सकाळी लवकर उठणं ही चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अनेकजण सकाळी लवकर उठतात. पण हा संकल्प काहीच दिवस टिकतो. कारण सकाळी जाग आली तरी उठून ऊर्जेनं कामाला लागावं असं वाटत नाही. झोप आल्यासारखी वाटते. अनेकांना खूप भूक लागते. त्यामुळे काही दिवस सकाळी लवकर उठण्याचा प्रयोग केल्यानंतर तो काही आपल्याकडून होत नाही म्हणून सोडून दिला जातो. पण सकाळी लवकर उठण्याचा त्रास होत असेल तर त्याचा संबंध रात्री नीट न झोपण्याशी, एकूणच आपल्या पचनसंस्थेशी असतो. तिथे गडबड, बिघाड किंवा काही समस्या असली की लवकर उठवलं जात नाही आणि उठलं तरी अंगातला आळस जात नाही. लवकर उठणं ही चांगली बाब आहे हे माहित असूनही केवळ आपल्याला ते जमत असं अनेकांचं म्हणणं असतं. यावर एक उपाय आहे. त्वचा आणि आहार तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्रेया यांनी तो उपाय सांगितला आहे. हा उपाय आहे सकाळी उठल्यावर भिजलेले बेदाणे खाण्याचा.
Image: Google
भिजवलेले बेदाणे खाल्ल्यानं काय होतं?
डॉ. श्रेया सांगतात की, बेदाण्यांमधे ऊर्जा, ब, क जीवनसत्त्व, लोह, पोटॅशिअम, अॅण्टिऑक्सिडण्टस सारखे पोषक घटक असतात. तसेच खनिजांसोबतच यात फायबरही असतं. मुळात बेदाणे म्हणजे सुकवलेली द्राक्षं. त्यामूळे द्राक्षातील गुणधर्म बेदाण्यांमधे शाबूत राहातातच. हे घटकच सकाळी लवकर उठल्यानंतर शरीर मनाला हवी असलेली ऊर्जा, ताजेपणा आणि पोटातील आगाऊ भुकेला शांतता देतात. सकाळी उठल्यानंतर सात ते आठ भिजवलेले बेदाणे खाल्ल्यास शरीराला खालील फायदे मिळतात.
Image: Google
१. भिजवलेल्या बेदाण्यांमधून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि ती दिवसभर टिकते.
२. हे असे बेदाणे खाल्ले की रक्तदाब नियंत्रित राहतो.
३. बेदाणे खाल्ल्याने आपली पचनव्यवस्था नीट काम करते.
४. सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी भिजवलेले बेदाणे खाल्ल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते.
५. हाडांच्या आरोग्यासाठी भिजवलेले बेदाणे फायदेशीर असतात.
६. शरीरातील रक्ताची कमतरता भिजवलेल्या बेदाण्यांमुळे भरुन निघते. अॅनेमिया हा आजार बरा करण्यास भिजवलेले बेदाणे सहाय्यभूत ठरतात.
Image: Google
बेदाण्यांचं पाणीही आहे आरोग्यदायी!
* भिजवलेले बेदाणे खाल्ल्याने शरीराला जसे अनेक फायदे मिळतात तसेच बेदाण्यांचं पाणी पिल्यानेही अनेक समस्या दूर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यकृताचं (लिव्हरचं) कार्य सूधारतं.
* बेदाण्यांचं पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. तसेच वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बेदाण्यांचं पाणी पिणे असं तज्ज्ञ सांगतात.
* ज्यांंना अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांना सकाळी उठल्यानंतर बेदाण्याचं पाणी पिल्याने आराम मिळतो. ही सवय नियमित ठेवल्यास पोटातील आम्ल त्यामुळे नियंत्रणात येऊन अॅसिडिटीचा त्रास दूर होतो.
* रक्त शुध्द करणं, हदय निरोगी ठेवणं , शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करणं यासाठी बेदाण्यांचं पाणी फायदेशीर असतं.
* बेदाण्यांमधे भरपूर प्रमाणात अॅण्टिऑक्सिडण्टस असतात, ते शरीराचं कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतं. बेदाण्यांच्या पाण्यमधेही हेच गुणधर्म उतरतात.
* बेदाण्याचं पाणी पिल्याने रोगप्रतिकाराशक्ती वाढते. सतत लहान सहान आजारांनी त्रस्त असलेल्यांनी तर बेदाण्याचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
Image: Google
बेदाण्यांचं पाणी कसं कराल?
बेदाण्यांचं पाणी तयार करण्यासाठी दोन कप पाणी उकळून घ्यावं. त्यात १५० ग्राम बेदाणे भिजत घालावेत. हे बेदाणे रात्रभर पाण्यात भिजू द्यावेत. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळणीनं गाळून घ्यावं. हे पाणी पुन्हा मंद आचेवर गरम करावं. ते रिकाम्या पोटी चहा सारखं गरम गरम प्यावं, यात वाटल्यास लिंबाचा रस घातलेलाही चालतो.