दिवसभर बैठं काम आणि व्यायामाचा अभाव यांमुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढत जाते. एकदा चरबी जमा व्हायला लागली की ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. सतत जंक फूडचे सेवन, कामाचे आणि विविध गोष्टींचे असणारे ताण यांमुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्य़े लठ्ठपणा ही एक महत्त्वाची समस्या झाली आहे. त्यामुळे उद्भवणारे हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड यांसारख्या समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. पण आपण वेळीच वजनावर नियंत्रण मिळवले तर आरोग्याच्या समस्या गंभीर होण्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकू. आपल्याला सगळ्यात जास्त समस्या असते ती पोटावर आणि मांड्यांवर वाढलेल्या चरबीची. बैठ्या कामाच्या पद्धतीमुळेच ही अनावश्यक चरबी जमा झालेली असते. पण नियमितपणे व्यायाम केल्यास ही चरबी आपण नक्कीच कमी करु शकतो (Simple and Easy Exercise to get slim).
कोणता व्यायामप्रकार करायचा?
१. पोटातून खाली वाकण्याचा व्यायाम पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. यासाठी दोन्ही पायात खांद्याइतके अंतर घेऊन उभे राहायचे. दोन्ही हात वर करायचे आणि एकदा पोटातून उजव्या बाजूला, एकदा मध्यभागी आणि एकदा डाव्या बाजूला असे खाली वाकायचे.
२. अशाचप्रकारे एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून असे खाली वाकून गोलाकार फिरायचे. यामुळे पोटाच्या आजुबाजूच्या स्नायूंना व्यायाम मिळण्यास मदत होते. याठिकाणी ताण पडला की जमा झालेली चरबी हळूहळू कमी व्हायला लागली त्याची चांगली मदत होते.
३. यामध्ये हातापासून पायापर्यंत सर्व स्नायू आणि अवयवांचा व्यायाम होत असल्याने हा व्यायामप्रकार नियमितपणे करायला हवा. २० आकड्यांचे ३ सेट केल्यास त्यामुळे नकळत काही दिवसांत आपल्या वजनात आणि शरीरयष्टीमध्ये फरक दिसून येण्यास मदत होईल.