Join us  

सुकन्या मोनेंचं बेड टाइम सिक्रेट; त्यांच्या उत्तम प्रसन्न व्यक्तिमत्वाचे आणि तब्येतीचे गुपित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 1:26 PM

सुकन्या मोने हे नाव घेताच त्यांचा हसरा, प्रसन्न चेहरा डोळ्यासमोर येतो. याच कायम उत्साही व्यक्तिमत्त्वचं आणि उत्तम तब्येतीचं गुपित त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

ठळक मुद्देसुकन्या मोने यांचं रोज रात्रीचं आवडतं काम..... त्याच्यातच तर दडलंय त्यांचं हेल्थ सिक्रेट !

सुकन्या कुलकर्णी- मोने.....  'आभाळमाया' पासून किंवा 'शांती' मालिकेतल्या त्यांच्या छोट्याश्या भुमिकेपासून ते अगदी अलिकडच्या काळातल्या 'जुळूनी येती रेशिमगाठी' या मालिकेपर्यंतच्या प्रवासात त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. या प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वत:ला इतकं फिट बसवलं की याठिकाणी यांच्यापेक्षा कुणी दुसरी असा विचार चुकूनही रसिकांच्या मनात डोकावत नाही. या सगळ्या भूमिकांच्या पलिकडल्या सुकन्या मोने म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा.. हा उत्साह आणि कायम प्रसन्न हास्य त्यांना कसं बरं जमतं, असा विचार करत असाल, तर यामागचं त्यांचं सिक्रेट जरून जाणून घ्या. 

 

सुकन्या मोने यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्या रोज रात्री त्यांच्या आवडीचं कोणतं काम न चुकता करतात, याविषयी एक व्हिडियो टाकला आहे. हा व्हिडियो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की ''माझं रोज रात्रीच आवडत काम....सकाळी उठल्या उठल्या संजय साठी भेंडीचं पाणी,सगळ्यांसाठी भिजवलेले बदाम,माझ्यासाठी भिजवलेले आक्रोड आणि डोळे स्वच्छ धुवायला त्रिफळा चुर्णचे पाणी....''. मैत्रिणींनो हे आहे त्यांच्या आरोग्याचं गुपित. सुकन्या मोने यांची ही पोस्ट वाचून अनेक जणींना प्रश्न पडला आहे की रोज रात्री झोपताना बदाम भिजत टाकायचे, हे तर माहिती आहे. पण अक्रोड आणि भेंडी भिजत टाकण्याचे काय फायदे? त्रिफळ चुर्णच्या पाण्याने डोळे धुवायचे म्हणजे नेमकं काय करायचं?  

 

स्वत:चे आणि कुटूंबाचे आरोग्य सांभाळण्यासाठी हा साधा सोपा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. रात्री झोपताना बदाम भिजत टाकण्याची सवय तर अनेकींना असते. आता भेंडी आणि अक्रोड भिजत टाकण्याचे फायदेही जाणून घ्या आणि सहज शक्य झालं तर हा उपाय करून बघा...

 

१. भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे बदामामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड, ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. बदाम नियमित खाल्ल्यामुे शरीरातील खराब कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. याशिवाय बदामात खूप कमी कॅलरीज असतात. बदाममध्ये असलेल्या मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे शरीरात उर्जा निर्माण होते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वेटलॉस करायचे आहे, त्यांनीही दररोज बदाम खावेत. भिजवलेले बदाम पचनास हलके असतात. त्यामुळे सुके बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खाण्यास प्राधान्य द्यावे.

 

२. भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे अक्रोड पचनास जड असतात. त्यामुळे ते भिजवून खावेत. अक्रोडमध्ये प्राेटीन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठीही अक्रोड खाणे खूप उपयुक्त ठरते. भिजवलेले दोन अक्रोड जर सकाळी रिकाम्यापोटी खाल्ले तर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे भिजवलेले दाेन अक्रोड नियमितपणे खाणे मधुमेहींसाठीदेखील खूप फायद्याचे आहे. अक्रोडमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सचे देखील योग्य प्रमाण असते. त्यामुळे त्यांचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

 

३. भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा हा सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय आहे. दररोज सकाळी भेंडीचे पाणी घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींसाठी शुगर कंट्रोल करण्याचा हा एक उत्तम उपाय मानला जातो. याशिवाय दमा, अस्थमा असा त्रास असलेल्या व्यक्तींसाठीही भेंडीचे पाणी घेतल्याने लाभ होतो. खराब कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करणे आणि किडनीचे आरोग्य चांगले ठेवणे यासाठीही भेंडीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

 

कसे करायचे भेंडीचे पाणी?भेंडीचे पाणी बनविण्यासाठी ४ ते ५ मध्यम आकाराच्या भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंकडची टोके काढून टाका. यानंतर त्या भेंड्या मधोमध उभ्या चिरा आणि ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी भेंडी काढून टाका आणि हे पाणी रिकाम्या पोटी प्या. इंग्रजीत okra water म्हणून भेंडीचे पाणी ओळखले जाते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्ससुकन्या कुलकर्णीमधुमेह