घटकामुळे दाब निर्माण होतो. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी रोज दोन कपापेक्षा जास्त ग्रीन टी घेणं टाळावं.
7. रक्तदाब आणि हदयाचे अनियमित ठोके
ग्रीन टीच्या साइड इफेक्टसवर झालेले अभ्यास सांगतात की ग्रीन टी मुळे हदयाचे ठोके अनियमित होतात. रक्तदाब अती प्रमाणात कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे ग्रीन टी हा जरी आरोग्यदायी असला तरी आपल्या तब्येतीला तो किती चालेल हे जाणून घेण्यासाठी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित असं तज्ज्ञ म्हणतात.
8. हाडांचा कमकुवतपणा
ग्रीन टीच्या अतिसेवनानं ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. ग्रीन टी मधील घटक शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतं. यामुळे हाडांवर परिणाम होतो. मुळातच ज्यांना हाडासंबंधी विकार आहेत त्यांनी कॅल्शिअम सप्लिमेण्ट चालू असतील तरच ग्रीन टी घ्यावा आणि तोही प्रमाणातच ,असा सल्ला तज्ज्ञ देतात.
Image: Google
9. गरोदर महिलांसाठी धोका
टॅनिन, कॅफिन आणि कॅटेचिन हे घटक गरोदरपणात धोका निर्माण करतात. तज्ज्ञ सांगतात की गरोदर स्त्रीनं किंवा स्तनपान करणार्या आईनं दिवसभरात फक्त दोन कप ग्रीन टी घेणं सुरक्षित आहे. ग्रीन टीमधला कॅफिन हा घटक आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात जातो. त्यामुळे स्तनपान करणार्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ग्रीन टी प्यावा.
10. गरगरणं, घेरी येणं
कॅफीन हा घटक शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास चक्कर येतात. कॅफिन हा घटक मेदू आणि मज्जातंतूत रक्तप्रवाह कमजोर करत. त्यामुळे चक्कर येणं, मळमळणं हे त्रास होतातल. अनेक जणांमधे ग्रीन टी जास्त प्रमाणात घेतल्यास त्यांच्या शरीरातील टिनिटस नावाचा द्राव वाढतो त्यामुळे कानात आवाज येण्याचा त्रास होतो.