वजन कमी करण्याची प्रक्रिया वेळ खाणारी असते. पण ज्यांना वजन कमी करायचं असतं त्यांना अजिबात धीर , संयम नसतो. क्वीक रिझल्टची घाई झालेली असते. वजन जराही हालत नाही हे बघितलं की धीर सुटतो आणि शेवटचा पर्याय म्हणून जेवणावर प्रयोग केले जातात. आहाराचा आणि वजनाचा जवळचा संबंध असतो. लवकर वजन कमी करण्यासाठी जेवण सोडणं, त्या ऐवजी विशिष्ट प्रकारचे शेक घेणं, बार्स खाणं असे प्रयोग केले जातात. मील रिप्लेसमेण्ट हा वजन कमी करण्याचा उपाय मानला जातो. पण आहार तज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते मील रिप्लेसमेण्टचे असे परिणाम होतात जे शरीरावर अपाय करतात. वजन कमी होण्याऐवजी या उपायातून वजन वाढण्याचाही धोका असतो. आहार तज्ज्ञ रितू पुरी मील रिप्लेसमेण्टच्या परिणामांबद्दल सविस्तर सांगतात.
Image: Google
मील रिप्लेसमेण्टचा पर्याय वापरल्यास
1. कॅलरी काऊण्ट चुकतो: रोजच्या जेवणाद्वारे आपल्या शरीराला जे आवश्यक उष्मांक असतात ते मिळतात. पण मील रिप्लेसमेण्टमुळे कॅलरीजचं गणित चुकू शकतं. शरीरात गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपेक्षा कमी कॅलरीज जातात. याचा परिणाम बीएमआर अर्थात बसाल मेटॅबाॅलिक रेटवर होतो. मील रिप्लेसमेण्टचा पर्याय अवलंबताना बऱ्याचदा शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज शरीरात जातात. यामुळे बीएमआर रेट लो होतो आणि त्याचा परिणाम म्हणून वजन वाढतं.
Image: Google
2. अयोग्य मील रिप्लेसर सेवन करणं: जेवणाला पर्याय म्हणून मील रिप्लेसर एवढंच डोक्यात ठेवून मील रिप्लेसमेण्ट केलं जातं. त्यामुळे चुकीचे मील रिप्लेसर निवडले जाण्याची शक्यता असते. मील रिप्लेसरमधील घटकांचा आणि शरीराला आवश्यक घटकांचा मेळ बसत नाही. यामुळे शरीराला आवश्यक गुणधर्मांची कमतरता भासते. आहारातून शरीराला प्रथिनं, कर्बोदकं, फायबर, जीवनसत्वं, खनिजं, ॲण्टिऑक्सिडण्टस यांची आवश्यकता असते. पण काही मील रिप्लेसर हे केवळ प्रोटीन रिच असतात. त्याचा परिणाम म्हणजे शरीरात इतर पोषक घटकांची कमतरता निर्माण होवून आरोग्याचं नुकसान होतं.
Image: Google
3. पचनाच्या समस्या उद्भवतात: आहारातला पचनासाठीचा महत्वाचा घटक म्हणजे फायबर. पण मील रिप्लेसमेण्टच्या बाबतीत फायबरची टोकाची स्थिती असते. काही मील रिप्लेसरमध्ये फायबरचं प्रमान गरजेपेक्षा अधिक असतं तर काही मील रिप्लेसर हे प्रोटीन रिच असतात, त्यांच्यात फायबरचं प्रमाण अत्यंत कमी असतं. या दोन्ही गोष्टींचा पचनावर विपरित परिणाम होतो.
4. जेवण्याचं समाधान मिळत नाही: आपण दिवसातून दोन वेळा जेव्हा पोटभर जेवतो तेव्हा पोट भरण्यासोबतच खाण्याचं समाधानही मिळतं. जेवणात वेगवेगळ्या चवींचे, रंगाचे पदार्थ असतात. या विविधतेतून जेवणाचं समाधान मिळतं. ते समाधान एकाच चवीचा आणि रंगाचा शेक, बार्स यातून मिळत नाही. ते पिल्यानंतर/ खाल्ल्यानंतर खाण्याचं समाधान मिळत नाही, आनंद मिळत नाही. या असमाधानातून मील रिप्लेसर नंतर आणखी काही खाल्लं जातं त्याचा परिणाम म्हणून वजन वाढतं.
Image: Google
5. पोषक घटकांची कमतरता: संतुलितआहाराच्या तुलनेत मील रिप्लेसर हा कमीच पडतो. समतोल आहारात शरीराला आवश्यक पोषण घटकांचा समतोल साधलेला असतो. पण मिल रिप्लेसरमध्ये कोणतातरी एकच घटक जास्त प्रमाणात असतो. असा घटक असलेला पदार्थ जेवणाऐवजी दीर्घकाळ सेवन करत राहिल्यास शरीरात पोषक घटकांचा कमतरता निर्माण होते. शरीरात दीर्घकाळ पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्य बिघडतं . त्याचा नकारात्मक परिणाम वजनावर होतो. त्यामुळे रितू पुरी वजन कमी करण्यासाठी आहारावर स्वत:च्या मनानं प्रयोग न करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी आहार कसा असायला हवा याबाबत आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणंच योग्य!