उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण खूप जास्त वाढते. त्यामुळे शरीरातील पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. शरीरातील पाणी पातळी जर समतोल प्रमाणात राहिली तर उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा (dehydration in summer) त्रास होत नाही. यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या, सरबते प्या आणि शरीराला जास्तीतजास्त पाणी पुरविणारी फळे खा, असा सल्ला डॉक्टर देत असतात. मात्र फळांच्या बरोबरीनेच उन्हाळ्यात एक भाजीही भरपूर प्रमाणात खायला पाहिजे, असं सांगतेय अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree).
भाग्यश्रीने तिचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती उन्हाळ्यात दुधी भोपळा का खाल्ला पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती देताना दिसते आहे.. आपल्याला माहितीच आहे की टरबूज, खरबूज, संत्री, किवी, द्राक्ष या खास उन्हाळी फळांमध्ये पाणी पातळी खूप जास्त असते. असाच गुणधर्म काही भाज्यांमध्येही दिसून येतो. ज्या भाज्यांमध्ये पाणी पातळी भरपूर असते, त्यांना वॉटर व्हेजिटेबल म्हणतात. दुधी भोपळा हे देखील एक वॉटर व्हेजिटेबल असून उन्हाळ्यात तो जास्तीत जास्त का खावा, काय त्याचे फायदे याविषयी भाग्यश्रीने माहिती दिली आहे..
उन्हाळ्यात दुधी भोपळा खाण्याचे फायदे
(Benefits of eating dudhi/lauki/ bottlegourd)
- भोपळ्यामध्ये जवळपास ८० टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात भोपळा भरपूर प्रमाणात खाल्य्यास पोटाला, शरीराला थंडावा मिळतो.
- उन्हाळ्यात अनेकदा शरीरात उष्णता निर्माण झाल्यासारखे वाटते. अशावेळी भोपळा खाणे फायद्याचे ठरते.कारण अशावेळी भोपळा 'कुलिंग एजंट' म्हणून काम करतो.
- भोपळा पचनासाठी अतिशय हलका असतो.
- भाजी, सूप, ज्यूस अशा कोणत्याही माध्यमातून भोपळा खाल्ला तरी तो शरीरात भरपूर उर्जा टिकवून ठेवतो. त्यामुळे नंतर बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. म्हणूनच वेटलॉस करणाऱ्यांसाठीही भोपळा खाणे फायद्याचे ठरते.
- उन्हाळ्यात जेवण जात नाही. अशावेळी भोपळ्याचा थंड ज्यूस सकाळी नाश्त्यामध्ये घेणे उत्तम.
- शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी भोपळा फायदेशीर ठरतो.
- शरीरातील ब्लड- शुगर लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी उपयुक्त.
- उन्हाळ्यात अनेकांना ॲसिडिटीचा त्रास जाणवतो. अशा लोकांनी नियमित भोपळा खावा.