मंदार वैद्य
बाजारात भाजी घ्यायला गेले की सगळी गर्दी टाळून एखाद्या कोपऱ्यात पाटीत अगदी थोडीशी भाजी घेऊन बसलेली आजीबाई, तुम्ही पाहिलीय का? तिच्या पाटीतली भाजी आकर्षक रीतीने सजवलेली नसते, आजीबाई जोरजोरात ओरडून ग्राहकांना बोलवातही नाही, पण तरीही घरी जाताना तिची भाजी संपलेली असते. आजीबाईच्या पाटीतल्या भाज्या पण विशेष असतात, स्वतः उगवलेल्या. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, वालाच्या शेंगा, गावठी शेपू, छोट्या डिंगऱ्या, भलामोठा दुधी भोपळा, आंबट चुका, गावठी काकडी... असं बरच काही. चवीनी खाणार तो माझ्याकडे येणार हे आजी बाईंना माहित असतं त्यामुळे ओरडून ग्राहक बोलवण्याची गरजच नसते.
अशाच रंगीत रुचकर भाज्यांचा विचार करताना सगळ्यात पाहिला लाल रंग आठवतो. लाल माठ, लाल अंबाडी आणि लाल देठाचा पालक..या सगळ्या भाज्या छोट्याशा परसात, बागेत, कुंडीत अगदी सहज उगवता येतात. भाजी चवीला रुचकर तर असतेच सोबत आपल्याला आवश्यक लोह आणि तंतुमय पदार्थांचा पुरवठा होतो. चवीला तेज आणि वासाचा घमघमाट असलेला लाल रंगाचा गावठी लसूण हल्ली अभावाने दिसतो.
लहान असतानां अळूवड्यांमुळे घशाला खाज सुटते हे माहित असूनही मनसोक्त अळूवडी खायचो. घरी अळूवड्या करण्यासाठी काळ्या देठाचा अळू आवर्जून शोधावा लागतो, अळूची चिंच गूळ घालून केलेल्या भाजी साठी मात्र पोपटी पानांचा अळू चवदार लागतो.
खरंतर हिरव्या रंगाच्या भाज्या मध्येही विविध छटा, गंध आणि स्वतःचा स्वाद असतोच. हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीला आम्ब म्हणतात, शेतात असतानाच हिरवागार रंग, हा पाला वाळवल्यावर थोडासा काळपट हिरवा होतो. हरभऱ्याच्या वाळवलेल्या पाल्याची भाजी करण्याच्या अनेक पारंपरिक पाककृती आहेत. बाजरीचे पीठ लावून केलेली हरभऱ्याच्या पाल्याची भाजी जिभेवर रेंगाळणारी चव तर देऊन जातेच सोबत पचनशक्ती वाढवण्यास मदतही करते. आंबट चुक्याचा रंग पोपटी असतो, तर मुळ्याच्या पाल्याचा हिरवागार. हल्ली बाजारात मुळ्याचा पाला फेकून दिला जातो, पण कोवळ्या मुळ्याच्या पाल्याची डाळीचे पीठ पेरून केलेल्या भाजी रुचकर तर असतेच पण किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचेही सांगितले जाते.
विविध आकार, रंग असणारी आणखीन एक भाजी म्हणजे वांगी. भारताची भली मोठी हिरवी वांगी, भरल्यवांग्यासाठी इवलीशी पांढरट जांभळी काटेरी वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी साठी माध्यम आणि गर्द जांभळी वांगी अशी ना संपणारी यादीच आहे.
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक चे लाल भोपळे पूर्वी विविध आकारात बघायला मिळायचे. वरून हिरवट पिवळा असलेल्या भल्यामोठ्या गोलाकार किंवा लांबट भोपळ्याचंही भाजी, दही घालून केलेले डांगर आणि भोपाळ घाडगे नुसती नावं ऐकूनच भूक लागते.
खरंतर महाराष्ट्राची पारंपरिक खाद्य संस्कृती जैविविधतेच्या विविध रंग, गंध आणि चवींनी समृद्ध आहे, बदलत्या काळात मात्र ही खाद्य संस्कृती आता आपल्या ताटातून हळू हळू हरवतेय की काय अशी भीती वाटू लागली आहे. बाजारात, मॉल मध्ये आकर्षक पद्धतीने रचून ठेवलेल्या, एकदम चकचकीत रंगाच्या त्याच त्याच भाज्यांनी आपलं हल्लीच जेवण एकदम एकसुरी करून टाकलंय. बालपणी जिभेवर रंगळणाऱ्या चवी आणि विविध रंगी भाजीपाला आता अभावानेच अनुभवायला मिळतात. या पारंपरिक भाज्यांचे पोषण मूल्य ही अमोघ होते, तेंव्हा याच भाज्या इम्युनिटी बुस्टरच काम करायच्या. या सगळ्या चवी, गंध आणि रंग पुन्हा एकदा आपल्या आहार सवयीत आल्या तर वरून इम्युनिटी बुस्टर घेण्याची गरज राहणारच नाही.
(लेखक सेंद्रीय आणि शहरी शेती अभ्यासक आहेत.)