उन्हाळ्यात सारखी तहान लागते. केवळ पाण्यानं तहान भागत नाही. तहान भागवण्यासाठी सरबतं, मिल्क्सशेक्स प्यायली जातात. यामुळे तहान भागते मात्र शरीरातील कॅलरीज मात्र वाढतात. ज्यूस आणि मिल्कशेक्स प्यायल्यानं वजन वाढतं. म्हणूनच उन्हाळ्यात तहान भागवण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवणारे पेयं पिणं फायदेशीर ठरतं. यासाठी काकडी, शहाळं, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, जिरे, बडिशेप, धणे यांचा वापर करुन उत्तम चवीचे, शरीराला थंडावा देणारे डिटाॅक्स ड्रिंक्स तयार करता येतात.समर स्पेशल 4 डिटाॅक्स ड्रिंक्सने तहान भागते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जाऊन पचन व्यवस्थित होवून वजन कमी होण्यास मदत होते.
Image: Google
1. समर स्पेशल डिटाॅक्स वाॅटर
उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात करण्यासाठी लिंबू, पुदिना, अननस यांचा वापर करुन तयार केलेले डिटाॅक्स वाॅटर पिणं उत्तम. यासाठी 2-3 संत्र्याच्या फोडी, 2 लिंबाच्या फोडी, थोड्या अननसाच्या फोडी, काकडीच्या फोडी, आल्याचे तुकडे , थोडी पुदिन्याची पानं, बर्फाचे तुकडे आणि पाणी घ्यावं.
समर स्पेशल डिटाॅक्स वाॅटर तयार करण्यासाठी एक मोठा ग्लास किंवा काचेची बरणी भरुन पाणी घ्यावं. घ्यावं. त्यात संत्री, लिंबू, अननस, काकडी, आलं, पुदिना आणि बर्फाचे तुकडे घालावे. हे पाणी चांगलं हलवून घ्यावं. अर्धा तास ते तसंच ठेवावं. अर्ध्या तासानंतर हे पाणी गाळून प्यावं.
Image: Google
2. काकडी किवीचं डिटाॅक्स ज्यूस
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. उन्हाळ्यात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी , थंडं ठेवण्यासाठी काकडीचा उपयोग करता येतो. उन्हाळ्यात विशेषत: व्यायामानंत्र काकडी आणि किवीचं डिटाॅक्स ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. काकडी किवीचं डिटाॅक्स ज्यूस तयार करण्यासाठी 4 किवी, 2 काकड्या, मिरी पावडर, चवीपुरतं मीठ, बर्फ, 1 कप पाणी आणि थोडं मोड आलेलं धान्यं घ्यावं. ज्यूस तयार करण्यासाठी आधी मिक्सरमधून बर्फ आणि पाणी एकत्र फिरवावं. नंतर यात किवी आणि काकडीच्या फोडी घालून त्या एक मिनिट फिरुन घ्याव्यात. ज्यूस ग्लासमध्ये काढून वरुन थोडी मोड आलेली कडधान्यं घालावीत. हे डिटाॅक्स ज्यूस तहान भागवण्यासोबतच वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
Image: Google
3. कोकोनट-मिंट-लेमन डिटाॅक्स वाॅटर
कोकोनट मिंट लेमन डिटाॅक्स वाॅटर शरीरास थंडावा देतं. पचनास मदत करुन रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. हे डिटाॅक्स ड्रिंक तयार करण्यासाठी 1 शहाळं, थोडी पुदिन्याची पानं, 1 मोठा चमचा मध आणि एका लिंबाचा रस घ्यावा. शहाळं फोडून त्यातलं पाणी काढून घ्यावं. चमच्यानं मलई काढून मलईचे बारीक तुकडे करुन ते नारळाच्या पाण्यात घालावेत. यातच थोडी पुदिन्याची पानं, लिंबाचा रस आणि मध घालून पाणी चांगलं हलवून घ्यावं.
Image: Google
4. लेमन कोरिएण्डर डिटाॅक्स वाॅटर
वजन कमी होण्यासाठी आणि शरीराला थंडावा मिळण्यासाठी लेमन कोरिएण्डर डिटाॅक्स वाॅटर प्यावं. यासाठी एक काचेची बाटली किंवा बरणी घ्यावी. त्यात पाणी घालावं. पाण्यात ताजी कोथिंबीर धुवून घालावी. एक चमचा लिंबाचा रस घालून पाणी चांगलं हलवून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवून सकाळी प्यावं.
Image: Google
5.जिरे-धणे-बडिशेपाचं पाणी
जिरे, धणे आणि बडिशेप यांचा एकत्रित वापर करुन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर डिटाॅक्स वाॅटर तयार करता येतं. जिरे-धणे- बडिशेपाचं पाणी तयार करण्यासाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा बडिशेप एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवावी. दुसऱ्या दिवशी पाणी उकळून घ्यावं. पाणी गाळून घ्यावं. ते गार झालं की त्यात काळं मीठ, मध आणि लिंबाचा रस घालून पाणी हलवून घ्यावं. जिरे-धणे -बडिशेपाच्या डिटाॅक्स वाॅटरनं शरीराला आवश्यक खनिजं आणि जीवनसत्वं मिळतात. हे डिटाॅक्स ड्रिंक प्याल्यानं शरीर मनाचा उत्साह आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. दिवसाची आरोग्यदायी सुरुवात करण्यासाठी रोज सकाळी जिरे-धणे- बडिशेपाचं पाणी प्यावं.