मधुमेहाचा आजार अगदी बाउण्ड्रीवर असला तरी आहाराची काळजी घ्यावीच लागते. हा आजार बळावला की इतर आरोग्यविषयक समस्याही उद्भवतात. या धोक्यापासून वाचायचं असल्यास औषधं, आहाराची पथ्यं यासोबतच स्वयंपाकघरातील मसाल्यातले चार जिन्नसही आहेत महत्त्वाचे. आरोग्य तज्ज्ञ बडीशेप, हळ्द, दालचिनी आणि मेथ्या या चार मसाल्याच्या पदार्थांना आपल्या आहारात अवश्य समाविष्ट करण्याचा सल्ला मधुमेही रुग्णांना देतात. या मसाल्यांमधे असं आहे तरी काय?
1. बडीशेप- ‘ओपन जर्नल ऑफ न्यूट्रीशन अँण्ड फूड सायन्स’ च्या एका शोधानुसार बडीशेपात फायटोकेमिकल्स असतात. हे फायटोकेमिकल्स हे अँण्टिऑक्सिडेण्टससारखे असतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायटोकेमिकल्स मदत करतात. हा घटक शरीरातील इन्शुलिनचं प्रमण वाढवतो. तसेच बडीशेपात डिटॉक्सिफायिंग घटक असतात. हे घटक रक्त शुध्द करण्यास मदत करतात. आहारतज्ज्ञ स्वयंपाकात बडीशेपाचा वापर करण्याचा सल्ला देतात तसेच जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाण्याचा किंवा बडीशेपाचा चहा पिण्याचा सल्ला देतात.
2. हळद- आरोग्य तज्ज्ञ सांगतात की हळदीमधे करक्युमिन हा घटक असतो. हा घटक अँण्टिऑक्सिडण्टससारखा काम करतो. मधुमेह असलेल्यांनी नुसती थोडी हळद खाणं फायदेशीर ठरतं. हळदीमधे सूज आणि दाहविरोधी घटक असतात. हे घटक मधुमेह रुग्णांसाठी फार महत्त्वाचे असतात. छोटा पाव चमचा हळद खाणं किंवा हळद पाणी पिणं या स्वरुपात हळद सेवनाला महत्त्व आहे.
3. दालचिनी- दालचिनीत विषाणूविरोधी, जीवाणूविरोधी आणि बुरशी विरोधी घटक असतात. तसेच दालचिनीत दाहविरोधी घटक असतात. दालचिनीत अँण्टिऑक्सिडण्टस आणि पॉलीफेनॉल्स हे घटकही मोठ्या प्रमाणात असतात. दालचिनीत मिथाइल हाइड्रॉक्सी चालकोन पॉलीमर हा घटक असतो जो ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करतो. त्यामुळे भाज्यांमधे दालचिनीचा वापर करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.
4. मेथ्या- मेथ्यांमुळे पचन प्रक्रिया सुधरते तसेच कर्बोदकं शोषण्याची क्षमता मेथ्यांमुळे कमी होते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी घटवण्यास तसेच शरीरातील सूज आणि दाह कमी करण्यासही मेथ्यांचा उपयोग होतो. मेथ्या भिजवून खाणं, मोड आलेल्या मेथीची उसळ खाणं किंवा मेथ्या भिजवलेलं पाणी पिणं आणि सोबत भिजवलेल्या मेथ्या खाणं हे मेथ्यांचा आहारात समावेश करण्याचा पर्याय आरोग्यतज्ज्ञ देतात.