आपली प्रतिकारशक्ती हेच आपल्या आरोग्याचं गुपित असतं. औषधांनी आजारांवरचे उपचार होतात. पण प्रतिकारशक्ती वाढवायची झाली तर आपल्याला स्वत:ला प्रयत्न करावे लागतात. प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण होत नाही. त्यासाठी जाणून बूजून आणि डोळस प्रयत्न करावे लागतात. आपला आहार विहार कसा आहे हा मुद्दा आपल्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचा असतो. स्वयंपाकघराशी निगडित पथ्यं आपण पाळली तर आपली प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते आणि आपलं आरोग्य सुरक्षित राहू शकतं. यासाठी उन्हाळ्याचे चार महिने डोळ्यासमोर ठेवून आहाराचं व्यवस्थित नियोजन केलं तर उन्हाळ्याची झळ तर बसणार नाहीच सोबतच उन्हयाळ्याचा आणि आजारांचा सामना करण्यासाठीची ताकद आपण आपल्यात निर्माण करु शकतो.
उन्हाळ्यातल्या आहाराचे नियम
- स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी तवा, कढई, कढची या लोखंडी भांड्यांचा वापर करावा. लोखंडी भांड्यात अन्न शिजवून खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.
- बाहेरचं दही आणून खाण्यापेक्षा रोज घरीच दही लावावं. दही लावताना त्यात मनूके घालावेत. दूपारच्या जेवणात हे दही खावं. यामुळे शरीरात प्री आणि प्रो बायोटिक्सस तयार होतात.
- उन्हाळ्यात ऊसाच्या रसाचं सुख असतं. उन्हाळ्याच्या दिवसात हा ऊसाचा ताजा रस दुपारच्या आत प्यावा. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइडसची हानी होते ती ऊसाच्या रसातून भरुन निघते. शिवाय ऊसाच्या रसात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम , लोह आणि मॅग्नीज या खनिजांचा खजिना असतो.
- उन्हाळ्याच्या दिवसात बरेचदा शांत झोप येत नाही. त्यासाठी रोज रात्री झोपताना तळ पायांना चांगलं तूप चोळून मालिश करावी त्यामूळे शांत झोप लागते.
- रोज ज्वारी/ बाजरीची भाकरी खावी. भाकरीमुळे उन्हाच्या झळांनी आलेला गळवटा निघून जातो. शरीरात कस टिकून राहातो.
- जेवणात भाजी , कोशिंबिरी यासोबतच खलबत्त्यात कुटलेली चटणी हवीच. चमचाभर चटणीतून शरीराला आवश्यक असणारीं पोषणमुल्यं मिळतात.
- मीठाशिवाय तर आपला स्वयंपाक होतच नाही. पण आयोडिनयूक्त मीठ एवढ्यापूरताच मीठाचा वापर राहातो. मीठाचे दहा बारा प्रकार आहेत. किमान चार प्रकारचं मीठ आपल्या खाण्यात असायलाच हवं.
- डोकं शांत ठेवण्यासाठी , टाळूचं आणि केसांचं भरणपोषण होण्यासाठी आठवड्यातून किमान एक वेळेस तरी केसांंना तेल लावून डोक्याची चंपी करायला हवी.
- आहारातील डाळी साळींचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण डाळी खाण्याचेही काही नियम आहेत. जसे डाळी भिजवून त्याला मोड काढून मग त्या शिजवाव्यात. डाळी या नेहेमी तांदूळ, ज्वारी, बाजरी यासारख्या धान्यांसोबत खाव्यात. आठवड्यातून पाच दिवस प्राच प्रकारच्या डाळी खाव्यात.
- उन्हानं पोटात पडणारी आग कोल्डड्रिंक्सनं नाही तर नैसर्गिक पध्दतीनं शमवावी. त्यासाठी रोज गुलकंद खावा. तो दूधात, पाण्यात किंवा खायच्या पानात मिसळून खावा.
- पोट आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात वरचेवर दुपारच्या जेवणात ताकाची कढी करावी.
- केळ खावं. उन्हाळ्यात पाच प्रकारे केळाचा समावेश रोजच्या आहारात करता येतो. दिवसाची सुरुवात म्हणून केळ खाऊ शकतो. दुपारचं जेवण म्हणूनही केळाचं सेवन करता येतं. पोळीसोबत जेवणात खाता येतं. जेवताना शेवटी केळ खाता येतं. तरतरी येण्यासाठी केळाचा मिल्कशेकही घेता येतो.
( ॠजूता दिवेकर फेसबूक पोस्ट)