‘हल्दीवाला पानी रोज की कहानी’ हा शायराना अंदाज आहे अभिनेत्री सारा अली खानचा. इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो टाकला आहे. हा फोटो आहे हळद पाण्याच्या मगचा. आणि या फोटोवर तिने या ओळी लिहिल्या आहेत. रोज सकाळी न चुकता आपण हळदीचं पाणी पितो हे तिनं या पोस्टद्वारे शेअर केलं आहे. त्वचा, वजन आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींची काळजी सकाळी एक मग पित असलेलं हळद पाणी घेतं असं ती सांगते.
साराच्या या पोस्टमुळे सौंदर्य आणि वजन कमी करण्याच्या अंगानं हळद पाण्याची चर्चा व्हायला लागली आहे. सौंदर्य तज्ज्ञ आणि फिटनेस तज्ज्ञही या हळद पाण्याला उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानतात. हे डिटॉक्स ड्रिंक एकूणच आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम मानलं जातं.
हळदीला आपल्या आहार संस्कृतीत खूप महत्त्वाचं स्थान आहे. हळद ही केवळ एक मसाल्यातली सामग्री नसून याला पारंपरिक आणि प्रभावी औषध मानलं जातं. त्यामुळेच एक छोटा चमचा का होईना पण हळद ही पोटात जाण्याला अजूनही तितकंच महत्त्व आहे. सारा अली खानच्या हळद पाण्याच्या पोस्टवरुन आधुनिक पिढीतही हळदीचं महत्त्व कसं टिकून राहिलं आहे हे दिसून येतं.
छायाचित्र:- गुगल
साराच्या सर्व इन्स्टाग्राम पोस्ट नेहेमी चर्चेत असतात. या पोस्टमधून ती सतत फिटनेसबद्दल बोलत असते. या पोस्ट केवळ लोकप्रियतेसाठी नसून ती स्वत:च्या पोस्टमधून फिटनेससाठी इतरांना प्रोत्साहन देत असते.सारासाठी फिटनेस हा आनंदी जगण्याचा मंत्र आहे. तिचा फिटनेस केवळ चित्रपटांसाठी नसून तो तिच्या जगण्याचा एक भाग आहे. साराला पीसीओडीचा त्रास आहे. या त्रासामुळे काही वर्षांपूर्वी सारा स्थूल होती. पण आज साराकडे पाहून तिला पीसीओडीचा त्रास आहे असं कोणालाच वाटणार नाही. पण तिनं हा त्रास नियंत्रित करण्यासाठी आहार-व्यायाम आणि उपचार या तीन गोष्टींना महत्त्व दिलं.आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करुन तिनं 45 किलोपेक्षाही जास्त वजन घटवलं.
एवढं वजन घटवणं आणि ते पुढे नियंत्रित ठेवणं ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. हेच कष्ट सारा घेत असते. आणि इतरांना त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्याबद्दलच्य पोस्टही ती समाजमाध्यमातून शेअर करत असते. तिची हळद पाण्याची पोस्टही अशीच प्रेरणादायी आहे.
छायाचित्र:- गुगल
काय होतं हळद पाणी पिल्यानं?
* हळदीमधे कक्यरुमिन हा घटक औषधी असून त्यात उपचार करण्याची, आरोग्यविषयक समस्या बर्या करण्याची ताकद आहे. हा घटक पेशींचं नुकसान करणार्या अस्थिर अणूच्या प्रक्रियेवर ( फ्री रॅडिकल डॅमेज) निर्बंध आणतो. त्यामुळे आरोग्य जपलं जातं आणि त्वचेचं होणारं नुकसानही रोखलं जातं. फ्री रॅडिकल डॅमेजमुळे त्वचा लवकर वृध्द होण्याची ( एजिंग) प्रक्रिया होते आणि त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात. पण हळद पाणी पिल्याने ही प्रक्रिया रोखली जाते आणि त्वचेचं संरक्षण होतं.
* हळदीमधे सूजविरोधी आणि दाहविरोधी घटक असतात. त्यामुळे सांधे दुखी, सांधे दाह या समस्या निर्माण होत नाही. रोज सकाळी हळद पाणी पिल्यानं सांधे सुरक्षित राहातात. त्याचा परिणाम म्हणजे आपलं शरीर लवचिक राहातं.
* हळदीमधे जीवणूविरोधी घटक असतात. त्याचा उपयोग आजारांचा संसर्ग रोखण्यावर होतो तसेच जीवाणू आणि किटाणूंपासून त्वचा जपण्यासही होतं. म्हणूनच नियमित हळद पाणी पिल्यानं त्वचा जास्त चमकते, नितळ आणि तरुण दिसते.
* हळदीमुळे पचन क्रिया सुधारते. हळदीतील गुणधर्म पित्ताशयाला पित्तरस निर्माण करण्यास प्रोत्साहन देतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. चयापचय सुधारलं तर वजन कमी होण्यास मदत होते. हळद पाण्यामुळे वजन कमी होतं. वजन नियंत्रित राहातं.
*हळदीमधील घटकांमुळे यकृताचं (लिव्हरचं) कार्य सुधारतं. हळदीतील गुणधर्म रक्त शुध्द करणार्या विकरांच्या निर्मितीला चालना देतात. त्यामुळे यकृताला जेव्हा रक्तपुरवठा होतो तेव्हा त्यात विषारी घटक नसतात. म्हणूनच हळद पाण्यामुळे उत्तम डिटॉक्स वॉटर म्हटलं जातं.
छायाचित्र:- गुगल
हळद पाणी कसं तयार करावं?
एका भांड्यात एक कप पाणी उकळत ठेवावं. एक दुसरा कप घ्यावा. त्यात एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा. वरुन त्यात गरम पाणी ओतावं . त्यात थोडं मध घालून पाणी चांगलं हलवून घ्यावं. हळद पाणी कोमट असतानाच प्यावं.