कोण होणार करोडपती ? या कार्यक्रमात एका स्पर्धकाला सचिन खेडेकर यांनी एक फुलाचा फोटो दाखवला आणि ते फुल कोणतं हे ओळखण्यास सांगितलं. तो फोटो केळफुलाचा होता. तेव्हा मुलानं प्रश्न विचारला, ‘आई हे फुल फक्त शोभेचं असतं का?’ त्याच्या या प्रश्नाचं उत्तर, ‘ नाही ते खूप औषधी असतं असं सांगितलं.’ पण औषधी म्हणजे नेमकं काय हे मात्र सांगता आलं नाही. आपल्या परसातल्या केळीच्या झाडाला येणारं फुल हे फक्त आपल्याला पाहूनच माहिती असतं, त्यातले बारकावे मात्र माहीत नसतात याचा खरोखर खेद वाटला.खरंतर ही परिस्थिती अनेकजणांची. याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता केळफुलाचे अनेक गुणधर्म तर समजलेच पण ते आपल्या आहारात कसं समाविष्ट करावं हे देखील समजलं.
छायाचित्रं- गुगल
केळफुलात काय असतं?
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार केळफुलाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. केळफुलात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. केळफुलात प्रामुख्यानं फायबर, प्रथिनं, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबं, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्वं असतात.1. आयुर्वेदात केळाच्या फुलाचा काढा करुन मधुमेह असलेल्यांना पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे इन्शुलिनची पातळी कमी होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी केळफुलाची भाजी खाण्याचाही सल्ला दिला जातो.
2. केळफुलात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आणि त्यातील फायबरमुळे वजन कमी करण्यातही या फुलाची मदत होते. वजन कमी करण्यासाठी केळाच्या फुलाचा उपयोग सूप किंवा कोशिंबीरीत करण्याचा सल्ला दिला जातो.
3. केळफुलाचा उपयोग आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही होतो. केळ्फुलातील गुणधर्मांमुळे त्याचं सेवन केल्यास आपला मूड सुधारतो. केळफुलात असलेलं मॅग्नेशियम तणाव कमी करतं आणि नैराश्य येण्यापासून वाचवतं. केळफुलात अँण्टिऑक्सिडण्ट तत्वं असतात. हे घटक आपलं फ्री रॅडिकल्सपासून आपलं संरक्षण करतात. फ्री रॅडिकल्सचा परिणाम त्वचेवर जसा होतो तसाच यामुळे अल्झायमर, पार्किनसन्स या आजरांचा धोकाही असतो. केळफुलाचा समावेश आपल्या आहारात नियमित किंवा वरचेवर ठेवला तर त्याचा उपयोग शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासही होतो.
4. केळफुलाच्या काढ्यात हळद, मिरे पूड आणि जिरे घालून तो पिल्यास हे सूप गर्भाशयाशी निगडित समस्या दूर करतं. केळफुलाच्या या काढ्याचा उपयोग मनातील भीती दूर करण्यासही होतो.
5. केळफुलातील फायबर पचनास मदत करतं. सेवन केलेल्या आहारातील पोषक तत्त्वं शोषून घेण्यास केळफुलातील गुणधर्म उत्तेजन देतात.
6. टॅनिन, अँसिड, फ्लेवोनॉइड आणि अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतं. हे घटक फ्री रॅडिकलशी लढण्यास उत्तेजन देतात. तसेच केळफुलातल्या या गुणधर्मांमुळे कर्करोग आणि हदयरोगाचा धोका कमी होतो . केळफुलाच्या काढ्याचा उपयोग किडनीशी संबंधित समस्या दूर करण्यास होतो.
केळफुलाची भाजी
छायाचित्रं- गुगल
केळफुलाच्या भाजीसाठी एक केळफुल, पाव कप काळे चने किंवा वाटाणे, 1 चमचा तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे गूळ, आंबटपणासाठी चिंचेचा कोळ किंवा 2 आमसुलं, चवीपुरतं मीठ, पाव कप नारळाचा चव हे साहित्य घ्यावं.
केळफुलाची भाजी करताना पाव कप चणे आधी पाण्यात सहा ते सात तास भिजत ठेवावेत. केळफुलं सोलून घ्यावे. केळफुलाची आमसुली रंगाची सालं काढून आतमधे असलेले कळ्यांचे गुच्छ वेगळे करुन घ्यावेत. हळुहळु आतमधे कोवळ्या कळ्या मिळत जातात. शेवटी शेवटी केळफुलात पांढरा दांडा लागला की सोलणं थांबवावं. प्रत्येक कळीमधला काळा दांडा आणि पारदर्शक पातळ पापुद्रा काढून टाकावा. सर्व कळ्या सोलून झाल्या की त्या बारीक चिरुन घ्याव्यात.
छायाचित्रं- गुगल
एका खोलगट पातेल्यात मिठाचं पाणी तयार करावं. चिरलेली केळफुलं मिठाच्या पाण्यात तीन चार तास भिजवून ठेवावेत. यामुळे केळफुलाचा चीक आणि काळपट राप निघून जाईल. केळफुलं हातानं घट्ट पिळून घ्यावीत. केळफुलं आणि चणे वेगवेगळ्या डब्यात ठेवून प्रेशर कुकरमधे ठेवून तीन शिट्या करुन वाफवून घ्यावेत.कढईत तेल गरम करावं. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. शिजवलेले चणे आणि केळफुलं फोडणीस घालावे. ते फोडणीत परतून घेऊन त्यात काळा मसाला, चवीपुरतं मीठ आणि चिंचेचा कोळ घालून वाफ काढावी. भाजीला थोडा रस्सा हवा असल्यास त्यात थोडं पाणी घालावं. पाण्याला उकळी आली की त्यात गूळ घालून पुन्हा भाजी शिजवावी. भाजी शिजली की त्यात खोवलेलं नारळ घालावं.