पंचतारांकित हॉटेलमध्ये जरी जेवण करून आलं तरी स्ट्रीट फुड आणि त्यातही पाणीपुरीचा गाडा बघितल्यानंतर अनेक जणांच्या तोंडाला हमखास पाणी सुटतंच.. स्ट्रीट फूडच्या चवीची तिच तर खरी खासियत आहे.. कित्येक जण तर असे असतात की १ प्लेट पाणीपुरी खाऊन अजिबात समाधान होत नाही. ४- ५ प्लेट मनसोक्त पाणीपुरी (Benefits of eating gol gappe) खाल्ली की त्यानंतर एक प्लेट भरून सुकी पुरी आणि त्यातच मग मनाची आणि जिभेची तृप्ती.. असा हा सारा पाणीपुरीचा खेळ..
पाणीपुरी खूप खावी वाटत असेल, पण आरोग्याची चिंता करून ती खात नसाल तर असं करू नका.. कारण तज्ज्ञ सांगत आहेत की पाणीपुरी ही आरोग्यासाठी हानिकारक नाही तर उलट पोषक आहे. आता ही पाणीपुरी तुम्ही कुठे खात आहात, हे मात्र तपासून घ्या. कारण रस्त्यांवर जे पाणीपुरीचे गाडे असतात, त्यावर अनेकदा स्वच्छता पाळली जात नाही. त्यामुळे अशी अस्वच्छ ठिकाणची पाणीपुरी आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे.
पण घरी किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी तयार झालेली पाणीपुरी तुम्ही खाणार असाल, तर ती तुमच्या आरोग्यासाठी पोषकच (eating panipuri or gol gappe is healthy) आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. आहारतज्ज्ञ उपासना शर्मा यांनीही याबाबत हेच मत व्यक्त केलं आहे. आता पाणीपुरी आरोग्यासाठी पोषक कशी, असा प्रश्न पडला असेल, तर वाचा पाणीपुरी खाण्याचे हे फायदे....
पाणीपुरी आरोग्यासाठी पोषक कशी... (Benefits of eating pani puri)- पाणीपुरीमध्ये असणाऱ्या पदार्थांमधून आपल्याला मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन A, B6, B12, C, आणि व्हिटॅमिन D हे घटक मिळतात. - पाणीपुरीच्या पाण्यात जिरे, पुदिना, चिंच हे घटक असतात. हे सगळे घटक वजन कमी करण्यासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठी (weight loss and digestion) उत्तम असतात.- पुदिन्यामध्ये असणारे फायबर, व्हिटॅमिन ए, लोह, मँगनीज आरोग्यासाठी पोषक आहेत. - पाणीपुरीची आंबट- गोड चव तुमचा मुड फ्रेश करण्यासाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे जेव्हा लो फिल करत असाल किंवा मुड ऑफ असेल, तेव्हा पाणीपुरीची एखादी प्लेट खाऊन बघा.. मुड फ्रेश होईल.
- पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते.- पाणीपुरीमध्ये काळे मीठ असते. या मीठामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे असतात. पचन क्रियेचे कार्य सुधारण्यासाठी काळे मीठ उपयुक्त ठरते. तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही काळे मीठ खाणे फायदेशीर आहे. मांसपेशींच्या मजबुतीसाठीही काळे मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. - एवढे सगळे फायदे आहेत म्हणून पाणीपुरीवर मनसोक्त, यथेच्छ ताव मारू नका. एकावेळी ६ पाणीपुरी खाणे योग्य आहे, त्यातून जवळपास १८० कॅलरी मिळतात, असे तज्ज्ञ सांगतात.