Join us  

एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, मूड फ्रेश करणाऱ्या लेमन टीचे 6 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 1:55 PM

Summer Special Drink: उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या सवयीत थोडा बदल करणं आवश्यक आहे. चहा काॅफीऐवजी लेमन टी प्याल्यास मूड तर फ्रेश होतोच सोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात. 

ठळक मुद्देलेमन टी पोटसाठी चांगला मानला जातो.लेमन टी प्याल्यास चयापचयाची क्रियेची गती वाढून वजन कमी होण्यास मदत होते. त्वचा सुरक्षित आणि सुंदर ठेवण्यासाठी लेमन टी फायदेशीर असतो. 

Summer Special Drink:  ऋतू कोणताही असला तरी बहुतेकजण दिवसाची सुरुवात चहा काॅफीनेच करतात. ऋतूप्रमाणे खानपान बदलणे, स्वत:ला आरोग्यदायी सवयी लावणे हे आवश्यक असतं. पण रोजच्या धावपळीत या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं.हे होवू नये म्हणून तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे छोटे छोटे बदल करणं आवश्यक आहे. उन्हाळा असला तरी सकाळी आपल्याला चहाच हवा असल्यास त्यात थोडा बदल करुन लेमन टी प्यायल्यास त्याचा फायदा होतो.  उन्हाळ्यात सकाळी चवीला उत्कृष्ट असलेला लिंबू चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लिंबात क जीवनसत्व विपूल प्रमाणात असतं. तसेच लिंबात असलेल्या सायट्रिक ॲसिडचा उपयोग पोटाच्या समस्या बऱ्या करण्यासाठी होतो. लेमन टीमध्ये ॲण्टिऑक्सिडेण्टस, पोलीफिनाॅल हे आरोग्यास लाभदायी घटक असतात. 

Image: Google

रोज सकाळी लेमन टी घेतल्यास

1. दिवसाची सुरुवात लेमन टी पिऊन केल्यास पोटाचं आरोग्य चांगलं राहातं. लिंबात असणाऱ्या पोषक घटाकांमुळे पचन क्रिया सुधारते. म्हणून लेमन टी पोटसाठी चांगला मानला जातो. 2. रोज सकाळी लिंबू चहा प्याल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. लिंबात क जीवनसत्व असत्ं. हे जीवनसत्व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतं. रोगप्रतिकारशक्ती चांगली झाल्यास शरीरास विविध संसर्गाचा धोका टळतो. क जीवनसत्व शरीरातील लोहाची कमतरता कमी करण्यास मदत करतं. या जीवनसत्वामुळे रक्तदाब आणि हदयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो.3. वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लेमन टी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.  लिंबामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळे लिंबू चहा प्याल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. लिंबातील गुणधर्मांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. लिंबानं चयापचयाची क्रिया वाढते आणि वजन कमी होण्यास फायदा होतो. 

Image: Google

4.  उन्हाळ्यात त्वचा सुरक्षित आणि सुंदर ठेवण्यासाठी लेमन टीचा फायदा होतो. लिंबामध्ये असलेले ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासून होणाऱ्या हानिपासून संरक्षण करतात. 

5. लिंबाचा चहा करताना त्यात जर आल्याचा तुकडा घातला तर लिंबाचा चहा हा सूज आणि दाहविरोधी परिणामकारक ठरणारं पेयं होतं. आल्यामुळे मळमळ थांबते. स्नायुदुखी कमी होते. सारखी भूक लागण्याची समस्याही लेमन टीमधील आल्याच्या वापरानं कमी होते. आल्याचा समावेश केलेला लेमन टी प्याल्याने शरीरातील ऊर्जा वाढते. आल्यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असल्यानं आलंयुक्त लिंबू चहा प्याल्याने पचनास मदत होते.

Image: Google

6. लिंबू चहा करताना त्यात साखर न घालता गोडव्यासाठी मध वापरल्यास चयापचय क्रियेला उत्तेजन मिळतं. ही क्रिया गतिमान झाल्यानं शरीरातील फॅटस बर्न होवून त्यापासून शरीरास ऊर्जा मिळते. 

Image: Google

लेमन टी कसा करावा?

पौष्टिक आणि चविष्ट् लेमन टी करण्यासाठी 2 कप पाणी, 2 छोटे चमचे साखर/ मध, पाव चमचा चहा पावडर, 1 चमचा लिंबाचा रस आणि आल्याचा अर्धा इंच तुकडा घ्यावा. 

सर्वात आधी पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवावं. पाणी गरम झालं की त्यात साखर आणि चहा पावडर टाकावी. चहा साखर टाकलेलं पाणी 3- मिनिटं उकळू द्यावं. नंतर गॅस बंद करुन पातेलं थोडा वेळ झाकून ठेवावं. थोड्या वेळानं यात लिंबाचा रस घालून  चहा गाळून प्यावा. साखर घातलेली नसल्यास चहा गाळल्यानंतर त्यात मध घालून चहा हलवून घ्यावा. चहात आल्याचा तुकडा टाकायचा  असल्यास पाण्यला उकळी आल्यानंतर चहा साखरेसोबतच टाकावा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्ससमर स्पेशलआहार योजनाआरोग्य