अभिनेत्री भाग्यश्रीची ओळख आता फिटनेस फ्रिक आणि पोषण तज्ज्ञ अशी आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरुन ती व्यायाम, पोषण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचं स्नॅक्स, विविध पदार्थ याबाबत सारख्या पोस्ट टाकत असते. तिच्या या पोस्ट आपल्या आरोग्याचा फायदा करुन घेण्यासाठी फॉलोअर्स आवर्जून वाचतात.
Image: Google
भाग्यश्रीने नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन एक स्टोरी शेअर केली . यात भाग्यश्री म्हणते, की आठवडाभराच्या धावपळीत आहाराचे नियम जर आपण ठरवूनही पाळू शकलो नाही म्हणून अनेकांना अपराधी वाटतं. पण किमान आठवड्याच्या शेवटी, सुटीच्या दिवशीही ते आपली चूक सुधारण्याची संधी घेत नाही. वजन आणि पोषण या दोन्ही बाबतीत सजग राहून आहाराचा विचार करताना भाग्यश्री एक रुचकर आणि पौष्टिक पर्याय सूचवते. अर्थात ती तो स्वत:ही फॉलो करतेच. हा पर्याय म्हणजे वीकेण्डला सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात वाटीभर मोड आलेल्या मुगाचं पौष्टिक आणि चटपटीत सॅलेड.
Image: Google
सुट्टीच्या दिवशी कोणी असं सॅलेड खातं का? असा प्रश्न पडला असेल तर भाग्यश्री जे सांगते ते समजून घेणं गरजेचं आहे. मुगाचं सॅलेड हा एक परिपूर्ण आहार आहे, झटपट होतो, खाल्ल्यानंतर याचा आपल्या चयापचयावर आणि पचनावर चांगला परिणाम होतो. तसेच या सलाडमधे विविध आरोग्यदायी जिन्नसाचा वापर केलेला असल्यानं शरीरास आवश्यक पोषण मूल्यं पुरवण्यास आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास या सॅलेडचा चांगला उपयोग होतो. स्वत: भाग्यश्री आणि इतर पोषण तज्ज्ञही मोड आलेल्या मुगाचं सॅलेड खाण्याचे अनेक फायदे सांगतात. हे फायदे बघितल्यास भाग्यश्री एवढ्या आवडीनं सुट्टीच्या दिवशा मूग सॅलेड खाण्याचा सल्ला का देत असावी हे समजतं.
मोड आलेल्या मुगाचं सॅलेड का खावं?
1. मुगासारखी कडधान्यं जेव्हा भिजवून , त्यांना मोड काढले जातात तेव्हा त्यांचं पोषण मूल्य वाढतं. हिरवे अख्खे मूग जेव्हा पाण्यात भिजवले जातात तेव्हा या भिजवण्याच्या प्रक्रियेनं त्यातील पोषण मुल्यास हानिकारक घटक निघून जातात. त्यामुळे मूग पचनास हलके होतात. मोड आलेल्या मुगाचं सॅलेड म्हणजे पोषण मुल्यांचा खजिना आहे. यात प्रथिनं, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, लोह, खनिजं, अँण्टिऑक्सिडण्टस, तांबं, उष्मांक, अ, ब, क, ई जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. तर फॅटसचं प्रमाण अगदीच कमी असतं. यामुळेच मोड आलेल्या मुगाचं सॅलेड खाल्ल्यानं त्याचा परिणाम आरोग्य सुदृढ राहण्यास आणि वजन नियंत्रित राहाण्यास होतो.
2. वजन वाढत असेल, कितीही उपाय केले तरी कमी होत नसेल तर मग मोड आलेल्या मुगाचं सॅलेड खाणं हा उत्तम पर्याय आहे. या सलाडमधे उष्मांक खूपच कमी असतं आणि प्रथिनांचं प्रमाण मात्र भरपूर असतं. वजन नियंत्रणासाठी/ वजन कमी करण्यासाठी ही बाब महत्त्वाची असते.
3. मोड आलेल्या मुगाचं सलाड पित्तावर मात करणार्या , आम्लाचं प्रमाण कमी करणार्या अल्काइनसारखं काम करतं. त्यामुळे हे सलाड खाल्ल्याने वारंवार होणारा पित्ताचा त्रास कमी होतो.
4. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मोड आलेले मूग फायदेशीर असतात. या सॅलेडमधून क जीवनसत्त्व शरीरास मिळतं.
