नवरात्री, पूजाअर्चा, सजणेधजणे, उपवास या सगळ्यात नियमित व्यायाम कसा करावा असा प्रश्न आपल्यातील अनेकींना पडला असेल. उपवास असताना अंगात ताकद राहील का? मग मी व्यायाम केला तर मला काही त्रास तर होणार नाही ना? त्यापेक्षा थोडे दिवस व्यायामाला सुट्टी दिली तर असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर उपवास म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य. परमेश्वराचे वास्तव्य आपल्या जवळ असावे यासाठी केलेले व्रत म्हणजे उपवास. त्यामुळे उपवासाचा आणि व्यायामाचा काहीही संबंध नाही. उपवास करत असताना व्यायाम थांबविण्याची अजिबात गरज नाही. उपवास म्हणजे आपल्या आहारात बदल होतात, त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. अशावेळी आपण आपल्या व्यायामात बदल करु शकतो पण तो थांबविणे गरजेचे नाही. आपल्या आहारात जे बदल झाले आहेत त्याप्रमाणे आपल्या व्यायामात बदल करा. फलाहार म्हणजेच फळे खाऊन केलेला उपवास. आपण त्याचा फराळ केला. आता या फराळाला साजेसा असलेला व्यायामप्रकार कुठला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
म्हणून योगा ठरतो उपयुक्त व्यायाम...
योगा हा फलाहारासाठी किंवा फराळासाठी अतिशय उत्तम व्यायामप्रकार आहे. कारण बाकीच्या व्यायामप्रकारात शरीराचे उष्मांक मोठ्या प्रमाणात जाळले जातात. ते पुन्हा मिळवण्यासाठी भरपूर आहार आवश्यक असतो. पण उपवासादरम्यान हे शक्य नसल्यान या काळात योगा करणे केव्हाही फायद्याचेच. योगामध्ये उष्मांक जाळले न जाता ते साठवले जातात. इतर व्यायामप्रकारात घाम बाहेर पडतो तर योगामध्ये शरीर, मन व श्वास यांच्या गतीला आराम मिळतो. योगामुळे हृदयाच्या गतीवर नियंत्रण राहते. योगामुळे कमीत कमी हालचालींमध्ये शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत प्राणवायू व जीवनावश्यक पोषक द्रव्ये पोहोचवली जातात.
उपवास असताना व्यायामाआधी काय खावे ?
एरवी आपण व्यायामाआधी आहारात इतर काही पदार्थ सहज खाऊ शकतो पण उपवासादरम्यान व्यायामाआधी काय खावे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पूर्ण दिवसाचा उपवास करत असाल तर सकाळी उपाशीपोटी व्यायाम करणे टाळावे. उपवासाला चालतील असे कोणते आरोग्यदायी पदार्थ तुम्ही खाऊ शकता हे पाहणे महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया या पदार्थांविषयी..
१. उकडलेले किंवा भाजलेले रताळे - रताळे बटाट्यापेक्षा कधीही आरोग्याला चांगले असते. रताळ्याला स्वत:ची अशी एक चव असते. त्यामुळे तुम्ही त्याला साखर, जूळ, मीठ अे काहीही लावले नाही तरीही ते उकडून किंवा भाजून चांगले लागते. उपवास करत असताना योगा किंवा इतर कोणता व्यायाम करत असाल तर रताळे खाणे चांगले.
२. केळी - केळ्यात शरीराला आवश्यक असे बरेच पोषक घटक असल्याने ते आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतात. केळ्याने पोटही भरते. त्यामुळे व्यायामाआधी तुम्ही केळे खाऊ शकता. पण सध्या पावसाळी वातावरण असल्याने तुम्हाला कफ असेल तर केळी खाणे टाळा.
३. दूध , गुडदाणी - दूधात प्रथिने असतात. तसेच गुडदाणीमध्ये असणारे दाणे, राजगिरा आणि गुळ या पदार्थांमुळे शरीराची लोहाची कमतरता भरुन काढली जाते. राजगिरा पचायला हलका आणि आरोग्यास उत्तम घटक असल्याने हे दोन्ही तुम्ही व्यायाम सुरु करण्यापूर्वी खाऊ शकता.
४. चिकू - सध्या बाजारात चांगल्या प्रतिचे चिकू उपलब्ध आहेत. चिकू अतिशय आरोग्यदायी फळ असून ते पुरेसे गोड असते. त्यामुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळू शकते.
५. खजूर, सुकामेवा - एरवीही मुली आणि महिलांनी हिमोग्लोबिन पातळी चांगली राहण्यासाठी व शरीराचे उत्तम पोषण होण्यासाठी खजूर व सुकामेवा खायला हवा असे म्हटले जाते. उपवासादरम्यान तर या गोष्टी आवर्जून खायला हव्यात. नुसते खायचे नसेल तर खजूर रोल, सुकामेव्याचे लाडू असे पदार्थ तुम्ही व्यायामाआधी जरुर खाऊ शकता.
योग म्हणजे काय समजून घ्या...
योग म्हणजे केवळ आसने नाही. योगासन हे अष्टांगातील एक अंग आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी यांचा समावेश होतो. त्याआधी शरीरशुद्धी, मनशुद्धी, अध्यात्मिकता महत्त्वाची आहे.
१. यम - यम म्हणजे संयम. तुम्ही उपवास करता म्हणजे आहारावर नियंत्रण म्हणजेच शरीराच्या भूकेवर नियंत्रण ठेवता व मनावर विजय मिळवता.
२. नियम - नियम म्हणजे शरीरशुद्धी. शरीराला आवश्यक नसणारे पदार्थ पोटात जात नाहीत. अशावेळी शरीराच्या आंतरिक भागाची शुद्धी होते. उदा. यकृत, मोठे आतडे, छोटे आतडे, पोट यांची स्वच्छता होते.
३. आसन - आसनामुळे शरीराची होणारी झीज रोखली जाते. स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे आसन.
४. प्राणायाम - प्राणायमामुळे प्राणवायू शरीरात साठवण्याची क्षमता वाढते. या प्रक्रियेमुळे नाडी शुद्ध होते व प्राणवायू प्रत्येक अणूरेणूपर्यंत पोहोचतो.
५. प्रत्याहार - उपवासामध्ये प्रत्याहाराला खूप महत्त्व आहे. अनावश्यक किंवा सकारात्मक वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टीतून आपल्या संवेदना काढून घेण्याची पद्धत.
६. धारणा व ध्यान - ध्यान व धारणा हे शांत चित्तासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे मोकळा वेळ मिळाला की प्रत्येकाने ध्यान-धारणा करावी.
कोणती व कशी योगासने करावीत....
१. योगासने शक्यतो जेवण किंवा नाश्ता यानंतर २ तासाने करावीत.
२. योगासने करण्याआधी मानेपासून पायापर्यंत शरीराची हालचाल करावी. ही हालचाल फिल करावी.
३. १५ ते २० मिनिटे पाठीवरील, पोटावरील आणि बैठक स्थितीतील आसने करावीत.
४. यात ५ मिनिटे शवासन जरुर करावे. हे करताना तुम्हाला आवडत असेल तर एखादे संगीत लावू शकता.
मनाली मगर-कदम
योग थेरपिस्ट