दिपावळीचा पहिला दिवा लागतो तो गायीच्या आणि तिच्या वासराच्या साक्षीने. शिवाय सुरसुरी हाता घेऊन ''दिन दिन दिवाळी.... गायी म्हशी ओवाळी.... '' असं म्हणत म्हणतंच आपल्याकडची प्रत्येक पिढी लहानाची मोठी झाली आहे. दिपावळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गायीचं महत्त्व अधोरेखित होतं. गायीला मातृसमान तर गाईच्या दुधाला अमृत मानणारी आपली संस्कृती. अनेक अभ्यास आणि संशोधनातून गायीच्या दुधाला हा दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच तर आज वसुबारसचं मुहूर्त साधून दररोज गायीचं दुध प्यायला सुरुवात करा. तब्येत तर सुधारलेलच पण बुद्धी तल्लख होईल. त्यामुळेच तर लहान मुलांनाही गायीचं दुध आवर्जून द्यायला हवं...
गायीचं दुध पिण्याचे फायदे
१. वजन कमी करण्यसाठी अतिशय उपयुक्त
गायीच्या दुधात चरबीचं प्रमाण कमी असतं. पण त्याउलट त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषणमुल्ये असतात. त्यामुळे हे दुध प्यायल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तर मिळतेच, शिवाय वजन वाढण्याचं टेन्शनही नाही. कारण गायीच्या दुधाने शक्ती मिळते अणि पुढे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी दररोज सकाळी एक ग्लासभर गायीचं कोमट दुध प्यावं.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आजवर गायीच्या दुधावर अनेकदा संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून प्रामुख्याने समोर आलेली एक बाब म्हणजे गायीच्या दुधात खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता असते. गायीच्या दुधात प्रोबायोटिक्स म्हणजेच निरोगी सुक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात असतात. हे सुक्ष्मजीव आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच निरागी जीवनासाठी दररोज एक ग्लास किंवा एक कप तरी गायीच दुध घ्यायलाच हवं.
३. त्वचाविकारांवर उपयुक्त
गायीचे दूध अनेक त्वचाविकारांवर प्रभावी ठरते. सोरायसिस सारख्या आजारातही गायीचे दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. अंगाला खाज येत असेल किंवा पुरळ उठले असेल, हातापायांची तसेच डोळ्यांची आग होत असेल तर गायीचे दूध घेण्याचा किंवा त्या जागेवर गायीचे दूध लावण्याचा सल्ला दिला जातो. या उपचारामुळे त्वचारोग बरा होतो. तसेच तोंड येणे, तोंडात फोड येणे, तोंडाच्या आतल्या भागत कोणत्याही कारणामुळे जखमा होणे यासाठी देखील गायीचे दुध उपयुक्त ठरते.
४. दम्याच्या रूग्णांसाठीही उपयुक्त
साधारणपणे असे म्हटले जाते की सर्दी, खोकळा, कफ, दमा असा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दूध पिऊ नये. पण अशा रूग्णांना गायीचे ताजे दूध पिण्यास काहीच हरकत नाही. कारण दमा, कफ हे आजार नियंत्रित ठेवण्याची क्षमता गायीच्या दुधात असते. ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांची कफप्रवृत्ती आहे, त्यांनी एक कप गाईच्या दुधात ८ ते १० तुळशीची पाने आणि दोन लेंडी पिंपळी आणि जेवढे दूध घेतले तेवढेच पाणी टाकावे. हे मिश्रण उकळावे आणि त्यानंतर कोमट झाल्यावर प्यावे. यामुळे शरीरातील कफ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि दम्याच्या रूग्णांना आराम मिळतो.
५. पचनाचा त्रास होतो दूर
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना गायीचे दूध अतिशय गुणकारी आहे. रोज रात्री गायीचे दूध एक कपभर घ्यावे. हे दूध गरम करावे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकावे. असे दूध गरमगरम पिल्याने पचनाचा त्रास दूर होतो.
६. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते
फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी गायीचे दूध हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी गायीचे दूध एक कप घ्यावे. यामध्ये तेवढेच पाणी टाकावे. त्यात ५ ते ६ लसूण पाकळ्या टाकाव्या आणि हे दूध उकळावे. साधारण उकळल्यानंतर मिश्रण अर्धे होईपर्यंत आटले की ते गरम गरम पिऊन घ्यावे.
७. केसगळती कमी होते
गायीच्या दुधात व्हिटॅमिन डी आणि झिंक हे केसगळती रोखणारे दोन्ही पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे केस गळतीचा त्रास असेल तर दररोज रात्री गायीचे गरम दूध प्यावे. यामुळे तुमचे आणि तुमच्या केसांचेही आराेग्य सुधारते.