5. मोड आलेल्या मुगाच्या सॅलेडमधे फायबरचं प्रमाण भरपूर असल्यानं त्याचा उपयोग पचन क्रिया व्यवस्थित होण्यास होतो. गॅस, खाल्ल्यानंतर पोट फुगणं, बध्दकोष्ठता यासारख्या पचन आणि पोटाच्या समस्यांवर उपाय होतो.
Image: Google
6. प्रथिनं आणि फायबर यासोबतच हे सॅलेड अ जीवनसत्त्वाचा पुरवठाही शरीरास करतो. त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहातं, नजर सुधारण्यास मदत होते. मोड आलेल्या मुगामधे अँण्टिऑक्सिडण्ट घटक असतात. हे घटक डोळ्यांच होणारं नुकसान रोखतात.
7. मोड आलेल्या मुगाचं सॅलेड हे दुपारच्या जेवणात खावं. कारण हे सॅलेड शरीरातील ऊर्जेची कमतरता भरुन काढतं. यात असलेले प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वं हे शरीरास ऊर्जा देतात. वजन कमी करताना पोषण जितकं महत्त्वाचं तितकीच ऊर्जाही. मोड आलेल्या मुगाचं सॅलेड दुपारच्या जेवणात खाल्लं तर पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं आणि दिवसभर शरीरास हवी असणारी ऊर्जा मिळते.
8 . केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही या सॅलेडचा फायदा होतो. मोड आलेल्या मुगाचं सॅलेड खाल्ल्यानं जी पोषक तत्त्वं शरीरास मिळतात ती सर्व त्वचा निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची असतात. हे सलाड आठवड्यातून एकदा तर अवश्य खावं, पण आठवड्यातून दोन तीनदा खाल्ल्यास त्वचेला येणारी खाज निघून जाते. वजनही लवकर कमी होतं.
Image: Google
कसं करायचं मोड आलेल्या मुगाचं सॅलेड ?
मोड आलेल्या मुगाचं सॅलेड करण्यासाठी केवळ 10-15 मिनिटं लागतात. यासाठी मूड आलेले मूग थोडे शिजवून घ्यावेत. गाळ होतील असे खूप शिजवू नये. मोड आलेले मूग किंवा इतर कडधान्यं केवळ भिजवून सलाड म्हणून खाऊ नये. कारण यात असलेली साखर पचत नाही, त्याचा आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच मोड आलेल्या मुगाचं सॅलेड करताना आधी 8-9 तास मूग पाण्यात भिजवावेत. त्यातलं पाणी उपसून जाळीदार भांड्यात ते ठेवावे. त्यावर झाकण ठेवाव. किंवा हे मूग पाणी निथळल्यानंतर सुती कापडात बांधून ठेवले तरी चालतात. मुगाला उन्हाळ्यात एका दिवसातच मोड फुटतात पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चांगले मोड फुटायला किमान दोन दिवस तरी लागतात.
मोड आलेले मूग, थोडे शिजवून मग एका मोठ्या वाटीत घ्यावेत. थोडे गार झले की मग त्यात चिरलेला टमाटा, काकडी, संत्र्याच्या फोडी किंवा डाळिंबाचे दाणे टाकावेत. ते चांगलं मिसळून घेतलं की मग त्यावर बारिक चिरलेली कोथिंबीर भुरभुरुन घालावी. मिरची बारीक चिरुन घ्यावी. मोड आलेले मूग हे कडधान्यं, भाज्या आणि फळांचा समावेश केल्यानं त्यातील पोषण मूल्यं भरपूर वाढातात. जे सलाड थोडं आंबट चवीचं हवं असल्यास सॅलेडवर वरुन लिंबू पिळावं. या सॅलेडमधे कडधान्यासोबतच भाज्या घातल्यानं सॅलेडची पोष्टिकता आणखी वाढते. या सॅलेडमध्ये चिरलेला कांदा घालावा.
आणखी भाज्या आवडत असल्यास बारीक चिरलेलं गाजर, सिमला मिरची घालावी. थोडं साधं मीठ, थोडं काळं मीठ, जिरे पूड, मिरे पूड घालावी. हे सॅलेड करताना कोणी उकळत्या पाण्यात मोड आलेले मूग 5-10 मिनिटं बुडवून ठेवतात. पण आहारतज्ज्ञ मात्र मूग थोडे उकडून घेण्याचाच सल्ला देतात. सर्व साहित्य चांगलं मिसळावं. हे सॅलेड दुपारच्या वेळेस खायचं असल्यानं त्यात थोडं घरी विरजलेलं ताजं दही घालावं.