राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)
आता उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागलंय. साहजिकच थंडीत बाजूला ठेवलेले माठ बाहेर निघू लागले आहेत. फ्रिजमध्ये गार पाण्यासाठी बाटल्या ठेवल्या जाऊ लागल्या आहेत. माझ्याकडे या हंगामात येणारे रूग्ण हमखास विचारतात की पाणी कोणतं प्यावं? कोणतं पाणी पिणं चांगलं? माठातलं की फ्रीजमधलं? तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवताना काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
१. मुळात थंड पाणी प्यावं असा उन्हाळा अजून सुरु झालेला नाही, या वातावरणाला ‘वसंत ऋतू’ असं म्हणतात. म्हणजे थंडी कमी होऊन ऊन सुरु होण्याचा हा काळ. विविध कफाचे आणि त्याचबरोबर बदलत्या वातावरणामुळे होणारे आणि हवेद्वारे पसरणारे अनेक आजार होण्याची शक्यता असते. थंडीत आपण जो पौष्टिक आहार घेतो,स्निग्ध पदार्थ खातो यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कफ दोष साठतो पण बाहेर थंड वातावरण असल्यानं बाहेर पडू शकत नाही. मकरसंक्रांत झाली की हवेत उष्मा वाढायला सुरूवात होते आणि महाशिवरात्री नंतर थंडी अगदी पळूनच जाते! पाणी कोमट लागतंय,खूप गरम होतंय असं म्हणून जर लगेच माठ किंवा फ्रिजमधील गार पाणी प्यायला सुरु वात केली, आइस्क्रीम खाल्लं, ऊसाचा रस बर्फ टाकून प्यायला ,रस्त्यावर मिळणारी कुल्फी खाल्ली तर सर्दी,खोकला, ताप, घसा दुखणं,,टॉन्सिल्स सुजणं या तक्रारींना हमखास सामोरं जावं लागतं.
(Image : Google)
२. हवेतील वाढत्या उष्णतेमुळे गोवर,कांजिण्या, नागीण असे जीवाणू-विषाणूद्वारे पसरणारे आजार अचानक डोकं वर काढतात. काहीजणांना या वाढत्या उन्हामुळे नाकातून रक्त येण्याचा त्रासही होतो! वाढत्या उष्म्यामुळे कफ पातळ होतो आणि विशेषत: लहान मुलं मोठया प्रमाणावर आजारी पडतात. त्यामुळे निदान एप्रिल महिना सुरु होईपर्यंत तरी गार पाण्याचा मोह टाळावा. साधं फिल्टर, हंडा,कळशी यात भरलेलं सामान्य तापमानाचं पाणी पिणंच हितकारक आहे.
उन्हाळ्यातही फार थंड पाणी नकोच..
१. नंतर जेव्हा कडाक्याचा उन्हाळा सुरु होतो तेव्हा देखील सारखा घाम येत असल्यानं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि वारंवार तहान लागते, घशाला कोरड पडते. अशा वेळी केवळ थंड स्पर्शानं तात्पुरतं बरं वाटलं तरी तो परिणाम दीर्घ काळ टिकत नाही. त्यामुळे फ्रिजचं किंवा काही लोकं तर अक्षरश: बर्फ वितळून तयार होणारं गार पाणी पितात. त्यामुळे गार वाटेल असं त्यांना वाटतं पण त्याउलट असं पाणी पिण्यामुळे तहान तहान होते .शिवाय हे कृत्रिमरित्या थंड केलेलं पाणी पचायलाही खूप जड होतं त्यामुळे रोज हे पाणी प्यायलं तर भूक मरते, पचनशक्ती कमी होते आणि अग्नी मंद होतो.
(Image : Google)
२. माठातलं थंडगार पाणी
याउलट माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होत असल्यानं पथ्यकर असतं. इतकंच नव्हे तर ते तहान भागवणारं, तृप्ती देणारं असतं. मातीच्या अशा सच्छिद्र भांड्यातून पाणी जेव्हा झिरपतं तेव्हा ते बाहेर किती उष्णता आहे त्यानुसार कमी अधिक प्रमाणात झरतं आणि पाण्याचं तापमान त्यानुसार अनुकूल ठेवलं जातं. त्यामुळे चांगला भाजलेला, काळ्या मातीचा माठ असेल तर बाहेर कितीही उष्ण असलं तरी या माठात पाणी थंडगार होतं
३. त्यातही ज्यांना कफाचे आजार आहेत,दम्यासारखा त्रास आहे, खोकला येतो किंवा त्वचेचे काही आजार आहेत त्यांनी तर फ्रिजचं पाणी नक्कीच टाळावं. दिवसा माठातलं पाणी प्यावं आणि रात्नी मात्र फिल्टरचं पाणी प्यावं.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)