स्त्री असो अथवा पुरूष, हल्ली प्रत्येकजण आपल्या दिसण्याबाबत प्रचंड जागरूक आहे. यासाठी महागडे सौंदर्योपचार करण्याची किंवा महागडे कॉस्मेटिक्स खरेदी करण्याचीही अनेकांची तयारी असते. पण कॉस्मेटिक्समुळे मिळणारं असं वरवरचं सौंदर्य किती टिकणार? अशा वरवरच्या उपचारांच्या मागे लागणे आता सोडून द्या. कारण सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी शरीराच्यावरून कॉस्मेटीक्सचा लेप लावण्यापेक्षा आतूनच शरीर निरोगी कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शरीर जर निरोगी ठेवायचे असेल, तर योग्य आहार घेण्याइतका सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दुसरा कोणताही नाही. म्हणूनच तर आज आपण असे काही अन्नपदार्थ पाहू या जे आपल्याला तरूण ठेवतील आणि अकाली दिसून येणारे एजिंग इफेक्ट टाळले जातील. तुम्ही हे काही पदार्थ खातच असणार पण आता ते अजून नियमितपणे खा. कारण हे पदार्थ आहेत सुपरफुड. जे टिकवून ठेवतात तुमचं सौंदर्य.
१. अक्रोड
अक्रोड हा असा सुकामेवा आहे, ज्यात ओमेगा ३ हे फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कोलेस्टरॉलची पातळी संतुलित राहते आणि पचन क्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारली की आपोआपच त्वचेचे आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यशिवाय अक्रोडमध्ये खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अक्रोड रोज खाणे गरजेचे आहे.
२. ॲवाकॅडो
आपल्या भारतीय लोकांसाठी हे फळ जरा नविन आहे. पण हे फळ अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि ॲण्टीऑक्सिडंट्स देखील असतात. त्वचेला तजेलदार आणि टवटवीत ठेवायचे असल्यास ॲण्टीऑक्सिडंट्स अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणूनच ॲवाकॅडो नियमितपणे खावे. त्याचे सॅलडकरून काेशिंबीरीसारखे देखील खाता येते. गर्भवती स्त्रियांसाठी ॲवाकॅडो खूप लाभदायक ठरते.
३. ऑलिव्ह ऑईल
स्वयंपाकासाठी सामान्य तेल वापरण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स योग्य प्रमाणात असते. हे फॅट्स आपल्या शरीरासाठी आणि हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. याशिवाय ऑलिव्ह ऑईलमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
४. हिरव्या भाज्या
हिरव्या पालेभाज्यांचे महत्त्व तर आपण अगदी शालेय जीवनापासून ऐकत असतो. पण तरीही हिरव्या पालेभाज्या खाताना जरा नाके मुरडली जातात. पण तरूण आणि सुंदर दिसायचं असेल, तर मात्र असे करणे टाळा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आरोग्यासाठी पोषण ठरणारी जीवनसत्वे, खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसेच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, डोळ्यांचे विकार कमी होतात आणि केस, त्वचा व नखांचे आरोग्यही सुधारते.
५. लिंबू
लिंबू सगळीकडे अगदी सहज उपलब्ध असते. लिंबाचा वापर दररोज आपल्या आहारात करणे खूप आवश्यक आहे. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. या दोन्ही गोष्टी आपल्या त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.