वजन कमी करण्यासाठी खाण्यातल्या गोष्टी वजा करत जाण्यापेक्षा तुम्ही आहारात काय पौष्टिक घटक समाविष्ट करतात याला खूप महत्त्व आहे असं वेटलॉस आणि डाएट या विषयातील तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे क्रॅश डाएट किंवा फॅड डाएट हे वजन कमी करण्यासाठी परिणामकारक ठरत नाही. या डाएटचा परिणाम थोड्या काळापूरताच राहातो. याबाबतच्या शास्त्रीय अभ्यासाअंती अभ्यासक म्हणतात की क्रॅश डाएटिंगमुळे तात्पुरतं वजन कमी होत असलं तरी नंतर मात्र पोट वाढणं आणि स्नायू कमजोर होणे यासारखे परिणाम दिसतात. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी आपण काय खातोय , त्यादृष्टीनं आहारात कसला समावेश करता येईल याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आहारातले पदार्थ वजा करुन वजन कमी करणं साध्य होत नाही . उलट त्यामुळे पोषण मूल्यांमधे असमतोल निर्माण होतो. त्याचे विपरित शरीरावर होतात. हे सर्व टाळून वजन कमी करण्याचा उद्देश साधण्यासाठी काय खाता येईल याचा विचार केल्यास अनेक पौष्टिक पर्याय समोर येतात. त्यातलाच आहारात डाळींचा समावेश हा मुद्दा महत्त्वाचा आहे. डाळी अनेक प्रकारच्या आहेत. प्रत्येक डाळीत भरपूर पोषण मूल्यं असतात. पण वजन कमी करणं आणि पोषण साधणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवता तज्ज्ञ मूग, मसूर आणि कुळीथ डाळीला महत्त्व देतात.
मूग डाळ
वजन कमी करण्यासाठी मूग डाळीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मुगाच्या डाळीत भरपूर प्रमाणात तंतूमय घटक आणि प्रथिनं असतात. मूग डाळ ही पचण्यास हलकी आणि प्रथिनांनीयुक्त असते. या डाळीत असलेल्या तंतूमय घटकांमुळे ही डाळ खाल्ल्यानंतर भरपूर काळ पोट भरलेलं राहातं . या दोन गोष्टींमुळे वजन कमी करण्यासाठी आहारात मूग डाळीचं वरण - आमटी - सूप असणं महत्त्वाचं मानलं जातं.
मसूर डाळ
मसूर डाळीत अगदी योग्य प्रमाणात कर्बोदकं असतात. यामुळे ती खाल्ल्यानंतर पोटभरीची भावना निर्माण होते. या डाळीत फॅटचं प्रमाण कमी असतं. यात असलेल्या तंतूमय घटकांमुळे पचनाची क्रिया हळू होते. त्याचा फायदा वजन कमी होण्यास होतो. एक कप मसूर डाळीच्या सेवनाने आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वं, प्रथिनं आणि इतर पोषक घटक मिळतात. १०० ग्रॅम मसूर डाळीत ३५२ उष्मांक असतात २४.६३ग्रॅम प्रथिनं असतात. त्यामुळे मसूर डाळ अवश्य खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. वजन कमी करण्यासाठी तंतूमय घटक मोठी भूमिका बजावतात असं आहार तज्ज्ञ म्हणतात. या तंतूमय घटकांचा विचार करता मूग डाळ आणि मसूर डाळ यांचा आहारात आवर्जून समावेश करण्यास सांगतात.
कुळीथ डाळ
वजन कमी करण्यासाठी कुळीथ खावीच असं तज्ज्ञ म्हणतात. कारण कुळीथामुळे फक्त वजन कमी होण्यास गतीच मिळते असं नाही तर आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमतरता कुळीथमधल्या पोषक तत्त्वांनी भरुन निघते. शाकाहार करणाऱ्यांसाठी तर कुळीथ डाळ ही प्रथिनांचे मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे कुळीथाचा समावेश आहारात करण्याचा सल्ला अभ्यासक देतात. कुळीथामधे तंतूमय घटक, जीवनसत्त्वं, खनिजं असतात. शिवाय त्यात उष्मांक कमी असतात. त्यामुळे कुळीथ हे प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरतं असं तज्ज्ञ म्हणतात.