थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळावी आणि पोषण व्हावे यादृष्टीने आपण आहारात काही बदल करतो. यामध्ये आपण शरीराला उष्णता देणारे पदार्थ तर खातोच. पण गरम आणि ताकद वाढवणारे पदार्थही खातो. यामध्ये तीळ, डिंकाचे लाडू, गूळ, सुकामेवा या गोष्टींचा समावेश असतो. सुकामेवा खाणे आरोग्यासाठी उत्तम असल्याने थंडीच्या काळात लहान मुलांना आणि सगळ्यांनाच सुकामेवा देण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र हा सुकामेवा नक्की कसा खाल्ला तर आपल्याला त्याचे पूर्ण फायदे होतात याबाबत आपल्याला माहिती असेलच असे नाही. अशावेळी आपण घेत असलेल्या आहाराचे म्हणावे तितके फायदे होतातच असे नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना ती किती प्रमाणात, कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळेला खायला हवी याविषयी आपल्याला योग्य ती माहिती असायला हवी. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार आपल्याला याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देतात. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या ड्रायफ्रूटस खाताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याविषयी सांगतात (Tips for having Dry Fruits in Winter)...
१. सुकामेव्यामध्ये फॅटस, प्रोटीन आणि फायबर असे सगळे घटक असतात. तसेच सुकामेवा उष्ण असतो. त्यामुळे सुकामेवा पचण्यासाठी काही प्रमाणात जड असतो. त्यामुळे कधीही सुकामेवा खाताना तो तसाच न खाता ६ ते ८ तास पाण्यात भिजवून मगच खायला हवा. भिजवल्यामुळे त्यातील उष्णता निघून जाण्यास आणि ते पचण्यास मदत होते.
२. आता आपण काहीवेळा गडबडीत सुकामेवा भिजवायला विसरतो आणि आपल्याला तो खायचा तर असतो. अशावेळी एखाद्या पॅनवर किंवा कढईमध्ये हे ड्राय फ्रूटस भाजून मग ते खाल्ले तरी ते पचायला हलके होतात.
३. ड्राय फ्रूटस शक्यतो सकाळी उठल्या उठल्या किंवा ११ ते १२ वाजता, ४ वाजता असे खाल्ले तरी चालतात. त्यामुळे तुम्हाला मधल्या वेळात काहीतरी खाण्याची इच्छा होते त्यावेळी हा चांगला पर्याय होऊ शकतो.
४. आता एका दिवसांत किंवा एका वेळी नेमके किती ड्राय फ्रूटस खायला हवेत असाही प्रश्न आपल्याला काही वेळा पडतो. तर ज्यांना पचनाशी निगडीत तक्रारी नाहीत, हिटचा त्रास नाही किंवा जे व्यवस्थित पाणी पितात. जे नियमितपणे व्यायाम करतात आणि ज्यांना आरोग्याच्या इतर काही तक्रारी नाहीत त्यांनी मूठभर सुकामेवा रोज खायला हरकत नाही.