वाढलेलं पोट, मांड्यांवरची चरबी आणि एकूणच वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात. सततचे बैठे काम, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव आणि कामाचे ताण यांसारख्या जीवनशैलीविषयक गोष्टींमुळे वजन वाढत राहतं आणि ते कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं हे अनेकदा आपल्याला समजत नाही. मग कधी आहारात बदल करुन, जेवणाच्या वेळा आणि पद्धती बदलून पाहिल्या जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे उपाय केले जातात किंवा मित्रमंडळींनी सांगितलेल्या गोष्टी ट्रायल आणि एरर बेसिसवर केल्या जातात. पण काही वेळा यामुळे वजन कमी होण्याबरोबरच आणखी वाढण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आरोग्याबाबत कोणतीही गोष्ट ठरवताना तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेतलेला केव्हाही चांगला. वजन कमी करायचे म्हणून रात्रीचा आहार हलका घ्यावा किंवा रात्रीचे जेवण लवकर करावे हे ठिक आहे. पण म्हणून रात्रीचे जेवणच स्कीप करण्याचा प्रयोग बरेच जण मनानेच करतात. मात्र याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर सांगतात....
१. वजन कमी करणं म्हणजे कमी खाणं असा अनेकांचा समज असतो. मात्र तसे नसून कॅलरीज शरीरात घेण्याचे प्रमाण आणि व्यायामाद्वारे या कॅलरीज शरीराबाहेर टाकण्याचे प्रमाण यांचे संतुलन राखायला हवे.
२. सकाळी, दुपारी अशा दोन्ही आहारांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असायला हवे आणि संध्याकाळनंतर कॅलरीजचे प्रमाण कमी असायला हवे हे बरोबर आहे. मात्र अजिबातच न जेवणे हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही.
३. वजन कमी करायचे म्हणून तुम्ही रात्रीचे जेवण बंद करत असाल तर त्याचा उलटा परिणाम होतो आणि वजन कमी होण्याऐवजी ते वाढते. काहीही न खाता तसंच झोपलं तर वजन १० टक्क्यांनी वाढते असे काही संशोधनातूनही समोर आले आहे.
४. बरेचदा रात्री जेवायचं नाही म्हणून संध्याकाळी जास्त कॅलरीज असणाऱे पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तळलेले, चमचमीत, गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्याचा केवळ वजन वाढण्यावरच परीणाम होतो असे नाही तर इतरही आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो.
५. रात्री जेवलो नाही त्यामुळे खूप भूक लागून सकाळी उठल्यावर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळेही वजन वाढण्याचीच शक्यता जास्त असते.
६. त्यामुळे रात्रीच्या जेवणात चौरस आहार घ्यायला हवा. पण हा आहार हलका, कमी कॅलरीजचा असेल याची मात्र आवर्जून काळजी घ्यायला हवी.
७. एकाजागी बसून जेवणाऱ्यांचा आहार संतुलित असण्याची शक्यता जास्त असते. मात्र रात्री जेवायचे नाही असे करणाऱ्यांमध्ये मधून अधून सतत काहीतरी तोंडात टाकले जाते. पण हे टाळायला हवे.
८. वजन कमी करण्यासाठी आपण काय उपाय करतो हा प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, आहारविहाराच्या पद्धतीनुसार, ऑफीसच्या कामाच्या वेळा, घरातील इतर व्यक्तीचा आहार यानुसार ठरवायला हवी. त्यामुळे सरसकट प्रत्येकासाठी एकच आहाराची पद्धत वापरली जात नाही.
९. दुसऱ्या कोणाला रात्री जेवल्यामुळे फायदा झाला तर आपण ती पद्धत अवलंबल्याने कदाचित आपल्याला अॅसिडीटी होण्यासारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशापद्धतीचे प्रयोग करणे टाळावेत.
१०. वेटलॉस म्हणजे हळूहळू कॅलरीज कमी करणे, आहारातील पोषकता किंवा पोषणतत्त्वे कमी घेणे नाही. यातील फरक लक्षात घ्यायला हवा. नाहीतर कुपोषण होऊन त्याचा आरोग्यावर वेगळा परीणाम होऊ शकतो.
११. वजन कमी करतानाही शरीराला प्रोटीन, कार्बोहायड्रेटस, खनिजे, जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ या सगळ्याची गरज वजन कमी करतानाही शरीराला असते. या सगळ्याचे आराखडा मांडून योग्य ती आहारपद्धती अवलंबायला हवी.
१२. वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टींगची नवीन आहारपद्धती सध्या पुढे येत आहे. मात्र त्यातही तुम्ही मधल्या वेळेत पोषक स्नॅक्स घ्यायला हवेत. तरच त्याचा आरोग्याला फायदा होतो, अन्यथा तोटा होण्याचीच शक्यता जास्त असते.