Join us  

व्हाइट टी, पिऊन पाहिला आहे कधी? या पांढऱ्या चहाचे 4 जबरदस्त फायदे, करायला सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 1:59 PM

आरोग्यासाठी फायदेशीर चहा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर ग्रीन टीच येतो. पण आरोग्यतज्ज्ञ ग्रीन टीच्या बरोबरीनं व्हाइट टीलाही तितकंच किंबहुना ग्रीन टीपेक्षा जरा जास्तच महत्त्व देतात. तज्ज्ञांच्या मते आरोग्य सुदृढ ठेवण्याठी हा व्हाइट टी खूप गरजेचा असतो.

ठळक मुद्देव्हाइट टीवर अगदीच कमी प्रक्रिया केलेली असते त्यामुळे व्हाइट टी आरोग्यासाठी उपयुक्त समजला जातो. व्हाइट टीमुळे हदयाशी संबंधित गुंतागुंतीचा धोका टळतो.अनेक अभ्यासातून हे दिसून आलं आहे की, व्हाइट टी पिण्याचा फायदा त्वचेला देखील होतो.

चहाच्या बाबत सर्वचजण खूपच चोखंदळ असतात. आपल्या आवडीच्या स्वादाच्या चहाला महत्त्व दिलं जातं. पण चहावर प्रेम करणार्‍यांनी स्वादासोबतच आरोग्याचाही विचार करायला हवा. सध्याच्या काळात आपण जे काही खातो पितो त्यात आरोग्याला महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण दिवसातून दोन तीन वेळा चहा पित असू तर त्यातल्या किमान एक वेळा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा असलेला चहा अवश्य प्यावा. आरोग्यासाठी फायदेशीर चहा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर ग्रीन टीच येतो. पण आरोग्यतज्ज्ञ ग्रीन टीच्या बरोबरीनं व्हाइट टीलाही तितकंच किंबहुना ग्रीन टीपेक्षा जरा जास्तच महत्त्व देतात. तज्ज्ञांच्या मते आरोग्य सुदृढ ठेवण्याठी हा व्हाइट टी खूप गरजेचा असतो. व्हाइट टीवर अगदीच कमी प्रक्रिया केलेली असते त्यामुळे व्हाइट टी आरोग्यासाठी उपयुक्त समजला जातो. जे आरोग्यदायी जीवनशैलीचे पर्याय सतत शोधत असतात त्यांच्यासाठी तर व्हाइट टी हा उत्तम पर्याय आहे.

छायाचित्र- गुगल

व्हाइट टी का प्यावा?

1. व्हाइट टीमुळे हदयाशी संबंधित गुंतागुंतीचा धोका टळतो. व्हाइट टीमधे वनस्पतीजन्य घटक असतात. हे घटक शरीरात अँण्टिऑक्सिडण्टससारखे काम करतात. हे घटक पॉलीफेनॉलचा एक प्रकार असतात त्यांना कॅटेचिन्स म्हटलं जातं. हे घटक हदयासाठी उत्तम असतात.पॉलिफेनॉल्स रक्तवाहिन्यांचं काम सुलभ करतात तसेच रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज कमी करण्यासाठीही पॉलिफेनॉल्स मदत करतात. यामुळे हदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की रोज व्हाइट टी पिल्यास हदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.

2. व्हाइट टीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी जाळण्यासाठी व्हाइट टी पिणं उत्तम समजलं जातं. या चहात कॅफिनचं प्रमाण जास्त असतं. व्हाइट टीमधे ‘एपिगालोकॅटेचिन गॅलेट नावाचा वनस्पतीजन्य घटक असतो. हा घटक शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी महत्त्वाचा असतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात रोज व्हाइट टी घेतल्यानं पचनक्रिया सुधारते, चयापचय व्यवस्थित होतं. व्हाइट टी रोज पिल्यास रोज या चहाच्या मदतीनं 100 कॅलरीज कमी होतात.

छायाचित्र- गुगल

3. अनेक अभ्यासातून हे दिसून आलं आहे की, व्हाइट टी पिण्याचा फायदा त्वचेला देखील होतो. व्हाइट टीमधे पॉलिफेनॉल्स सेल्युलर घटक आणि इलास्टेज सारखे विकर यांना दाबतात किंवा कमी करतात. हे घटक त्वचा खराब करण्यास कारणीभूत असतात. व्हाइट टी रोज पिल्यानं त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचा ढीली होवून लोंबकळल्यासारखी दिसत नाही. त्वचेतील फायबरचं नेटवर्क त्वचा घट्ट ठेवण्यास मदत करतात. तसेच आतून बाहेरुन असणार्‍या एजिंगच्या समस्येपासून त्वचेचं संरक्षण करतात. व्हाइट टी पिल्यानं त्वचेतील हे फायबर नेटवर्क सुरक्षित राहातं. यामुळे आपली त्वचा निरोगे आणि सुंदर राहाते.

4. व्हाइट टीमधे असलेले खनिजं दातांमधे जिवाणू निर्माण होण्यास रोखतात. व्हाइट टीमधे जिवाणूविरोधी घटक असतात. यात फ्ल्युराइड, कॅटेचिन आणि टॅनिन सारखे खनिजं असतात. व्हाइट टीमधील फ्ल्युराइड दातांना किड लागण्यापासून वाचवतात आणि जिवाणुंच्या अँसिड हल्ल्याशी लढण्यास दातांची ताकद वाढवतात. व्हाइट टीमधील दातांचं किडीपासून संरक्षण करतात. तसेच व्हाइट टीमधील घटकांमुळे तोंडाचं आरोग्य चांगलं राहातं.

छायाचित्र- गुगल

व्हाइट टी कसा कराल?

व्हाइट टी करण्यासाठी टी बॅग्जपेक्षा चहापावडरचा वापर फायदेशीर ठरतो. कारण पाण्यात चहा पावडर चांगली मिसळली जाते. या चहातील तत्त्वं पाण्यात नीट उतरतात. व्हाइट टी तयार करणं अतिशय सोपं आहे.सर्वात आधी 1 कप पाणी उकळावं. पाणी उकळलं की एक कप पण्यात दोन चमचे व्हाइट टी पावडर घालावी. भांड्यावर झाकण ठेवून चहा पाच दहा मिनिटं झाकून ठेवावा. नंतर हे पाणी गाळून घेतलं की व्हाइट टी पिण्यासाठी तयार होतो.