राजश्री कुलकर्णी (एम.डी. आयुर्वेद)
मोड आलेली कडधान्यं हल्ली अनेकजण रोज खातात. प्रोटीनसाठी त्यांचा मारा केला जातो. पण कोणतीही गोष्ट फक्त आरोग्यदायी आहे म्हणून ती कितीही आणि केव्हाही खाऊन चालत नाही. पौष्टिक पदार्थाचा अतिरेक केल्यास त्यातली पौष्टिकता राहते बाजूला आणि अपायच जास्त होतात. मोड आलेल्या कडधान्यांच्या बाबतीतही असंच होतं. आणि मग पोटाच्या तक्रारी सुरु होतात.
(Image :google)
कडधान्यं कसं वापराल?
१. कडधान्य दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून किमान सात ते आठ तास भरपूर पाण्यात भिजत ठेवावं. कठीण कवच असणारी कडधान्यं भिजायला वेळ लागतो. छोले, वाल, पावटे, राजमा यांना भिजायला वेळ लागतो.
२. मोड येण्यासाठी भिजवलेले कडधान्य उपसून थोडे निथळून घ्यावे आणि पातळ कपड्यात घट्ट बांधून थोड्या उबदार ठिकाणी ठेवावे. म्हणजे छान लांबलचक मोड येतात.
(Image :google)
कुणी खावे, कुणी टाळावे?
१. कच्ची कडधान्यं खाणं बऱ्याच जणांना सहन होत नाही. पोट दुखतं,फुगते किंवा गॅसेस होतात त्यांनी ती शिजवूनच खावीत.
२. ज्यांना आधीच पोट साफ न होण्याचा खूप त्रास आहे त्यांनी वारंवार कडधान्यं खाऊ नयेत. क्वचितच खावीत, त्यातही हिरव्या मुगाचा वापर अधिक करावा.
३. एकदा मोड आले की ती उसळ शक्यतो लवकर संपवावी. खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवून ते वापरु नये.
४. जर उसळीला खराब वास येत असेल, रंग आणि चव बदलली असेल, चिकटपणा वाटत असेल तर खाऊ नये.
५. ज्यांना पचनाचे त्रास आहे, पित्त फार होते अशांनी उसळी जपून खाव्या. कच्चे स्प्राऊट म्हणून खाणे टाळावे. बेतानं खाणं उत्तम.
६. उसळी खाऊन व्यायाम करणंही अत्यंत आवश्यक आहे.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)