अर्चना रायरीकर
आता उन्हाळ्याची सुटी लागणार. मग फिरायला जाण्याचे प्लॅन तयार होणार, कुणी देशात, कुणी परदेशातही फिरायला जातात; पण मुळात आपण जेव्हा फिरायला जातो, तेव्हा आपली मानसिकता भरपूर फिरण्याची अशी असली पाहिजे. त्यासाठी लागणारा फिटनेस आपला आहे का, त्यासाठी काय प्रयत्न करायचे, हे ठरवावे लागेल. भरपूर भटकंती आणि भरपूर प्रवास यासाठी पचनही उत्तम हवेच. अधून मधून ट्रेकला जाणं म्हणजे तुमची शारीरिक क्षमता तपासणे. पेशंट/क्लायन्ट मला विचारतात की, आम्ही बाहेरगावी गेल्यानंतर आमचं डाएट कसं मॅनेज करू? वजन वाढलं तर काय, याची अनेकांना भीती वाटते. बहुतेकांना जिथं प्रवास करू तिथले सगळेच पदार्थ खाऊन पाहायचे असतात.
त्यामुळे प्रवास, आहार, वजन, डाएट हे सगळं जमवायचं, तर काही गोष्टी लक्षात ठेवा..
(Image : Google)
प्रवासातलं डाएट कसं सांभाळायचं?
१. जस्ट चिल.. म्हणजे ट्रिप एन्जॉय करा! हिंडा फिरा ,फोटो काढा, मस्ती करा, कुटुंब-मित्र-मैत्रिणींसह वेळ घालवा. तिथं जे स्थानिक जेवण मिळेल, ते खा, फक्त अतिरेक टाळा.
२. प्रवासाला जाताना थोडेसे, जमतील तसे खाण्याचे पदार्थ घरुनही घेऊन जा. मखाना, खाकरा, चणे, ज्वारीच्या लाह्या, चिवडा अशा गोष्टी आपल्याला बरोबर ठेवता येतात.
३. आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये राहतो, तेव्हा तिथे गरम पाण्याची किटली असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर थोडेसे गरम पाणी आणि आवळा पावडर घेतली, तर उत्साह वाटेल, पोट साफ राहील आणि पित्तही होणार नाही.
४. ब्रेकफास्टमध्ये बऱ्याचदा अनेक पर्याय असतात. त्यामध्ये फळे असतात, तसेच भाज्यासुद्धा असतात आणि बरेच पदार्थ असतात. त्यामुळे स्वत:ला सोयीचं, पोटभरीचं, पोषक असं आपण खाऊ शकतो. गोड पदार्थ, बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे मात्र टाळले, तर फारच चांगले.
५. जेव्हा तुम्ही बाहेरगावी जाता, तेव्हा तुम्ही एखादी फायबर सप्लिमेंट बरोबर घेऊन जा.
६. पाण्याचे प्रमाण जमेल तेवढे जास्त ठेवा. प्रवास करत असाल, तर अनेकजण पाणी कमी पितात. कधी कधी सगळीकडेच बाथरूमची सोय होतेच, असं नाही, म्हणूनही अनेकजण पाणी कमी पितात. ते योग्य नव्हे. पाणी भरपूर प्या.
७. आपण कुठेही गेलो, तरी तिथे फळांची गाडी किंवा फळांची दुकाने आपल्याला दिसतात. त्यामुळे आवर्जून फळे विकत घ्या आणि जास्तीत जास्त फळे खाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे ऐकून गंमत वाटेल की, फळे खाऊन तुमची ट्रिप जितकी चांगली होईल तेवढे ते कुठलेही पदार्थ खाल्ल्याने होणार नाही. कारण तुम्हाला नॅचरल एनर्जी मिळेल, तसेच तुम्हाला हलकं आणि स्वतःबद्दल छान वाटत राहील.
८. बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्ले किंवा खूप मसालेदार पदार्थ खाल्ले, तर तुम्हाला एकप्रकारची मरगळ असेल आणि तुम्ही तुमची ट्रीप एन्जॉय करू शकणार नाही.
९. उन्हाळ्यात नारळ पाणी, लिंबूपाणी, उसाचा रस, ताडगोळे, काकडी अवश्य घ्या.
१०. शक्य झाले, तर दोन मेन मिल म्हणजे दोनदा जेवणाचे सूत्र पाळा म्हणजे डाएट करणे सोपे जाईल.
११. तुम्ही जात आहे त्या ठिकाणची जी काही स्पेशालिटी असेल तर ते पदार्थ अवश्य खा. मात्र प्रमाण सांभाळा.
१२. सहल एन्जॉय करा, पण म्हणजे उगीच आडवा हात मारायची गरज नाही. थोड्या थोड्या प्रमाणात सगळेच खाल्लं तर नक्कीच चालेल. पण फोकस फक्त खाण्यावर ठेवणं काही तब्येतीला मानवणारं नाही.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)