Weight Loss : दरवर्षी वजन वाढलेले लोक हा संकल्प करतात की, ते वजन कमी करण्यासाठी काहीही करतील. डाएट, एक्सरसाईज, योगा, फास्ट फूड बंद या सगळ्या गोष्टी करणार असा ते निश्चय करतात. पण वजन कमी करणं काही खाण्या इतकं सोपं काम नाही. फक्त वजन कमी करण्यासाठी आम्ही हे करू, ते करू असं म्हणून चालणार नाही. तर प्रत्यक्षात अनेक गोष्टींचं काटेकोर पालन करावं लागतं. यात जराही हलगर्जीपणा केला तर वजन कमी होणं तर सोडाच, उलट ते आणखी वाढेल. अशात वजन कमी करण्याचा ज्यांनी यावर्षीही संकल्प केला असेल त्यांना वैज्ञानिकांकडून एक इशारा देण्यात आला आहे.
सकाळचा नाश्ता महत्वाचा
स्पेनच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, सकाळी नाश्ता न केल्यास वजन कमी होण्याची प्रक्रिया तर स्लो होईलच, सोबतच शरीरासाठीही घाटत ठरू शकतं. रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, नाश्त्यात योग्य प्रमाणात कॅलरीचं इनटेक केल्यास वजन कमी करण्यास मदत तर मिळतेच, सोबतच आरोग्यासंबंधी अनेक धोकेही कमी होतात.
काय सांगतो रिसर्च?
बार्सिलोनाच्या एका हॉस्पिटलमध्ये ३८३ सहभागी लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, सकाळच्या नाश्त्यात २० ते ३० टक्के डेली कॅलरी इनटेक करणं सगळ्यात फायदेशीर असतं. हे प्रमाण पुरूषांसाठी ५००-७५० कॅलरी आणि महिलांसाठी ४०० ते ६०० कॅलरी दरम्यान असावं. रिसर्चनुसार, नाश्त्यात प्रमाणापेक्षा जास्त किंवा फार कमी कॅलरी घेणाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स २ ते ३.५ टक्के जास्त आढळून आला. त्याशिवाय त्यांच्या कंबरेचा घेरही २ ते ४ टक्के अधिक होता.
कसं काम करतो सकाळचा नाश्ता?
वैज्ञानिकांनी सांगितलं की, नाश्ता केल्यानं व्यक्तीला दिवसभर कमी भूक लागते. ज्यामुळे अनावश्यक स्नॅक्स खाणं टाळता येतं. या सवयीनं शरीराची कॅलरीची गरज कंट्रोल होते. पण केवळ कॅलरीचं प्रमाणच नाही तर नाश्त्याची क्वालिटीही महत्वाची आहे. हाय फॅट, मीठ आणि साखर असलेल्या पदार्थांमुळे आरोग्याचं नुकसान होतं. याउलट पोषक तत्व असलेला नाश्ता जसे की, मोड आलेलं कडधान्य, फळं आणि प्रोटीन असलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
वैज्ञानिकांचा सल्ला
रिसर्चचे लेखक प्रोफेसर एल्वारो हर्नाएज यांनी सांगितलं की, सकाळचा नाश्ता दिवसभरातील सगळ्यात महत्वपूर्ण आहार असतो. पण त्याचं प्रमाण आणि क्वालिटीही तेवढीच महत्वाची असते. आमचा रिसर्च एक सल्ला देतो की, सकाळचा नाश्ता वजन कमी करण्यासाठी आणि एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतो.